आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि भूराजकीय डावपेच हे सरळसोट कधीच नसतात. ते अत्यंत गुंतागुंतीचे आणि अनेक पदरी असतात. म्हणूनच अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर इतके सर्वंकष आक्रमण का केले, याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ही गुंतागुंत आणि त्यातील अनेक पदर समजून घेणे आवश्यक ठरते. १७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘इराणमध्ये सत्तापालट होऊ न शकल्याने करण्यात आले प्रत्यक्ष आक्रमण, चीनला आवर घालण्यासाठी आणि त्याच्या प्रतिमेला तडे घालण्यासाठी डीप स्टेटची योजना, तसेच इराणवरील आक्रमणाचे एक कारण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019233.html

६. अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेले आक्रमण, म्हणजे डीप स्टेटने वोकिझमला हाताशी धरण्याचे धोरण थांबवणे !
अमेरिका-इस्रायल युतीने इराणवर केलेले आक्रमण हेच दर्शवतो की, साम्यवादी-जिहादी यांच्या युतीला संपवण्याचा निर्णय आता ‘डीप स्टेट’ने घेतला आहे. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते, जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) डीप स्टेटमधील प्रमुख ‘वोक’समर्थक (वोकिझम म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती) जॉर्ज सोरोस यांना ‘हाऊस अरेस्ट’मध्ये (नजरकैद) ठेवल्याची नुकतीच आलेली बातमीही हेच सांगते की, डीप स्टेटने वोकिझमला हाताशी धरण्याचे धोरण थांबवले आहे. या युद्धाविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या जनतेचा फारसा पाठिंबा नसला, तरी तेथील कडवे ‘इव्हँजेलिकल ख्रिस्ती’ (बायबलवर आधारित ख्रिस्ती मतांचा पुरस्कार करणारा) मात्र या युद्धाला पाठिंबा देत आहेत; कारण या युद्धामुळे जिहादी आणि त्यांना वैचारिक संरक्षण देणारे साम्यवादी यांचा निर्णायक पराभव होईल अन् वर्ष १९७० मध्ये रोमन साम्राज्याने पाडलेले ‘टेंपल ऑफ जेरुसलेम’ पुन्हा बांधले जाईल, अशी त्यांना आशा आहे. डीप स्टेटवर अतीश्रीमंत ज्यू लॉबीचा मोठा प्रभाव आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर झालेले अमानुष आक्रमण, त्यानंतर पाश्चात्त्य जगतात विशेषतः विद्यापिठांमध्ये ‘हमास’च्या समर्थनार्थ झालेली निदर्शने, युरोपमध्ये वेगाने होणारा ज्यूद्वेष्ट्या इस्लामचा प्रसार यांमुळे जागे होऊन डीप स्टेटने ‘इनफ इज इनफ’ (आता पुरे झाले), असे ठरवलेले दिसते.
७. जागतिकीकरणाची लाट आणि इराणवरील आक्रमणाचा खरा अर्थ
वर्ष १९९० पासून आलेली जागतिकीकरणाची लाट हा डीप स्टेटचाच प्रकल्प होता. या लाटेत संपूर्ण जग आपल्याला हवी ती आर्थिक धोरणे राबवेल, ही निश्चिती तर होतीच; पण त्यासह पाश्चात्त्य संस्कृती आणि जीवनपद्धत यांचेही ‘ग्लोबलायझेशन’ (जागतिकीकरण) होऊन संपूर्ण जग स्वतःच्या कह्यात येईल, अशी त्यांची योजना होती; पण या जागतिकीकरणामुळे येणार्या खुलेपणाचा आणि स्वातंत्र्याचा लाभ घेऊन साम्यवादी-जिहाद्यांच्या युतीने पाश्चात्त्य जगतालाच स्वतःचे विचार स्वीकारायला भाग पाडले. चीनने मात्र ‘कम्युनिझम’चा (साम्यवादाचा) वापर केवळ स्वतःच्या देशात हुकूमशाही टिकवण्यासाठी आणि विरोधी देशांमध्ये अस्थैर्य माजवण्यासाठी केला. ‘कम्युनिझम’चा खरेतर राष्ट्रवादाला विरोध असतो; पण चीन आणि रशिया या दोन्ही देशांनी राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन केले आहे. चीनमध्ये कन्फ्युशिअसच्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला जात आहे आणि इतिहासातील ‘मिडल किंगडम’चे वैभव पुन्हा प्राप्त करण्याच्या निश्चयाने चीनची वाटचाल चालू आहे. आता डीप स्टेटनेही स्वतःच्या जागतिकीकरणाच्या संकल्पनेला मूठमाती देऊन पाश्चात्त्य ज्युडिओ ख्रिस्ती सभ्यतेचे संरक्षण आणि संवर्धन करायचे ठरवलेले दिसते, हाच इराणवरील आक्रमणाचा खरा अर्थ आहे.
ट्रम्प यांनी उद्योगपती अंबानींना देश विकला ?

भारताची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ अमेरिकेत ३०० बिलियन डॉलर्सची (२७ लाख ६७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) गुंतवणूक करून नवी ‘रिफायनरी’ (तेल शुद्धीकरण कारखाना) उभारत आहे. ५० वर्षांनंतर अमेरिकेत नवी रिफायनरी आणि ती एक भारतीय आस्थापन उभारत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. डॉनल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही घोषणा करून भारत आणि ‘रिलायन्स’ यांचे आभार मानले. यावरून अमेरिकेत कुणी ‘ट्रम्प यांनी अंबानींना देश विकला’, अशी टीका केली नसावी; कारण मोठे उद्योग उभे करणार्या उद्योगपतींना जगभर मान दिला जातो आणि हे उद्योग देशाच्या भूराजकीय व्यूहरचनेत महत्वाची भूमिका पार पाडतात. भारतात मात्र उद्योगपती अंबानी-अदानी हे दरोडेखोर असल्याचा आभास निर्माण केला जातो आणि पदोपदी बाष्कळ बडबड केली जाते.
रिलायन्सचे रिफायनरी क्षेत्रात पदार्पण कसे झाले, यामागची कहाणी अमेरिकेतील रिलायन्सच्या गुंतवणुकीशी निगडित आहे. रिलायन्सने पेट्रोलियम क्षेत्रात पदार्पण करून जामनगर (गुजरात) येथे रिफायनरी उभारायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी या क्षेत्रातील अनेक तज्ञांना आस्थापनात घेऊन त्यांना या प्रकल्पाचा अहवाल बनवायला सांगितला. त्यांनी पुष्कळ मेहनत करून अहवाल बनवला अन् उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्यासमोर सादरीकरण करायला संपूर्ण पथक सज्ज झाले.
व्यवसायाची सखोल जाण असलेले धीरूभाई अंबानी !
या सादरीकरणाच्या वेळी कच्च्या तेलाचा भाव त्यांनी काय गृहित धरला आहे, ही ‘स्लाईड’ समोर आल्यावर धीरूभाईंनी सादरीकरण थांबवले आणि सांगितले, ‘आपल्याला इतरांपेक्षा न्यून दरात तेल मिळायला हवे.’ हे ऐकल्यावर रिफायनिंगमधील सगळे अतिरथी-महारथी एकमेकांकडे बघू लागले. शेवटी कुणीतरी म्हटले, ‘तेल असे स्वस्त मिळत नाही. ते बाजारभावाप्रमाणेच घ्यावे लागते.’ त्यावर धीरूभाईंनी सांगितले, ‘मग हा प्रकल्प बंद करा.’ नुकताच रिलायन्समध्ये आस्थापनेत नोकरीला लागलेला एक तरुण अभियंता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, असे पाहून ज्येष्ठ मंडळींनी त्याला गप्प बसवले; पण धीरूभाईंनी सांगितले, ‘त्याला बोलू द्या.’ तो म्हणाला, ‘अल्प दर्जाचे मानले जाणारे आणि ‘सल्फर’ची मात्रा अधिक असलेले तेल स्वस्त दरात मिळू शकते. त्यावर धीरूभाईंनी क्षणार्धात निर्णय घेतला आणि सांगितले, ‘हे स्वस्त तेल गृहित धरून नवा प्रकल्प अहवाल बनवा.’ अनुभवी मंडळींनी त्यांना सांगितले, ‘हे तेल रिफाईन करण्यासाठी अत्यंत ‘कॉम्प्लेक्स प्रोसेस’ (जटिल प्रक्रिया) असलेली रिफायनरी लागते आणि त्यासाठी साध्या रिफायनरीपेक्षा जवळपास चौपट गुंतवणूक करावी लागते.’ त्यावर धीरूभाई म्हणाले, ‘ही गुंतवणूक एकदा करावी लागेल; पण स्वस्त तेलाचा लाभ आपल्याला वर्षानुवर्षे मिळत राहील. त्यामुळे हाच अंतिमतः लाभाचा सौदा ठरेल.’ यानंतर त्यांनी जामनगरची रिफायनरी विक्रमी वेळेत उभी केली आणि पेट्रोलियम क्षेत्रात अक्षरशः हनुमान उडी घेतली. कुठलाही उद्योगपती धीरूभाईंसारखा मोठा होतो, तो केवळ लांड्यालबाड्या करून नव्हे, तर त्यासाठी त्याच्याकडे असावी लागते व्यवसायातील खाचाखोचांची सखोल जाण (बिझिनेस ॲक्युमेन) !
अदानी-अंबानींचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकणे महत्त्वाचे !
रिलायन्सची जामनगर रिफायनरी जगातील ‘कॉम्प्लेक्स रिफायनरीज’पैकी एक मानली जाते. व्हेनेझुएलात मिळणारे तेल सल्फरमिश्रित असते, ज्याच्या रिफायनिंगसाठी अशीच ‘कॉम्प्लेक्स रिफायनरी’ लागते. अमेरिकेने रिलायन्ससाठी पायघड्या घातल्या, त्या उगीच नव्हे. म्हणूनच महाराष्ट्रातील तरुणांनी अदानी-अंबानींचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्याकडून ‘बिझिनेस ॲक्युमेन’ शिकून घ्यायला हवा, तरच मराठी माणूस उद्योगधंद्यातही पुढे राहील.
– श्री. अभिजित जोग
८. भारताच्या प्रगतीत अधिकाधिक अडथळे आणण्याचा प्रयत्न
पाश्चात्त्य सभ्यता ही मुळातच आक्रमक, विस्तारवादी आणि वर्चस्ववादी असल्यामुळे ते संपूर्ण जगावर स्वतःची धोरणे लादण्याचे प्रयत्न आता अधिकच उघडपणे अन् आक्रमकपणे करणार, हे निश्चित आहे. ट्रम्प यांच्या धोरणांवरून हे दिसतच आहे. भारतासाठी हा धोका अधिकच महत्वाचा आहे; कारण स्वस्त मनुष्यबळ आणि अधिक लाभ या मोहाने स्वतःचे संपूर्ण उत्पादन क्षेत्र चीनमध्ये स्थलांतरित करून पाश्चात्त्य राष्ट्रांनी चीनला मोठे केले. आज तोच चीन त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. भारताविषयी ही चूक अमेरिका करणार नाही. भारताच्या प्रगतीत अधिकाधिक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जाणार.
९. जिहादी गट या आक्रमणाचा प्रतिशोध कसा घेतील ?
चीनची नाकेबंदी करून आणि त्यांच्यात आमचा प्रतिस्पर्धी बनण्याची क्षमताच नाही, हे दाखवून देऊन ‘ब्रेक्झिट’सारखे गट अप्रस्तुत ठरवणे, हा इराणवरील आक्रमणाचा आणखी एक पैलू आहे. त्यामुळे अर्थातच ‘डी-डॉलरायझेशन’ची (जागतिक व्यापारातील डॉलरचे वर्चस्व न्यून करणे) चर्चा संपेल आणि पश्चिमेचे वर्चस्व अधोरेखित होईल. याला चीन काय उत्तर देईल ? त्यांनी पश्चिमेतील उभी केलेली वोक-जिहादी लॉबी मुकाट्याने हार मानून गप्प बसेल कि पाश्चात्त्य जगतात यादवी युद्धाची परिस्थिती निर्माण होईल ? जिहादी गट या आक्रमणाचा प्रतिशोध कसा घेतील ? या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये जगाचे भवितव्य दडलेले आहे.
१०. भारताने घ्यावयाचा बोध
यातून घेण्यासारखा बोध म्हणजे साम्यवादी, जिहादी आणि डीप स्टेट या तिन्ही निरंकुशतावादी शक्ती आहेत, ज्यांना संपूर्ण जगावर स्वतःची एकहाती सत्ता प्रस्थापित करायची आहे. त्यांच्यात डावे-उजवे करण्यासारखे काहीही नाही. ज्या देशांना आपली संस्कृती आणि स्वातंत्र्य जपायचे आहे त्यांच्यासाठी या शक्ती सारख्याच घातक आहेत. यामुळे भारताने स्वतःचा लाभ बघून त्यानुसार धोरणे आखायला हवीत आणि स्वतःची आर्थिक, सामरिक अन् सांस्कृतिक शक्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे; कारण असा शक्तीशाली भारतच या तिन्ही निरंकुशतावादी शक्तींच्या प्रभावाखाली न जाता स्वतःची स्वतंत्र ओळख जपू पहाणार्या तिसर्या जगाला नेतृत्व देण्याचे इतिहासदत्त दायित्व पार पाडू शकेल.
(समाप्त)
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१५.३.२०२६)
संपादकीय भूमिकाभारताने ‘डीप स्टेट’ची षड्यंत्रे ओळखून वेळीच सावध पावले उचलणे आवश्यक ! |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !