आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि भूराजकीय डावपेच हे सरळसोट कधीच नसतात. ते अत्यंत गुंतागुंतीचे आणि अनेक पदरी असतात. म्हणूनच अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर इतके सर्वंकष आक्रमण का केले ? याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ही गुंतागुंत आणि त्यातील अनेक पदर समजून घेणे आवश्यक ठरते.

१. इराणमध्ये सत्तापालट होऊ न शकल्याने करण्यात आले प्रत्यक्ष आक्रमण !
जगातील काही अतीश्रीमंत घराणी आणि त्यांच्या प्रभुत्वाखालील बँका यांची ‘डीप स्टेट’ (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते, जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.) संपूर्ण जगावर अधिकार गाजवण्याच्या आपल्या लालसेपोटी जगातील सर्व देशांनी स्वतःच्या सोयीची राजकीय आणि आर्थिक धोरणे राबवावी, असा आग्रह धरते. स्वतःच्या सोयीची जागतिक रचना प्रत्यक्षात आणण्यासाठी देशांच्या सीमा हव्या तशा पालटते. त्यांच्या इच्छेप्रमाणे न वागता जर एखाद्या देशाने स्वहिताची स्वतंत्र धोरणे राबवण्याचे धाडस केले, तर तिथे सत्तापालट (रेजीम चेंज) घडवला जातो.
असा पालट घडवण्यासाठी सरळ आक्रमण न करता त्या देशातील काही विघ्नसंतोषी, वैफल्यग्रस्त लोकांना हाताशी धरून तिथे हिंसा आणि अराजक माजवले जाते अन् त्या गोंधळात सरकारला खाली खेचले जाते. (इराणमध्ये हेच करण्याचा प्रयत्न बरेच दिवसांपासून होत होता. तो अयशस्वी ठरल्यानंतर प्रत्यक्ष आक्रमण करण्यात आले.) हिंसा आणि अराजक यांत विशेष नैपुण्य असलेल्या २ शक्ती, म्हणजे साम्यवादी आणि जिहादी इस्लाम. यासाठी या २ शक्तींना हाताशी धरण्याचे धोरण ‘डीप स्टेट’ने गेल्या अनेक वर्षांपासून वापरले. बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी विद्यापिठातील साम्यवादी विद्यार्थी आणि जमात-ए-इस्लामीच्या धर्मांध टोळ्या यांचा वापर कसा करण्यात आला, हे आपण पाहिलेच आहे. साम्यवादी आणि जिहादी यांच्या या विध्वंसक ‘कॉकटेल’चा (संमिश्र) उपयोग वारंवार करण्यात आला आहे.
२. ‘डीप स्टेट’ने पाश्चात्त्य सभ्यतेला विध्वंसाच्या टोकावर का आणले ?

वास्तविक पहाता साम्यवादी आणि जिहादी इस्लाम यांचे उद्दिष्टही जागतिक वर्चस्व हेच आहे. याअर्थी ते ‘डीप स्टेट’चे स्पर्धक आहेत; पण ‘आवश्यकता असेपर्यंत त्यांचा वापर करून वेळ येईल तेव्हा स्वतःच्या अपार शक्तीच्या बळावर त्यांना विकत घेऊ वा वाटेतून दूर करू’, असा ‘डीप स्टेट’चा समज असावा. प्रत्यक्षात ‘डीप स्टेट’ जिचा भाग आहे, त्या पाश्चात्त्य सभ्यतेचा विध्वंस ही साम्यवादी आणि जिहादी या दोघांचीही प्राथमिकता आहे. तालिबान, अल् कायदा, इसिस यांसारख्या आतंकवादी संघटना पाश्चात्त्य सभ्यता ही भ्रष्ट आणि अधार्मिक असल्याचे मानतात अन् तिला स्वतःचा शत्रू क्रमांक एक समजतात. पाश्चात्त्य राष्ट्रांनी साम्यवादी क्रांतीकडे साफ पाठ फिरवली आणि एका बाजूला पाश्चात्त्य लोकशाही अन् खुली अर्थव्यवस्था, तर दुसरीकडे ‘कम्युनिझम’ या शर्यतीत साम्यवाद्यांचा निर्णायक पराभव झाला, हे वास्तव सहन न करता आल्यामुळे साम्यवाद्यांनी ‘पाश्चात्त्य सभ्यतेचा विध्वंस’ हे स्वतःचे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी अतिरेकी व्यक्तीवाद, विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, लैंगिक स्वैराचार, ‘ट्रान्सजेंडरिझम’चा (लिंग पालट) प्रचार, अनिर्बंध स्थलांतर यांसारख्या मार्गांचा अवलंब करून कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था, देशप्रेम यांचा नाश करायचा आणि पाश्चात्त्य संस्कृती अन् सभ्यता यांना कोसळवायचे. या कार्यशैलीचा अनेक दशकांपासून वापर करत त्यांनी पाश्चात्त्य सभ्यतेला विध्वंसाच्या टोकावर आणून उभे केले आहे.
उद्दिष्ट समान असल्यामुळे साम्यवादी आणि जिहादी हे हातात हात घालून काम करतात. जिहादी हिंसा आणि दहशत यांना साम्यवादी वैचारिक पाठबळ अन् ‘कव्हर फायर’ (संरक्षण) देतात. ‘इस्लामोफोबिया’ हा एक शब्द निर्माण करून आणि त्याच्याशी टोकाची नकारात्मकता जोडून इस्लामचे विश्लेषण अन् त्यातील अपप्रवृत्तींवरील टीका अशक्यच ठरवण्यात आली आहे. ‘हिरव्या तलवारीसाठी लाल ढाल’ असा हा प्रकार आहे.
३. ‘डीप स्टेट’, जिहादी आणि वोकिझम यांचे उद्दिष्ट
(वोकिझम म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती)
गोर्या, युरोपियन; विशेषतः अमेरिका, इंग्लंड या ‘ट्रान्स अटलांटिक’ (अटलांटिक महासागराच्या पलीकडील, ‘अँग्लो-सॅक्सन’ (५ व्या शतकात इंग्लंड जिंकणारे जर्मनिक लोक) राष्ट्रांचे वर्चस्व हे खरेतर ‘डीप स्टेट’चे उद्दिष्ट; पण साम्यवादी आणि जिहादी यांचा वापर करायचा असल्यामुळे त्यांच्या पश्चिम विरोधाकडे त्यांनी कानाडोळा केला. आपल्याला हवे तेव्हा आपण यांना वेसण घालू शकू, हा आत्मविश्वास यामागे असावा. याचा लाभ घेऊन साम्यवाद्यांनी पद्धतशीरपणे पश्चिमेतील सर्व सत्ताकेंद्र हाती असलेल्या ‘एलीट’ (उच्चभ्रू), बोलक्या वर्गावर स्वतःच्या वोक विचारांची घट्ट पकड बसवली. अमेरिकेचा प्रमुख स्पर्धक बनलेल्या चीनने यासाठी अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली. अनिर्बंध स्थलांतर आणि लोकसंख्येची भूमितीय वाढ यांच्या आधारे पाश्चात्त्य राष्ट्रांवर इस्लामचा झेंडा फडकवणे, हे जिहादी इस्लामचे उद्दिष्ट आहे. याच्या पूर्ततेसाठी स्थलांतरावर मानवतेचा आणि आक्रमकतेवर बहुसांस्कृतिकतेचा मुखवटा चढवणारा साम्यवादी वोक विचार साहाय्यकारी ठरतो, हे लक्षात घेऊन कतार या छोट्या; पण अत्यंत श्रीमंत देशानेही अमेरिकन विद्यापिठांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. एका अनुमानानुसार कतारची ही गुंतवणूक १ ट्रिलियन डॉलर्स (एकावर १२ शून्य) इतकी प्रचंड आहे.
यामुळे गेली काही दशके अमेरिकेतील आणि इतर पाश्चात्त्य देशांतील विद्यापिठांमध्ये वोकिझमची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे, तर इतर कुठल्याही विचारांची पूर्ण मुस्कटदाबी करण्यात आली आहे. वोक विचार खोलवर रुजलेल्या पिढ्यान्पिढ्या विद्यापिठांमधून बाहेर पडून विविध क्षेत्रांचे नेतृत्व करत आहेत आणि या देशांच्या धोरणांवर प्रभाव टाकून त्यांना विध्वंसाच्या दिशेने ढकलत आहेत. ‘डीप स्टेट’चे ‘फूट सोल्जर’ (प्रत्यक्षातील लढाऊ गट) असलेल्या ओबामा, क्लिंटन, बायडेन यांनीही वोक-जिहादी युतीच्या विध्वंसक कारवायांना आळा घालायचा प्रयत्न केला नाही, उलट त्यांचे समर्थनच केले, ते या साम्यवादी वोक विचारांच्या प्रभावामुळेच.

४. चीनला आवर घालण्यासाठी आणि त्याच्या प्रतिमेला तडे घालण्यासाठी डीप स्टेटची योजना
गेल्या काही दिवसांत मात्र या युतीच्या अतिरेकी प्रभावाला मोठा विरोध होऊ लागला आहे. गेल्या निवडणुकीत झालेला डॉनल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय; जर्मनी, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, डेन्मार्क, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांमध्ये उजव्या विचाराच्या पक्षांना मिळणारा वाढता पाठिंबा यावरूनही हेच दिसून येते. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलमध्ये शिरून हमासने केलेल्या अमानवी अत्याचारांचे अमेरिकन विद्यापिठांमध्ये होणारे उघड समर्थन; इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम यांसारख्या देशांमध्ये झपाट्याने वाढणारी जिहाद्यांची उघड दहशत हे बघता आता जर यांना आवर घातला नाही, तर ज्युडिओ-ख्रिस्ती धर्मपरंपरेवर आधारलेल्या पाश्चात्त्य सभ्यतेला विनाशाच्या गर्तेत कोसळण्यापासून वाचवणे अशक्य होईल, याची जाणीव डीप स्टेटला सर्वोच्च पातळीवर झालेली दिसते. यामुळेच डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेच्या भूराजकीय धोरणांमध्ये मूलभूत पालट झाले आहेत.
वोक प्रभावाखालील राष्ट्राध्यक्षांनी पाश्चात्त्य वर्चस्वाला खरे आव्हान देणारी शक्ती चीनच असू शकते, याकडे कानाडोळा करून शीतयुद्धाच्या ‘हँगओव्हर’मधून (दुष्परिणामातून) बाहेर पडण्याचे नाकारत व्लादिमिर पुतिन (रशियाचे राष्ट्राध्यक्ष) आणि रशिया यांना शत्रू क्र. १ समजण्यात धन्यता मानली. युक्रेनला हाताशी धरून रशियाविरुद्ध आघाडी उघडण्यात आली, तर चीनविरुद्ध मवाळ भूमिका घेण्यात आली. याचा लाभ घेऊन चीनने पश्चिमेच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याची सिद्धता चालूच ठेवली. एका बाजूला पाश्चात्त्य देशांतील विद्यापिठांमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांचे नेतृत्व करणारा वर्ग साम्यवादी विचारांनी प्रभावित राहील आणि स्वतःसाठी सोयीस्कर अशा धोरणांचा पाठपुरावा करील, अशी खात्री केली. दुसरीकडे ‘ब्रिक्स’सारख्या (‘ब्रिक्स’, म्हणजे ही ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश असलेली आंतरसरकारी संघटना आहे.) संघटनांच्या माध्यमातून अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची योजना आखली. या दोन्ही गोष्टी डीप स्टेटला सहन होणे शक्यच नव्हते. चीनने उभे केलेले हे आव्हान दुर्लक्षित करणे आता शक्य नाही, हे लक्षात आलेल्या डीप स्टेटने वोक लॉबीला बाजूला सारून ट्रम्प यांना चीनला आवर घालण्याचा आदेश दिलेला दिसतो; कारण डीप स्टेटचा पाठिंबा नसता, तर मुळात ट्रम्प निवडून येणेच शक्य नव्हते.
त्यानंतर ट्रम्प यांनी चीन-रशिया-इराण-उत्तर कोरिया या ‘ॲक्सिस’ला (प्रवेशाला) पायबंद घालणारी पावले उचलायला प्रारंभ केला. सीरियातील बशर अल् असद यांचे या ‘ॲक्सिस’शी जवळीक असलेले सरकार उलथवले. चीनला तेलाचा पुरवठा करणार्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना उचलून आणले. या प्रत्येक वेळी चीन गप्प बसण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. यामुळे ‘अमेरिकेच्या प्रभावाला आव्हान देणारा देश’ या चीनच्या प्रतिमेला तडे गेले.
५. इराणवरील आक्रमणाचे एक कारण
याच मालिकेतील पुढचे पाऊल, म्हणजे इराणवरील आक्रमण. ‘चीनच्या ऊर्जेचा आणखी एक स्रोत हिरावून घेणे आणि आम्ही तुमच्या गटातील राष्ट्रावर उघड आक्रमण केले; त्यांच्या प्रमुखाला ठार करण्याची मनमानी केली, तरी तुम्ही काहीही करू शकत नाही, हे दाखवून देणे’, आहे. तसाच याला आणखी एक पदर आहे. इस्लामी आतंकवादाचा शस्त्र म्हणून वापर सर्वप्रथम सौदी अरेबियाने वर्ष १९७९ पासून चालू केला. त्यानंतर त्यांनीच या आतंकवादाला आर्थिक आणि इतर साहाय्य दिले. गेल्या काही काळात मात्र सौदी अरेबियाने ‘जिहादी इस्लामचा प्रवर्तक’ ही स्वतःची भूमिका सोडून प्रगतीशील धोरण राबवायला प्रारंभ केला आहे. सौदी, संयुक्त अरब अमिराती यांसारखे देश इस्लामी क्रांतीची स्वप्न सोडून आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून दक्षिण-पूर्व आशियातील देशांप्रमाणे वेगाने प्रगती करू इच्छितात. ‘जिहादी इस्लामचे प्रवर्तक’ ही सौदीची भूमिका गेल्या काही वर्षांत इराणकडे आली आहे. हमास, हिजबुल्ला, हुती यांसारख्या जिहादी संघटना इराणने उभ्या केल्या आहेत. त्यांचे प्रमुख लक्ष्य इस्रायल हे असले, तरी ‘ज्युडिओ ख्रिस्ती’ पाश्चात्त्य सभ्यता हा त्यांचा शत्रू क्र. १ आहे. म्हणूनच ‘मुस्लिम ब्रदरहूड’सारख्या सुन्नी पंथीय जिहादी संघटना इस्रायल आणि पाश्चिमात्य देश यांच्याविरुद्ध शिया इराणशी हातमिळवणी करतात.
(क्रमशः)
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१५.३.२०२६)
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1019642.html
अनैतिकतेचा बाजार !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?
पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !