इराणने क्षेपणास्त्रांवर ‘Thank You India’ लिहीत ती इस्रायलवर डागली !

भारतीय मुसलमानांनी केलेल्या साहाय्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता

नवी देहली – इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर ‘धन्यवाद, भारतातील जनता’ असा मजकूर लिहिलेला होता. त्याचप्रमाणे, स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनी या देशांसाठीही संदेश लिहिण्यात आले होते. ‘ज्या राष्ट्रांनी इराणला पाठिंबा दिला आहे, त्या राष्ट्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या कृतीमागील उद्देश आहे. भारतीय मुलांनी केलेले आर्थिक साहाय्य कधीही विसरणार नाही. ही एक प्रेमळ भेट’, असे इराणने स्पष्ट केले.

ठळक घडामोडी

  • आतापर्यंत ३०३ अमेरिकी सैनिक घायाळ

  • रशियाने इराणला साहाय्याचे १५० टन साहित्य पाठवले

  • इराणमध्ये ९२ सहस्राहून अधिक नागरी इमारतींची हानी

आम्हाला साहाय्य न करणार्‍या ‘नाटो’च्या संरक्षणासाठी आता अमेरिका बांधिल नाही ! – ट्रम्प यांचा संताप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘नाटो’ (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) देशांच्या युद्धाच्या संदर्भातील भूमिकेवर तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. ‘जर तुम्ही आमच्यासाठी उभे रहाणार नसाल, तर आम्ही तुमच्या संरक्षणासाठी का उभे रहावे ? ‘नाटो’ला आता अमेरिकेची आवश्यकता राहिली नाही’, अशा शब्दांत ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ’ या सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत म्हटले की, ही ‘ब्रेकिंग न्यूज’ (आताची महत्त्वाची बातमी) असू शकते; पण हे सत्य आहे. अमेरिका आता नाटोच्या संरक्षणासाठी बांधिल नाही. आम्हाला त्यांच्याकडून काहीही नको.

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांना ‘भित्रे’ म्हटले होते. अमेरिकेच्या सैनिकी पाठिंब्याविना ‘नाटो’ केवळ एक ‘कागदी वाघ’ आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नाटो देशांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, इराणवर आक्रमण करण्यापूर्वी ट्रम्प यांनी कोणत्याही मित्रराष्ट्राशी चर्चा केली नव्हती. त्यामुळे या युद्धात सहभागी होण्यास युरोपीयन युनियन आणि इतर पाश्चात्य देश टाळाटाळ करत आहेत.

अमेरिका इराण युद्धातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात : जेडी व्हान्स आणि नेतान्याहू यांच्यात वाद

जेडी व्हान्स आणि नेतान्याहू

इराणसमवेतच्या युद्धावरून अमेरिका आणि इस्रायल यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एका खासगी दूरभाष संभाषणातून दोन्ही देशांमधील दडलेले मतभेद उघड झाले आहेत. यामुळे अमेरिका या संघर्षात अडकलेली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या चर्चेत तीव्र वाद झाला. एका अहवालानुसार व्हान्स यांनी युद्धापूर्वी नेतान्याहू यांनी केलेल्या दाव्यांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेषतः ‘इराणमध्ये सत्तांतर सहज शक्य होईल आणि तेथे अंतर्गत बंड उफाळू शकतो’, या दाव्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. प्रत्यक्ष परिस्थिती याच्या पूर्णतः विरुद्ध ठरली. इराण अपेक्षेपेक्षा अधिक सक्षम ठरला आणि अमेरिकेला मोठी हानी सहन करावी लागत आहे. जेडी व्हान्स यांनी स्पष्टपणे नमूद केले की, नेतान्याहू यांचे अनेक अंदाज अतिशय आशावादी ठरले. विशेषतः युद्धामुळे इराणमधील जनता सत्तेविरोधात उभी राहील, ही अपेक्षा पूर्णतः चुकीची ठरली.

युद्धावरून नेतान्याहू आणि मोसाद यांच्यात दुरावा

मोसादचे प्रमुख डेविड बार्निया

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ यांच्यात दुरावा वाढत असल्याचे समोर येत आहे. मोसादचे प्रमुख डेविड बार्निया यांनी गेल्या आठवड्यात नेतान्याहू यांच्यासमवेत कोणत्याही संयुक्त बैठकीत सहभाग घेतलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. नेतान्याहू यांनी मोसादच्या  प्रमुखांवर आरोप केला आहे की, त्यांनी इराणच्या सैनिकी क्षमतांविषयी, तसेच त्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीविषयी चुकीची माहिती देऊन इस्रायलची दिशाभूल केली. यामुळे इस्रायल अशा संघर्षाकडे वळला आहे, ज्याचा परिणाम अनिश्चित आहे. या युद्धामुळे इस्रायलच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होऊ शकतो.

मोसादची भूमिका

मोसादच्या मते त्यांनी नेतान्याहू यांना अचूक आणि योग्य माहिती दिली होती; मात्र नेतान्याहू यांच्या वैयक्तिक जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीमुळे हा संघर्ष चालू झाला, ज्याचे परिणाम अनपेक्षित ठरू शकतात. ‘हा संघर्ष अपयशी ठरल्यास त्याचे दायित्व मोसादवर नसून थेट नेतान्याहू यांच्यावरच येईल’, असेही सूचित करण्यात आले आहे.

पंतप्रधान कार्यालय आणि मोसाद प्रमुख एकमेकांवर आरोप करत आहेत की, त्यांच्या यंत्रणेमध्ये इराणी गुप्तहेर सक्रीय आहेत. त्यांच्या माध्यमातून इस्रायलच्या सैनिकी सुरक्षा केंद्रांमधील महत्त्वाची माहिती बाहेर जात असल्याचे सांगितले जात आहे.

आता पुढचा क्रमांक क्युबाचा ! – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले की, मी अमेरिकी सैन्याला पुष्कळ सशक्त  बनवले आहे. मला कधी वाटले नव्हते की, सैन्याचा वापर करावा लागेल; पण कधी कधी तसे करावे लागते. इराणनंतर आता पुढचा क्रमांक क्युबाचा आहे. आम्ही क्युबाला स्वतंत्र करू शकतो किंवा नियंत्रणात घेऊ शकतो. आमच्याकडे काहीही करण्याची क्षमता आहे.

ट्रम्प यांनी क्युबाविरुद्ध त्यांचे पुढील पाऊल काय असेल ? हे स्पष्टपणे सांगितले नाही; परंतु त्यांनी संकेत दिले की, आवश्यकता भासल्यास सैनिकी शक्तीचा वापरही केला जाऊ शकतो.

हुती आतंकवाद्यांनी इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र

इराण-इस्रायल युद्धाच्या २८ दिवसांनंतर आता येमेनमधील इराण समर्थित हुती आतंकवादीही या संघर्षात सहभागी झाले आहेत. हुती आतंकवाद्यांनी दक्षिण इस्रायलमधील बेअरशेबा शहर आणि आसपासच्या भागांना लक्ष्य करून अनुमाने २ सहस्र किलोमीटर अंतरावरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. इस्रायलकडून हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आले.

रशिया १ एप्रिलपासून पेट्रोल निर्यातीवर बंदी घालणार

रशियाच्या सरकारने १ एप्रिल २०२६ पासून पेट्रोल निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी ऊर्जा मंत्रालयाला या संदर्भात एक प्रस्ताव सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

ही बंदी ३१ जुलैपर्यंत असू शकते. वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशात इंधनाची टंचाई टाळण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

भारतावर काय परिणाम होईल?

भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. जर रशियाने शुद्ध केलेल्या पेट्रोलच्या निर्यातीवर बंदी घातली, तर जागतिक बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती वाढतील. रशियाने शुद्धीकरण केलेल्या पेट्रोलवर बंदी आणली आहे. युरोप या पेट्रोलचा मोठा ग्राहक आहे. भारत रशियाकडून पेट्रोल विकत घेत नाही, तर कच्चे तेल खरेदी करतो. रशियाच्या या बंदीमध्ये कच्च्या तेलाचा समावेश नाही, त्यामुळे भारताचा पुरवठा खंडित होणार नाही, तसेच भारतावर याचा फार परिणामही होणार नाही.

इराण युद्धामुळे २० सहस्र खलाशी समुद्रात अडकले

इराण युद्धामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अंदाजे २० सहस्र खलाशी समुद्रात अडकले असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढता येत नाही. युद्धामुळे सागरी वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक खलाशी वाटेतच अडकून पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनेक नौकांवर आक्रमणेही झाली असून त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. अडकलेल्या खलाशांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तू यांच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे.

भारताने बांगलादेशाला आणखी ५ सहस्र टन डिझेल पुरवले !

हॉर्मुझ सामुद्रधुनी बंदी झाल्याने बांगलादेशात पेट्रोल आणि डिझेल यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापूर्वीच भारताकडे बांगलादेशाने मागणी केल्यानंतर डिझेलचा पुरवठा करण्यात आला होता. आता आणखी ५ सहस्र टन डिझेल बांगलादेशाला पुरवण्यात आले आहे. आतापर्यंत भारताने बांगलादेशाला १५ सहस्र टन डिझेल पुरवले आहे.