सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून कलाकारांना कलेकडे साधना म्हणून पहाण्याविषयी केलेले मार्गदर्शन !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. भगवद्भक्ती करण्याचे माध्यम असणार्‍या आणि मंदिर संस्कृतीशी संलग्न असलेल्या या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश आता काळाच्या प्रभावामुळे पालटत चालला आहे.

(लेखांक १५)

‘आतापर्यंतच्या लेखांत आपण ‘कलेचा इतिहास, कलानिर्मितीचा मूळ उद्देश आणि सध्या कलेचा विकृतीकडे होणारा प्रवास’, समजून घेतले. आजच्या लेखात आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलेतून साधना होण्यासाठी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे आणि त्यांचे विश्लेषण जाणून घेणार आहोत.

लेखांक १४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1012180.html

आज मनुष्य कलेचा मूळ उद्देश, म्हणजे ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ विसरला आहे. कलाक्षेत्रातील वाढती विकृती, तसेच कलेतील वाढलेल्या रज-तमाचा प्रभाव पहाता समाजाला कलेच्या मूळ उद्देशाकडे, म्हणजे ईश्वरप्राप्तीकडे नेण्याची आवश्यकता आहे.

श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।

अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा र्‍हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी माझे रूप रचतो, म्हणजे आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो.

हे लक्षात घेऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘समाजाला १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमातून साधनेसाठी मार्गदर्शन व्हावे’, यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना केली आहे. ‘कला आणि विद्या हे ईश्वरप्राप्तीसाठीचे साधन बनवून मनुष्य ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जलद मार्गक्रमण करून या जन्माचे सार्थक करू शकतो’, याविषयीचे मार्गदर्शन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलेतून साधना होण्यासाठी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे आणि त्यांचे विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘कलाकाराने केवळ कलेमध्ये न अडकता कलेतून ईश्वरप्राप्ती करून मनुष्यजन्माचे सार्थक करणे आवश्यक !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विश्लेषण : ‘प्रारब्धभोग भोगणे आणि ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे’, यांसाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळाला आहे. त्यामुळे ‘याच जन्मात साधना करून ईश्वरप्राप्ती करणे’, हे मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय आहे. कलाकारांना साधनेसाठी कलेचे माध्यम वापरणे सोपे जाते. त्यामुळे केवळ कलेसाठी किंवा लोकांसाठी कला न करता कलाकाराने ‘कलेतून साधना करणे किंवा कलेला साधनेची जोड देणे’, हे मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी महत्त्वाचे आहे. कलाकाराची साधना नसेल, तर तो पुनःपुन्हा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकू शकतो. कलेतून साधनेसाठी प्रयत्न केल्याने कलाकाराची आध्यात्मिक उन्नती होऊन त्याचा प्रवास सत्-िचत्-आनंदाकडे होऊ लागतो.

‘कलेतून साधनेसाठी प्रथमतः स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून साधनेचा पाया सिद्ध करणे आवश्यक !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विश्लेषण : आज मनुष्याचे स्वभावदोष आणि अहंकार हे त्याच्या मानसिक अशांतीचे कारण ठरत आहेत, तसेच तो कलेतील साधनेपासून वंचित रहात आहे. याचा परिणाम, म्हणजे त्याचा कल कलेकडे साधना म्हणून न रहाता ‘एक छंद, मनोरंजन, पैसा आणि प्रसिद्धी मिळवणे’, यांकडे वाढत असलेला दिसत आहे. त्यामुळे आजच्या काळात कलेतून साधना होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा स्वभावदोष आणि अहंकार न्यून होऊन कलाकाराचा साधनेचा पाया सिद्ध झाला की, त्याची कलेतून साधनेची इमारत चांगल्या पद्धतीने उभी राहू शकते. शुद्ध, सात्त्विक कलाकाराकडून सात्त्विक कला प्रस्तुत होते आणि यातून त्या कलाकाराची साधनाही होते.

‘आज काळानुसार केवळ कला केल्याने साधना होत नाही. कलेला साधनेची जोड देणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विश्लेषण : दिवसभरामध्ये आपण कलेसाठी काही घंटे देतो. तेवढाच वेळ आपण कलेच्या विचारांमध्ये असतो; परंतु अन्य वेळेचे काय ? ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन आणि जाणीवपूर्वक करण्याचे प्रयत्न ! आपल्या मनात अनेक विचार असतात. व्यक्तीचे स्वभावदोष आणि अहंकार हेही केवळ काही घंटे कलेचा अभ्यास करण्याने दूर होत नाहीत. कलेच्या सादरीकरणाच्या वेळी कलाकाराला साध्य झालेली निर्विचार अवस्था, भावस्थिती इत्यादी दिवसभराच्या विविध परिस्थितींमध्ये टिकून रहाणे कठीण जाते. आजच्या काळात कलाकारही प्रापंचिक असल्याने त्याला दैनंदिन जीवनात विविध चांगल्या-वाईट परिस्थितींमधून जावे लागते. त्यामुळे आताच्या काळात कलाकाराचा सत्त्वगुण वाढण्यासाठी केवळ कला पुरेशी नसून ‘त्याने कलेला साधनेची जोड देणे’ आवश्यकच आहे.

