कर्नाटकाच्या कलबुर्गी महापालिकेकडून आयातुल्ला खामेनी यांना श्रद्धांजली !

‘गझनी-घोरी’ यांची संतती अवशेषांच्या रूपात अजूनही शिल्लक ! – शिवसेना प्रदेशाध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी

पत्रकार परिषदेत मध्यभागी शिवसेना प्रदेशाध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी

कलबुर्गी (कर्नाटक) – अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त आक्रमणात मारले गेलेले इराणचे सर्वोच्च धर्मगुरु आयातुल्ला खामेनी यांना कलबुर्गी महानगरपालिकेत मौन पाळून श्रद्धांजली वहाण्यात आली. या घटनेचा शिवसेना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. कलबुर्गी महापालिका आणि खामेनी यांचा नेमका काय संबंध, असा प्रश्‍न त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना उपस्थित केला.

स्वामीजी म्हणाले की,

या लोकांनी पहलगाम आक्रमणाचा निषेध केला नाही कि त्यासाठी अश्रू ढाळले नाहीत; मात्र दूरच्या इराणमधील नेता वारल्यावर हे लोक इथे अश्रू ढाळत आहेत. श्रद्धांजलीविषयी ठराव मांडणार्‍या नगरसेविका सईदा नूर फातिमा आणि खामेनी यांचा काय संबंध, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. खामेनी यांच्या निधनावर विधानसभेत किंवा संसदेत शोक व्यक्त करण्यात आला नाही; मग तिथे नसलेली हळहळ महापालिकेतच का? हे सर्व पहाता ‘गझनी-घोरी’ यांची संतती महापालिकेत अवशेषांच्या रूपात अजूनही शिल्लक आहे, अशा शब्दांत स्वामीजींनी संताप व्यक्त केला.

महापालिकेत खामेनी यांच्यासाठी शोक व्यक्त करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सिद्धलिंग स्वामीजी यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

मुसलमान प्रेमाचा उमाळा आलेल्या या नगरसेवकांना आता कलबुर्गीमधील मतदारांनीच जाब विचारला पाहिजे !