पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !  

नागरिकांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी    

तहसीलदार प्रवीण लोकरे यांना निवेदन देतांना नागरिक

चिपळूण, २७ जून (वार्ता.) – पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळ गेली काही वर्षे एस्.आर्. ट्रेडर्स, हिंदुस्थान ट्रेडर्स आणि भारत ट्रेडर्स हे भंगार व्यावसायिक रासायनिक ‘ड्रम’ आणि अन्य रासायनिक प्रदूषण करणारे भंगार आणून तेथे धुणे आणि विक्री करणे, हा व्यवसाय करत आहेत. यामुळे तेथील नदी, भूमी, तसेच लोकवस्तीला या प्रदूषणाचा भयंकर त्रास होत आहे. या विरोधात त्वरित कायदेशीर कारवाई करून संबंधित प्रदूषणकारी व्यवसाय बंद करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन या परिसरातील नागरिकांनी तहसीलदार प्रवीण लोकरे, गट विकास अधिकारी उमा शिवाजीराव घारगे पाटील आणि महाराष्ट्र्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांना दिले. हे निवेदन दिल्यावर पुन्हा अधिकारी वर्गाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हे निवेदन देण्यासाठी पिंपळी खुर्द समर्थनगर येथील वासुदेव शिंदे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अनुराग उतेकर, उमेश महाडिक, प्रशांत उतेकर आणि समर्थनगर येथील रहिवासी उपस्थित होते.

गट विकास अधिकारी उमा शिवाजीराव घारगे यांना निवेदन देतांना नागरिक

या निवेदनात म्हटले आहे की,

१. या अवैध भंगार व्यवसायांचे प्रदूषण आता समर्थनगर, पिंपळी खुर्द नागरिकांच्या जिवावर बेतणारे ठरले आहे. एस्.आर्. ट्रेडर्स या अवैध भंगार व्यावसायिकाच्या रासायनिक प्रदूषणाची दुर्गंधी त्याच्या मागे असलेल्या इमारतीच्या घरातील ‘बेसिन’मधूनही घरात पसरत असल्याचे आढळले आहे.

२. या व्यावसायिकांच्या विरोधात याआधीही प्रशासन आणि एम्.पी.सी.बी.च्या (महाराष्ट्र्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या) चिपळूण कार्यालयात वारंवार भेटून तक्रार केली गेली; परंतु प्रशासन केवळ समज पत्राच्या पलीकडे जाऊन कारवाई करत नसल्याचे लक्षात येत आहे.

३.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात हे तिन्ही भंगार व्यवसाय प्रदूषण समस्या निर्माण करणारे आहेत आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असे अहवाल सादर करण्यात आले आहेत.

४. ‘भारत ट्रेडर्स’ या व्यवसायाकडे त्याच्या व्यवसायाचा परवानासुद्धा नाही, असे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असतांनाही प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित करत प्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.

५. एरव्ही प्रदूषणाविषयी अधिकारी वर्ग जनतेला अनेक प्रकारे सूचना देत असतो; मात्र प्रदूषण समस्या निर्माण करणारे आणि अवैध व्यवसाय करणारे यांच्या विरोधात योग्य कारवाई करत नसल्याने जनतेत संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

संपादकीय भूमिका

  • पर्यावरणाची हानी आणि मानवी आरोग्यावर परिणाम करणार्‍या व्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निवेदन का द्यावे लागते ? खरेतर प्रशासनाने स्वतःहून कारवाई करायला हवी !
  • प्रशासनाने केवळ समज पत्र देऊन वेळ काढण्यापेक्षा प्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करणे आवश्यक ठरते !