‘पंचतत्त्वांपैकी संगीत (गायन, वादन आणि नृत्य) आकाशतत्त्वाशी निगडित असल्याने त्यातून श्रेष्ठ अनुभूती येतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विश्लेषण : सृष्टीमधील प्रत्येक घटक हा पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांशी निगडित आहे. त्यामुळे विविध कलासुद्धा विविध तत्त्वांशी संबंधित आहेत, उदा. मूर्तीकला ही पृथ्वीतत्त्वाशी, तर चित्रकला ही तेजतत्त्वाशी निगडित आहे. त्याचप्रमाणे नृत्यकला ही वायु आणि आकाश या तत्त्वांशी, तर गायन अन् वादन या कला आकाशतत्त्वाशी संबंधित आहेत. पृथ्वीतत्त्व आणि तेजतत्त्व यांमुळे येणार्‍या अनुभूती या आकाशतत्त्वापेक्षा मर्यादित असतात. त्यामुळे चित्रकला आणि मूर्तीकला यांतून येणार्‍या अनुभूती या मर्यादित आहेत; परंतु गायन, वादन अन् नृत्य या कला आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने त्याद्वारे उच्च स्तराच्या अनुभूती येतात.

अन्य विद्यापिठांपेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्थापन केलेल्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे वेगळेपण !

महर्षी

‘आज आपण समाजात पहातो की, कला आणि विद्या शिकवणारी अनेक विद्यापिठे अस्तित्वात आहेत. तेथे आपल्याला पोटभरू, नोकरी मिळण्याच्या दृष्टीने शिक्षण मिळते; परंतु शिक्षणासहित व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवणारे एकही विद्यापीठ अस्तित्वात नाही. मनुष्याचा सर्वांगीण विकास, म्हणजे त्याच्या लौकिक विकासासह पारलौकिक विकासही होणे. ‘हे साध्य करणारे एक विद्यापीठ असावे’, असा विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा होता. त्या दृष्टीने त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना केली. या विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य सांगतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘या विद्यापिठातून शिकलेल्या मनुष्याला कागदी प्रमाणपत्राची आवश्यकता नसणार. त्याच्याकडे पाहूनच समाजाला त्याची उन्नती दिसून येईल. ते संत होऊनच बाहेर पडतील, म्हणजेच कला आणि विद्या यांना साधनेची जोड दिल्याने व्यक्तीच्या साधनेच्या तेजामुळेच त्याची उन्नती समाजाला कळून येईल.’’

– कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.२.२०२६)

‘केवळ स्थुलातून कला अनुभवण्यापेक्षा सूक्ष्मातून कलेचा अनुभव घेणे अधिक श्रेष्ठ आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विश्लेषण : आज समाजातील लाखो कलाकार अनेक वर्षांपासून कला शिकत आहेत आणि सादर करत आहेत; परंतु त्यांना कलेतील एकही अनुभूती घेता आलेली नाही. त्यांचे आयुष्य केवळ लोकांसाठी कला सादर करण्यातच गेले आहे.

भारतीय कलांना आध्यात्मिक अधिष्ठान आहे. त्यामुळे या कला आपल्याला मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मातील विविध अनुभूती देऊ शकतात. याची इतिहासातील उदाहरणे, म्हणजे ‘राग ‘मल्हार’ गाऊन पाऊस पडणे, राग ‘दीपक’ गाऊन दिवे प्रज्वलित होणे, संगीतातून समाधी अवस्था प्राप्त होणे, नृत्यातून ध्यान लागणे’ इत्यादी; परंतु आज कलाकारांच्या कलेला साधनेचा पाया राहिलेला नसल्याने या उच्च अनुभूतींपासून कलाकार वंचित रहात आहेत. त्यामुळे आयुष्यभर तो केवळ स्थुलातून गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांचे सादरीकरण करत रहातो.

साधनेमुळे कलाकाराची साधना वाढत जाते आणि त्याची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता वाढू लागते. त्यामुळे तो कलांमधील सूक्ष्म अनुभूती अनुभवू शकतो. कलाकाराने कलेच्या केवळ स्थुलातील सादरीकरणापेक्षा या कलांमधील देवत्वाची सूक्ष्म अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलेला साधनेची जोड दिल्याने आध्यात्मिक उन्नती झालेल्या कलाकारांची ओळख समाजाला करून दिलेली असणे

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे केवळ ‘कलेतून साधना करावी’, याविषयी सांगून थांबले नाहीत. तर त्यांनी कलेला साधना जोडून साधनेत प्रगती केलेल्या काही कलाकारांना ओळखले आणि ‘अशा प्रकारे साधनारत होता येते’, हेही त्यांनी दाखवून दिले आहे.

समाजातील बरेच कलाकार असे आहेत, जे केवळ कलेसाठी कला करत नाहीत, तर कलेसह त्यांची साधनाही चालू आहे. त्यामुळे समाजातील काही कलाकारांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, तसेच काही जण संतपदीही पोचले आहेत. अशा काही कलाकारांची ओळख सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समाजाला करून दिली आहे.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी कलेतून साधनेविषयी केलेल्या या अमूल्य मार्गदर्शनाचे सविस्तर विवेचन आणि कृतीच्या स्तरावर त्या अनुषंगाने करायचे प्रयत्न’ आपण या लेखमालेच्या पुढील भागांमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत.’

– कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.२.२०२६)

लेखांक १६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1017423.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक