चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !

बांगलादेशाच्या दुसर्‍या सर्वांत मोठ्या बंदराजवळ चीन आर्थिक क्षेत्र विकसित करणार !

बीजिंग (चीन) – बांगलादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात येथे झालेल्या भेटीमध्ये बांगलादेशातील मोंगला बंदराजवळ एक आर्थिक क्षेत्र विकसित करण्यासाठी करार करण्यात आला. हा प्रकल्प बंगालच्या उपसागरात आणि व्यापक हिंद महासागर क्षेत्रात चीनची धोरणात्मक उपस्थिती वाढवू शकतो. बीजिंगने पाकिस्तानच्या ग्वादरपासून ते पूर्व आफ्रिकेतील जिबूतीपर्यंतच्या बंदरांमध्ये गुंतवणूक केली आहे. बांगलादेशाच्या बंदरापर्यंत पोहोच मिळवल्यामुळे आता चीनने भारताला ३ बाजूंनी घेरले आहे. पाकिस्तानचे ग्वादर बंदर चीनने विकसित केले आहे, तर दक्षिणेकडील श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावरही बीजिंगचे नियंत्रण आहे. आता पूर्वेला बांगलादेशाचे मोंगला बंदर बंगालच्या उपसागरात चीनची उपस्थिती निश्चित करेल.

विशेष म्हणजे मोंगला बंदर बांगलादेशाकडून भारताला विकसित करण्यासाठी मिळणार होते. या संदर्भात करारही झाला होता; मात्र बांगलादेशाच्या मागील महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारने हा करार रहित केला होता.

चीनने बांगलादेशाच्या ‘तीस्ता नदी व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवन’ प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे, जे भारताची चिंता वाढवणारे ठरेल. शेख हसीना यांच्या सरकारने तीस्ता प्रकल्प भारताला देण्याची इच्छा व्यक्त केली होती.