भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध

गोळीबार करण्याची धमकी, बांगलादेशी नागरिकांनी दाखवली शस्त्रे

श्रीभूमी (आसाम) – येथे भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशी घुसखोरांना परत बांगलादेशात पाठवतांना मोठा गदारोळ निर्माण झाल्याची घटना २६ जूनच्या रात्री घडली. या वेळी भारताचे सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशाचे ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ (बीजीबी) आमनेसामने आले. या वेळी ‘बीजीबी’ने भारताच्या दिशेने बंदुका ताणल्या, तसेच अनेक बांगलादेशी नागरिक हातात शस्त्रे आणि काठ्या आदी घेऊन सीमेवर जमले. या वेळी सीमा सुरक्षा दलाला धमक्या देण्यात आल्या. हा संपूर्ण प्रकार बिलबारी सीमावर्ती भागात घडला. या परिसरात अद्यापही तणाव कायम आहे.

बिलबारी येथे बांगलादेशी नागरिकांच्या एका गटाला सीमेपलीकडील बांगलादेशाच्या भागातील न्यू पल्लाथलच्या दिशेने पाठवण्यात येत होते, तेव्हा हा वाद झाला. ‘बीजीबी’ने यावर तीव्र आक्षेप घेत या गटाला बांगलादेशाच्या सीमेत घेण्यास नकार दिला. तसेच सीमावर्ती गावांमधील बांगलादेशी नागरिक चाकू, लाठ्या आणि दांडे घेऊन ‘बीजीबी’च्या समर्थनार्थ जमा झाले. त्यांनी भारतीय सीमेच्या दिशेने शस्त्रेही दाखवले. ‘बीजीबी’च्या सैनिकांनी भोंग्यांवरून सीमा सुरक्षा दलाला वारंवार मागे हटण्यास सांगितले. ‘परिस्थिती बिघडल्यास गोळीबार करावा लागेल’, अशी धमकीही दिली. काही घंटे चाललेल्या या वादानंतर दोन्ही बाजूचे सैनिक तैनात होते; मात्र कोणतीही जीवितहानी किंवा गोळीबार झालेल्याचे वृत्त नाही.  सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी या वेळी संयम बाळगला आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

या नंतर दोन्ही बाजूंनी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली असून आसाम पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांना सतर्क करण्यात आले आहे. या घटनेविषयी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोरांना परत त्यांच्या देशात पाठवण्याला सातत्याने होणारा विरोध पहाता भारताने आता कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे !