‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.
(लेखांक १७)
‘सदर लेखमालेतील मागील लेखात आपण ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती साधावी’, हे मार्गदर्शनपर सूत्र जाणून घेतले. भारतीय परंपरेत संगीत, नृत्य आणि नाट्य या कलांकडे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर ‘आध्यात्मिक उन्नतीचे साधन’ म्हणून पाहिले गेले आहे. ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांमध्ये प्रावीण्य मिळवणे’, ही कलाकाराची प्रगती असली, तरी तिला अंतर्मनातील भाव अन् साधना यांची जोड मिळाल्यास ही कला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग बनते. कलेतून साधना करण्याची इच्छा असलेल्या कलाकारामध्ये काही मूलभूत गुण असणे आवश्यक आहे.
भारतीय संगीतशास्त्रात गायक किंवा नर्तक यांच्यात आवश्यक असलेल्या गुणांचा उल्लेख आढळतो. हे गुण कलाकाराची कला अधिक परिपूर्ण बनवतात आणि त्याला उत्तम कलाकार म्हणून घडवतात. कलेतून साधना करण्यासाठी काही आध्यात्मिक स्तरावरील गुणही आवश्यक ठरतात. या गुणांच्या साहाय्याने कलाकार केवळ ‘कलाकार’ न रहाता ‘साधक-कलाकार’ म्हणून घडू शकतो. त्यामुळे कलेच्या माध्यमातून त्याची आध्यात्मिक उन्नती अधिक वेगाने होण्यास साहाय्य होते. आपण समाजात पहातो की, कला ही छंद, आवड किंवा वेळ घालवण्याचे माध्यम म्हणून शिकली जाते. त्यामुळे कला शिकतांना मनाप्रमाणे कृती अधिक प्रमाणात होतांना दिसते. सगळा विचार कलेच्या अंगानेच अधिक होतो. याउलट साधनेच्या अंगाने कला शिकतांना साधक-कलाकारामध्ये साधनेच्या दृष्टीने काही गुण असणे आवश्यक आहेत. हे गुण स्वतःमध्ये जोपासून कलाकार (कला-उपासक) कला शिकतांना साधनारत राहू शकतो. आजच्या लेखात आपण कलेतून साधनेसाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वपूर्ण गुणांविषयी जाणून घेणार आहोत.
(भाग १)
लेखांक १६ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1017423.html

१. कलेच्या समवेत साधनेचीही गोडी असणे
कलेतून साधनारत होण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक गुण, म्हणजे ‘साधनेची गोडी असणे’. साधना करण्याची गोडी असल्यास कलाकार मनापासून साधनारत राहू शकतो. कला आणि साधना हे दोन्ही तो आवडीने अन् उत्साहाने करू शकतो. त्यामुळे तो कलेतून साधनेत जलद गतीने प्रगती करू शकतो.
२. जिज्ञासा
‘जिज्ञासू हा ज्ञानाचा अधिकारी असतो’, असे म्हटले जाते. व्यक्तीच्या मनातील जिज्ञासाच त्याला ज्ञान मिळवण्यास पात्र ठरवते. त्याचप्रमाणे एखाद्या कलाकाराला अथवा कला शिकणार्याला कलेतून ईश्वरप्राप्ती करण्याची इच्छा असल्यास त्याच्यात साधनेची जिज्ञासा हवी. जिज्ञासेमुळे व्यक्ती सतत नवीन शिकण्याच्या विचारात असते. सतत जाणून घेण्याच्या वृत्तीमुळे तिचे मन विचारशील आणि जागृत रहाते.
३. विचारण्याची वृत्ती
‘एखाद्या विषयाची किंवा साधनेची जिज्ञासा असणे’, हा पहिला अन् महत्त्वाचा टप्पा आहे; परंतु केवळ मनात जिज्ञासा असल्याने कलाकाराला ‘त्याच्या कला-साधनेत पुढे कसे जायचे ?’, याविषयी मार्गदर्शन मिळू शकत नाही. यासाठी कलाकाराने मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मार्गदर्शन घ्यायला हवे. येथे ‘विचारणे’, हा पुढचा टप्पा येतो. समजा, कलाकाराला काही आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. तो काही नामजप आणि पूजा-अर्चा करत आहे; परंतु त्याने ‘माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणखी काय करणे अपेक्षित आहे ?’, याविषयी मार्गदर्शकांना विचारल्यास ते त्याला आध्यात्मिक स्तरावर दिशादर्शन करू शकतात. ही दिशा घेऊन त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास त्याला कला-साधनेत पुढे जाण्यास साहाय्य होते.
४. ऐकण्याची वृत्ती आणि तत्परतेने कृती करणे

जेव्हा आपण आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत किंवा मार्गदर्शक यांना कला-साधनेतील काही प्रश्न आणि शंका विचारतो, तेव्हा त्यांनी केलेले मार्गदर्शन ऐकल्यास आणि त्याप्रमाणे कृती केल्यास आपल्याला त्याचा अधिक लाभ होतो. आपल्या मनात जिज्ञासा निर्माण होऊन आपण प्रश्न विचारतो; परंतु इथपर्यंतच मर्यादित न रहाता प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर ते ऐकून आपण त्याप्रमाणे कृती करायला हवी. याचे उदाहरण, म्हणजे एखाद्याने आपल्याला नुसते ‘साखर पुष्कळ गोड आहे’, असे सांगून तिचे गुणगान केल्यावर आपल्याला साखरेची चव कळणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याचे म्हणणे ऐकून साखरेची चव स्वतः घ्यावी लागते. त्यानंतरच आपल्याला तिचा गोडवा अनुभवता येऊ शकतो. त्याचप्रमाणे कला-साधनेतील मार्गदर्शन मिळाल्यावर त्याप्रमाणे ऐकून कृती केल्यास आपल्यालाही विविध अनुभूती येऊ शकतात.
५. शिकण्याची वृत्ती
काही भारतीय तत्त्वज्ञानांनुसार अन् परंपरांमध्ये ‘शिकण्याची वृत्ती’, या गुणाला ‘गुणांचा राजा’, असेही म्हटले जाते. या गुणामुळे प्रगतीचे द्वार आपोआप उघडते. आपण केवळ कलाक्षेत्रातच नव्हे, तर कोणत्याही क्षेत्रात असलो, तरीही आपल्यात ‘शिकण्याची वृत्ती’ असेल, तर ‘मला येते, मला जमते’, या अहंकारापासून आपण दूर राहू शकतो. या गुणामुळे व्यक्ती नम्रभावात राहू शकते. ती सतत इतरांकडून शिकत रहाते. शिकण्याला मर्यादा नसल्याने आपण लहान-मोठे, अशा सगळ्यांकडून शिकू शकतो. सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने कलाकार-साधकाला आनंद मिळू लागतो.
५ अ. एका प्रसिद्ध कलाकाराने शिकण्याच्या वृत्तीविषयी सांगितलेले सूत्र ! : एका प्रसिद्ध कलाकाराला त्याच्या एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला गेला, ‘‘तुम्हाला सर्वांत मोठी प्रेरणा कुणाकडून मिळाली ?’’ त्यावर त्या कलाकाराने सांगितले, ‘‘माझे लहान आणि तरुण विद्यार्थी हीच माझी मोठी प्रेरणा आहे. त्यांची शिकण्याची तळमळ आणि जिद्द यांमुळे मला त्यांच्याकडून शिकता येते. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते.’’ एक प्रसिद्ध कलाकारसुद्धा त्याच्याहून वयाने अन् अनुभवाने पुष्कळ लहान असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिकू शकतो. हा कला-साधनेतील एक महत्त्वाचा गुण आहे. ‘शिकण्याच्या स्थितीत रहाणे’, या गुणामुळे आध्यात्मिक उन्नती जलद होऊ शकते.
५ आ. चुका आणि अपयश यांतून शिकल्यास शिकण्यातील आनंद अनुभवता येणे : कला शिकणारे कलाकार किंवा बाल-कलाकार यांच्यामध्येसुद्धा ‘शिकणे’, हा गुण असणे महत्त्वाचे आहे. चुका आणि अपयश यांतून शिकल्यास आपल्याला दुःख न होता आपण शिकण्यातला आनंद अनुभवू शकतो. कलेची परीक्षा किंवा स्पर्धा असल्यास त्यात अल्प गुण प्राप्त झाले अथवा निवड झाली नाही, तर बर्याच वेळा कलाकारांना निराशा येते. जर आपण आपल्यामध्ये शिकण्याची वृत्ती निर्माण केली, तर अशा वेळी आपली प्रयत्न करण्याची जिद्द वाढते. त्यामुळे आपले प्रयत्न आपोआप सकारात्मकतेने होऊ लागतात. शिकण्याची वृत्ती आपल्या साधनेला पूरक आहे; कारण साधना आपल्याला यशात अडकू देत नाही आणि अपयशात खचू देत नाही. त्यामुळे शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
६. तळमळ
‘प्रयत्न करण्याची तळमळ असेल, तर असाध्य गोष्टीही साध्य होऊ शकतात’, असे म्हटले जाते. ‘तळमळ’ हा गुण कला-साधनेत प्रगती करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. ‘प्रयत्नांती परमेश्वर (म्हणजे प्रयत्न केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते.)’, असे म्हणतात, त्याचप्रमाणे गुरु अथवा मार्गदर्शक यांनी सांगितलेली साधना तळमळीने अन् सातत्याने केली, तर कला शिकणार्याला अथवा कला साधनेला जोडू इच्छिणार्याला जलद गतीने पुढे जाता येते.
पुढील भागात आपण कला-उपासकामध्ये कलेतून साधनेसाठी आवश्यक असलेले आणखी काही गुण जाणून घेणार आहोत.’ (क्रमशः)
संग्राहक : कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे) आणि सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (११.३.२०२६)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1027736.html
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. – संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता
श्री. अभिजीत सावंत
संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ईमेल : [email protected]
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !