२१ डिसेंबर २०२५ या दिवशी दुसरा ‘जागतिक ध्यान दिवस’ साजरा झाला. त्या निमित्ताने…
गतवर्षी भारत सरकारच्या सूचनेवरून संयुक्त राष्ट्रांनी ध्यानाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यातील महत्त्वाचे स्थान, तसेच सकारात्मकता निर्माण करण्यातील ध्यानाचे योगदान लक्षात घेऊन जगभरात हा दिवस ‘ध्यान दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे घोषित केले. २१ डिसेंबर हा दिवस निवडण्याचे कारण, म्हणजे या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होते. उत्तरायण हे प्रकाशाकडे आणि अंतर्मुखतेकडे जाण्याचे प्रतीक मानले गेले आहे.

१. अतीप्राचीन इतिहास
‘ध्यान’ ही वैदिक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. किमान इ.स. पूर्व १५०० वर्षापासून यासंबंधी माहिती मिळते. उपनिषदांमध्ये ध्यानासाठी विविध प्रकारची आलंबने सांगितली आहेत, उदा. ॐ, आकाशातील वीज इत्यादी जुन्या काळातील संदर्भ या भूमिकेतून पहातांना ‘महाभारता’च्या ‘वनपर्वा’तील पुढील उल्लेख आपल्याला वैदिकांची आरोग्याविषयीची मूलभूत दृष्टी आणि त्यातील ध्यानाचे महत्त्व सांगतो.
तो संक्षेपात असा आहे,
‘द्युत हरल्यानंतर पांडव वनवासी जात आहेत. धर्मराज शोकमग्न अवस्थेत आहे. त्यांच्या समवेत दु:खी झालेले प्रजाजन आहेत. तेथे एक सांख्ययोगी आहेत. ते धर्मराजाचा शोक पाहून त्याला सांगतात, ‘हे जगच शारीरिक आणि मानसिक दु:खांचे आहे.’ शरिराचे दु्:ख औषधाने बरे होते. हवे वाटणारे न मिळाल्यास, न घडल्यास मानसिक दु:ख होते. ते ध्यान केल्याने बरे होते. मानसिक विकारांतून शारीरिक विकार निर्माण होतात; म्हणूनच जाणकार वैद्य मानसिक दु:खावर प्रथम इलाज करतात. ‘मन शांत, तर शरीर स्वस्थ’, असे असते. मनाला शांती मिळाली की, खरी साधना चालू होते.’
यावरून शारीरिक आरोग्य आणि मन यांचा संबंध कधीपासून मानवाला ज्ञात आहे, ते लक्षात येते.
२. पाश्चात्त्य जगतामध्ये ध्यानासंबंधीच्या जागृतीचा थोडक्यात इतिहास
स्वामी विवेकानंद यांच्या सर्वधर्म परिषदेतील वर्ष १८९३ मधील प्रवचनानंतर पाश्चात्त्य जगतात त्यांची प्रसिद्धी झाली. त्यासह ध्यानाचा परिचय तेथील समाजाला झाला. त्यानंतर स्वामी योगानंद, महर्षि महेश योगी अशा अनेक भारतीय गुरूंनी ध्यानाचा परिचय तेथे चांगलाच रूजवला. असे सगळे असले, तरी मनाला असा आणि इतका आवर घालता येतो की, त्यामुळे शरीरक्रिया लक्षणीय पालटू शकतात, हे पाश्चात्त्य जगताला वर्ष १९६० मध्ये ठळकपणे स्पष्ट झाले.
३. स्वामी राम यांच्यावरील प्रयोगाचे विलक्षण निष्कर्ष
वर्ष १९६० मध्ये ‘हिमालयन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा सायन्स’चे स्वामी राम यांच्या संबंधात वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगातून स्वामी राम यांनी सांगितल्यानुसार ‘स्वेच्छेने हाताच्या त्वचेवरील रक्तवाहिन्यांना नियंत्रित करून तेथील तापमान पालटणे, हृदयगती पालटणे इतके की, वाटल्यास काही सेकंद हृदयाची धडधड थांबवून ठेवणे, सांगितले जाईल त्यानुसार मेंदूमध्ये अल्फा, बीटा, थीटा, गॅमा यांतील हव्या त्या प्रकारच्या लहरी निर्माण करून दाखवणे; यांत्रिक पडताळणीनुसार मेंदू पूर्ण निद्रावस्थेत असला, तरी स्वतःच्या आसपासच्या व्यवहारांचे सर्व भान असणे’, असे सगळे करून दाखवले. या प्रयोगानंतर पाश्चात्त्य जगतातील वैज्ञानिकांचे लक्ष ध्यानाकडे अधिकच वळले. त्यानंतर ध्यान आणि आरोग्य यांचा संबंध अभ्यासण्याच्या वैज्ञानिक प्रयत्नांना गती मिळाली, जी गेल्या दशकात वाढती राहिली आहे. वर्ष १९९० च्या दशकापर्यंत प्रतिवर्षी ध्यानासंबंधी सरासरी २५ लेख प्रसिद्ध होत होते. वर्ष २०१६ मध्ये ही संख्या ४०० झाली. ध्यानाची व्यावहारिक उपयुक्तता अधिकाधिक स्पष्ट होण्याचे हे लक्षण आहे.

