साधनेचे विविध मार्ग आणि कला-उपासक !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. भगवद्भक्ती करण्याचे माध्यम असणार्‍या आणि मंदिर संस्कृतीशी संलग्न असलेल्या या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश आता काळाच्या प्रभावामुळे पालटत चालला आहे. 

(लेखांक १६)     

‘मागील लेखात आपण ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलेतून साधनेसाठी केलेले मार्गदर्शन आणि त्याचे विश्लेषण’ पाहिले. कलेतून प्रत्यक्ष साधना समजून घेण्याआधी आज आपण कलेतून साधनेतील विविध योगमार्गांची ओळख करून घेणार आहोत. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा साधनेचा मूलभूत सिद्धांत आहे. हा सिद्धांत कलेतील साधकांसाठीही लागू पडतो. त्यामुळे एखादा कलाकार विविध कलांचा उपासक असला, तरी त्याच्या साधनेचा योगमार्ग हा ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग किंवा भक्तीयोग, हा असू शकतो. या ‘विविध योगमार्गांतील संगीत-उपासकांची वैशिष्ट्ये कोणती असतात ? ‘आपला साधनेचा मार्ग कोणता आहे ?’, हे कसे ओळखावे ?’, याचा अभ्यास या लेखाच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे.

लेखांक १५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014922.html


१. साधनेचे मार्ग आणि त्यांची वैशिष्ट्ये

१ अ. ज्ञानयोग : ईश्वरी ज्ञानाच्या माध्यमातून आध्यात्मिक उन्नती करून घेणे

१ आ. ध्यानयोग : ध्यानाच्या माध्यमातून मन एकाग्र करून अंतर्मुखता साधणे

१ इ. कर्मयोग : फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे

१ ई. भक्तीयोग : शरणागतीने आणि प्रेमपूर्वक ईश्वराची भक्ती करणे

१ उ. गुरुकृपायोग : सर्व योगमार्गांचे मिश्रण असलेला आणि गुरूंची कृपा जलद गतीने प्राप्त करून देणारा योग

(अनेक वेळा व्यक्तीमध्ये वरीलपैकी ४ योगमार्गांतील एखादा योगमार्ग प्रधान असतो आणि त्या मार्गाला ती अन्य मार्गांचीही जोड देतांना दिसते, उदा. व्यक्ती मुळात भक्तीयोगी, ध्यानयोगी इत्यादी असली, तरी तिच्या या मार्गाला ती अन्य मार्गांची जोड देऊनही साधनारत असलेली दिसते.)

२. कला आणि विविध योगमार्ग आचरणार्‍या कला-उपासकांची / साधकांची वैशिष्ट्ये 

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कला ‘साधना’ म्हणून आचरतांना विविध योगमार्गांची प्रधानता असलेला साधक कशा प्रकारे साधनारत राहू शकतो ? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ?’, हे कळावे’, या दृष्टीने पुढील सूत्रे दिली आहेत. या ठिकाणी योगमार्गांच्या ठळक वैशिष्ट्यांचा विचार करून ती लिहिली आहेत. व्यक्तीनिहाय हा भाग अल्प-अधिक असू शकेल.

२ अ. ज्ञानयोगी कला-उपासक : ज्ञानमार्गी कला-उपासकांचे साधनेचे माध्यम ‘सात्त्विक बुद्धी’ हे असते. या सात्त्विक बुद्धीच्या माध्यमातून ते कलेतील सत्-असत्च्या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. ज्ञानमार्गी कला-उपासकावर श्री सरस्वतीदेवीची कृपा असते. या उपासकांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे उपासक कलेतील अध्ययन अतिशय बारकाईने करतात. कलेमधील गाभा त्यांना सहजतेने लक्षात येऊ शकतो. त्यांना कलेविषयीचे विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण करता येते. अशा ज्ञानयोगी कला-उपासकाला ‘काव्य स्फुरणे, लेखनकार्य करणे, कलेतील विविध पद्धतींचा अभ्यास मांडणे, साधनेमुळे सूक्ष्मातील ईश्वरी ज्ञान ग्रहण करता येणे’, हे सहजतेने करता येते. केवळ ज्ञान हे रुक्षपणा आणू शकते किंवा ज्ञानामुळे अहंकार उत्पन्न होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ज्ञानमार्गी कला-उपासकाने त्याच्या ज्ञानाला भक्तीमार्गाची जोड दिल्यास त्याची कला-साधना अधिक परिणामकारक होऊ शकते.

२ आ. ध्यानयोगी कला-उपासक : ‘कलेच्या माध्यमातून ध्यान-धारणा करून मनाची एकाग्र अवस्था प्राप्त करणे’, हे ध्यानयोगी कला-उपासकाचे वैशिष्ट्य आहे. कलेतून ध्यानाच्या माध्यमातून कला-उपासक स्वतःला विसरतो. ‘स्व’ला विसरून तो एकाग्र मनाने कलेत एकरूपता साधून आपली कला सादर करतो. त्यामुळे गायन, वादन यांसह तो संपूर्ण शरिराच्या हालचालींचे नृत्य जरी करत असला, तरी नृत्यासारख्याच अन्य कलांमध्येही तो ध्यानाची अनुभूती घेऊ शकतो. गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी कोणत्याही कलेचे ‘साधना’ म्हणून सादरीकरण केल्यावर शेवटी शब्द, नाद, भाव-भावना, शरिराच्या हालचाली, हे सर्व थांबून एक शांत अवस्था येते. ती ध्यानाची अवस्था असते. साधक ध्यानाच्या पुढच्या पुढच्या अवस्थेमध्ये गेल्यावर तो कलांच्या माध्यमातून सहजतेने समाधी अवस्थाही प्राप्त करू शकतो.

२ इ. कर्मयोगी कला-उपासक : कर्मयोगी कला-उपासक हे ‘ईश्वराला मानणारे असतीलच’, असे नाही. ते कलेलाच त्यांचा ईश्वर मानतात. त्यांच्यासाठी ‘कला सादरीकरणाचे निष्काम कर्म’, हीच उपासना असते. अपेक्षा ठेवून केलेले कर्म हे साधनेच्या दृष्टीने कर्मयोगामध्ये येत नाही. ती सकाम साधना होते, उदा. ‘अर्थार्जन’, हा प्राथमिक उद्देश ठेवून त्या दृष्टीने कलांचे सादरीकरण करणारा हा सकाम कर्मयोगी झाला; परंतु अर्थार्जनामध्ये मनाने न अडकलेला कलाकार हा खरा कर्मयोगी कला-उपासक असतो. तो कलेतील प्रत्येक कृती ही ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’, या भावाने करतो. हे कला-उपासक कर्मयोगाच्या माध्यमातून ‘योगः कर्मसु कौशलम् ।’, म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे’, या श्लोकाप्रमाणे त्यांची कला सादर करतात आणि त्यातूनच त्यांची साधना होते.

सौ. भक्ती कुलकर्णी

२ ई. भक्तीयोगी कला-उपासक : ‘आपली कला ही भगवंताच्या उपासनेसाठीच आहे’, या भावाने कलेचे सादरीकरण करणे’, हे भक्तीयोगी कला-उपासकाचे वैशिष्ट्य असते. हा कला-उपासक आपल्या कलेतून भगवंताची करुणा भाकतो, भगवंताला आळवतो आणि कलेच्या माध्यमातून भगवंताची नवविधा भक्ती साकारतो. त्यामुळे कला-उपासक आणि भगवंत यांचे एक अतूट नाते निर्माण होते. यामध्ये कला-उपासना करणारा कलाकार भगवंताच्या अनुसंधानामुळे स्वतःचे अस्तित्व विसरतो आणि जशी दुधामध्ये साखर विरघळते, तसा तो कलेतून भगवंताशी एकरूपता अनुभवतो. कला-उपासकाच्या भावामुळे त्याच्यातील अहंकाराचाही लोप जलद गतीने होऊन तो भगवंताशी अधिक प्रमाणात एकरूपता सहजतेने साधू शकतो, उदा. आपल्या भारतभूमीमध्ये होऊन गेलेले संत मीराबाई, संत चैतन्य महाप्रभु, स्वामी हरिदास, संत तुकाराम महाराज इत्यादी. या संतांनी कलेतून भगवंताची आराधना करून, भगवंताचे स्मरण करून त्याची कृपा संपादन केल्याचे आपण मागील लेखांमधून जाणून घेतले आहे.

समाजामध्ये अधिकांश लोक हे भक्तीमार्गाचेच आचरण करणारे असतात. हा मार्ग सोपा आणि सर्वसामान्यांना सहजतेने आचरण करता येणारा आहे. ‘कलेतून भक्ती साकारणे’, हे भक्तीमार्गी उपासकाचे वैशिष्ट्य असते.

२ उ. गुरुकृपायोगी कला-उपासक : कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी साधकाला ‘गुरूंची प्राप्ती होणे’ महत्त्वाचे असते. शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज काळानुसार ‘कोणत्याही एका योगमार्गाने साधनारत राहून जलद गुरुप्राप्ती करून घेणे’, हे साधकाला कठीण आहे. त्यामुळे वरील चारही योगांचे मिश्रण असलेल्या आणि सर्वसामान्यांना सहजतेने आचरणात आणता येणार्‍या ‘गुरुकृपायोग’ या योगाची निर्मिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केली आहे. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करणारा कला-उपासक हा कलेतून ज्ञान, ध्यान, कर्म आणि भक्ती, हे चारही मार्ग आचरतो. त्यामुळे कलेतून साधना होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते.’

(‘गुरुकृपायोगानुसार साधना आणि कला’, याविषयी आपण पुढील लेखांमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत.)

– सौ. भक्ती कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.३.२०२६)

लेखांक १७ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1022424.html