४. ध्यानाचा जनुककार्यावर होणारा परिणाम
ध्यानाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य संबंधाने होणार्या संशोधनाने प्रमाणित झालेले अनेक लाभ हे शरीरक्रियेच्या विविध स्तरांवरील आहेत, उदाहरणार्थ ध्यानामुळे हृदय गती नियमन, वाढलेला रक्तदाब न्यून करणे, तणावामुळे वाढणारे अंतर्स्रावांचे (हार्मोन्सचे) प्रमाण मर्यादित करणे, मनातील तणाव, उदासीनता दूर करणे इत्यादी यासंबंधाने अधिक लिहिण्याची आवश्यकता आता नसावी. जसे जेवणापूर्वी हात धुवावे, हे सांगण्यासाठी संशोधन लेखांची माहिती द्यायची आवश्यकता नाही, तसे काहीसे हे आहे. यातील एक लाभ अवश्य सांगावासा वाटतो.
जनुकयंत्रणेवर मनुष्याची शरीररचना ते मानसिक स्तरावरील गुण लक्षणीय प्रमाणात अवलंबून असतात. कोणत्याही कारणाने निर्माण झालेला तणाव जनुकांवर परिणाम करतो. त्यामुळे त्यांच्यात असे काही दीर्घकालीन पालट होतात की, ज्यामुळे तणावाला शरीर आणि मन यांच्याकडून मिळणारे प्रतिसाद पालटतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा दीर्घकालीन परिणाम होतो. याउलट तणावामुळे या हार्मोन्सच्या प्रमाणावर परिणाम करणार्या जनुकांवरच ध्यानाचा प्रभाव पडतो. ध्यानामुळे प्राप्त आंतरिक शांती तणाव निर्माण करणार्या वातावरणाचे दुष्परिणाम प्रतिबंधित करतो.
५. किती वेळ आणि किती वेळा ध्यान करावे ?
महर्षि महेश योगी प्रणित ‘ट्रान्सेडेंटल मेडिटेशन पद्धती’नुसार प्रतिदिन २० मिनिट असे २ वेळा ध्यान करावे. अन्य काही मंडळी अन्य काही सांगतात. एका संशोधकाच्या मते प्रतिदिन ८ मिनिटांचे ध्यान पुरेसे आहे. प्रतिदिन ध्यान करावे, यावर सगळ्यांचे एकमत आहे.
६. काही विचार करण्यायोग्य सूत्रे
तणाव हे अनारोग्य असून त्याचा फैलाव व्यापक प्रमाणात झालेला आहे.
अ. ध्यानाचे शारीरिक आणि मानसिक लाभ इतके स्पष्ट आहेत, तर आपण ध्यान म्हणजे काय ? ते कसे करावे ? हे समजून घेऊन आपण ते दैनंदिन जीवनात आपल्या अंगवळणी पाडत आहोत का ?
आ. सामान्यांना वैद्यकीय सल्ला देणार्यांपासून शिक्षक, उद्योजक इत्यादींकडून सल्ला घेणार्यांना, शिकणार्यांना, त्यांच्या आस्थापनांमध्ये असणार्यांना ध्यान शिकण्याची आणि ते करण्याची व्यवस्था घालून देत आहेत का ?
इ. व्यायाम म्हणजे ‘जिम’मध्ये (आधुनिक व्यायाम शाळेत) उपलब्ध सुविधा यांच्यापासून सूर्यनमस्कारांचा प्रचार करणारे यांनी ध्यान हा मनाचा व्यायाम असून दोन्ही परस्परपूरक आहेत, हे लक्षात घ्यावे.
७. …असा विचार एकदा तरी करा !
सर्वांत शेवटी शांत बसायला, म्हणजेच ध्यान करायचे प्रयत्न करायलासुद्धा अल्प का होईना, प्रयत्न करावे लागतातच, हे लक्षात घ्यावे. ‘जागतिक ध्यान दिवस’ हा केवळ साजरा करण्यापुरते ध्यान नको, तर पुढच्या वर्षाच्या जागतिक ध्यान दिवसापर्यंत प्रतिदिन काही मिनिटे ध्यान करीनच’, हा निश्चय करावा. ध्यान ही भारतीय संस्कृतीची जगाला देणगी आहे, हे लक्षात घेऊन हा ठेवा स्वत: प्रतिदिन ध्यान करून समृद्ध करावा. संस्कृतीची जपणूक आणि संवर्धन ती पुस्तकात लिहून ठेवून, व्हिडिओ करून किंवा घोषणांमधून नाही, तर केवळ प्रत्येकाच्या आचरणांतूनच होते ! म्हणूनच ध्यानाचे महत्त्व ते स्वत: करून इतरांनाही सांगा !
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा. (१९.१२.२०२५)

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !