
तेहरान (इराण) / वॉशिंग्टन (अमेरिका) / नवी देहली – जर अमेरिकेने भूमीवरील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर इराणचे सैन्य तिला तेवढ्याच शक्तीने उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. अमेरिकेसमवेत युद्धबंदीची चर्चा होणार नाही. युद्ध थांबवण्यासाठी इराणकडून वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
अराघची पुढे म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की, आम्ही अमेरिकेचा सामना करू आणि तिच्यासाठी हे मोठे संकट असेल. आम्ही तिची वाट पहात आहोत. याचा अर्थ आम्ही युद्ध चालू ठेवण्यासाठी हे बोलत आहोत, असे नाही; पण आम्ही कोणतीही परिस्थिती, कोणतेही आव्हान आणि शक्यता यांना तोंड देण्यासाठी सज्ज आहोत, हे आम्हाला याठिकाणी सांगायचे आहे.
इराणने माझ्या अनुमतीखेरीज सर्वोच्च नेता निवडू नये ! – ट्रम्प यांची चेतावणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, नवीन नेता निवडण्यात अमेरिकेची भूमिका आवश्यक आहे आणि अमेरिकेच्या सहभागाविना असे करणे वेळेचा अपव्यय ठरेल. जर इराणने अमेरिकेच्या सहभागाविना नवीन सर्वोच्च नेत्याची निवड केली, तर ते निरर्थक ठरेल. खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांना संभाव्य उत्तराधिकारी म्हणून विचारात घेतले जात आहे; परंतु ते स्वीकारले जाणार नाही. जर नवीन नेत्याने जुन्या नेतृत्वाची धोरणे चालू ठेवली, तर येत्या काही वर्षांत अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आणखी एक संघर्ष होऊ शकतो. अमेरिकेला इराणमध्ये असा नेता हवा आहे जो तेथे शांतता आणि स्थिरता आणू शकेल.
ट्रम्प न्यूयॉर्कचे महापौर नियुक्त करू शकत नाहीत, आमचे नेते काय ठरवणार? – इराण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प इराणमध्ये नेतृत्व पालटण्याची चर्चा करतात. वास्तव हे आहे की, ते स्वतःच्या देशात न्यूयॉर्क शहराचा महापौरही नियुक्त करू शकत नाहीत. हा एक प्रकारचा वसाहतवादी दृष्टीकोन आहे. ते स्वतःच्या देशात लोकशाहीची चर्चा करतात; पण इराणच्या लोकशाही सरकारला पाडू इच्छितात, अशी टीका इराणचे उप परराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी देहलीतील ‘रायसीना डायलॉग २०२६’ कार्यक्रमात केली.
खतीबजादेह पुढे म्हणाले की, तेहरानकडे अमेरिकी-इस्रायली आक्रमणांविरुद्ध देशाचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही. आम्ही शपथ घेतली आहे की, शेवटच्या गोळीपर्यंत आणि शेवटच्या सैनिकापर्यंत आम्ही विरोध करत राहू.
भारतासमवेतच्या संबंधांवर त्यांनी सांगितले की, त्यांची भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी थोडक्यात भेट झाली आहे. इराण आणि भारत यांच्यात जुने सांस्कृतिक संबंध आहेत आणि दोन्ही देश या नात्यांना पुष्कळ महत्त्व देतात.
मध्यपूर्व आणि युक्रेन येथील युद्ध लवकर संपले पाहिजे ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यपूर्व आणि युक्रेन येथे चालू असलेले युद्ध लवकर संपवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सैनिकी संघर्षातून कोणताही प्रश्न सुटू शकत नाही. भारत सर्व वादांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील.
कोणताही देश स्वतःला ‘सर्वोच्च शक्ती’ म्हणू शकत नाही ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

वैश्विक तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी देहली येथे आयोजित ‘रायसीना डायलॉग २०२६’ मध्ये बोलतांना सांगितले की, आज कोणताही देश पूर्णपणे वर्चस्व गाजवणारा नाही. २० व्या शतकाच्या मध्यापासून एक ठराविक जागतिक व्यवस्था कायम राखली जाईल, अशी जागतिक अपेक्षा ‘अवास्तव’ होती. आज जागतिक राजकारणाचे विश्लेषण बहुधा अमेरिकेभोवती केंद्रित केले जाते; मात्र प्रत्यक्षात जग हळूहळू अनेक शक्तींमध्ये विभागले जात आहे. सध्याच्या घडीला अर्थव्यवस्था, सैन्यशक्ती, तंत्रज्ञान किंवा कूटनीती अशा सर्व क्षेत्रांत पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकेल, असा कोणताही देश अस्तित्वात नाही.
डॉ. जयशंकर यांच्या मते, आज शक्तीचा अर्थ केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा सैन्यशक्ती इतकाच राहिलेला नाही. जगातील वेगवेगळे प्रदेश विविध क्षेत्रांत सशक्त होत आहेत; त्यामुळे जागतिक शक्ती आता अनेक देश आणि प्रदेश यांच्यामध्ये पसरलेली आहे.
भारत ३० दिवसांपर्यंत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करू शकेल ! – अमेरिका
भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सूट मिळाली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्पांना ३० दिवसांचा विशेष परवाना दिला आहे. हा परवाना ३ एप्रिलपर्यंत वैध राहील.
अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणांतर्गत हे तात्पुरते पाऊल उचलण्यात आले आहे. भारत अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे आणि जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी ही सूट देण्यात आली आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की, यानंतर भारत अमेरिकी तेलाच्या खरेदीत वाढ करेल.
इराणसमवेतच्या युद्धाच्या काळात व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच प्रार्थना !
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध ७ दिवसांनंतरही थांबण्याचे नाव घेत नसतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आता ईश्वराकडे साकडे घातले आहे. ६ मार्च या दिवशी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ऐतिहासिक ‘ओव्हल ऑफिस’मध्ये ख्रिस्ती पद्धतीनुसार प्रार्थना केली. या विशेष प्रार्थनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी अशा प्रकारे सार्वजनिकरित्या प्रार्थना करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ट्रम्प यांनी देशभरातील प्रमुख पाद्र्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. स्वतःच्या खुर्चीवर बसून ट्रम्प यांनी डोळे मिटून प्रार्थना केली. या वेळी एका पाद्र्याने ट्रम्प यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले. ‘हे ईश्वरा, आमच्या राष्ट्राध्यक्षांना हे राष्ट्र चालवण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती प्रदान कर. युद्धभूमीवर लढणार्या आमच्या शूर सैनिक आणि महिला यांचे रक्षण कर’, अशी सामूहिक प्रार्थना या वेळी करण्यात आली.
इस्रायलने इराणचे ६ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण यंत्र (लॉन्चर) नष्ट केले !
युद्धाच्या ७ व्या दिवशी इस्रायलने इराणचे ६ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण यंत्र (लॉन्चर) नष्ट केले आहेत. या कारवाईचा व्हिडिओ इस्रायली सैन्याने प्रसारित केला आहे.
⭕️Overnight Activity:
IAF aircraft struck and dismantled an armed ballistic missile launcher in the area of Qom that was ready to fire at Israel.
An Iranian aerial defense system was also struck in Isfahan.❗️Prior to the strikes, the IDF took multiple measures to mitigate the… pic.twitter.com/Wdm5MbW95n
— Israel Defense Forces (@IDF) March 5, 2026
या क्षेपणास्त्र प्रक्षेपण यंत्रांमधून इराण इस्रायलवर सतत आक्रमणे करत होता. याखेरीज इस्रायलने इराणची ३ प्रगत संरक्षण व्यवस्था (डिफेन्स सिस्टिम) देखील नष्ट केल्याचे सांगितले आहे.
अमेरिकेचा पराभव होणार ! – चीनच्या शिक्षणतज्ञाचे भाकीत
चीनची राजधानी बीजिंगमधील शिक्षणतज्ञ शुएक्किन जियांग यांनी वर्ष २०२४ मध्ये ३ मोठी भाकिते केली होती. वर्ष २०२५ मध्ये अमेरिकेत डॉनल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार, ट्रम्प इराणवर आक्रमण करणार आणि यात त्यांचा पराभव होणार, अशी भाकिते केली होती. यांतील २ भाकिते खरी ठरली आहेत. तिसरे भाकित खरे ठरणार का ? हे पहावे लागणार आहे. ‘इराणची भौगोलिक रचना अमेरिकी सैन्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते. त्याखेरीज इराणच्या सैन्याचा कडवा प्रतिकार अमेरिकेच्या आधुनिक शस्त्रास्त्रांना भारी पडू शकतो. इराणची ही भौगोलिक परिस्थिती युद्धाचे पारडे त्यांच्या बाजूने झुकवणार आणि अमेरिकेला पराजयाची माती खावी लागणार’, असे जियांग यांनी म्हटले आहे.
अमेरिका दुर्बल होत आहे !
जियांग यांच्या मते, मध्यपूर्वेतील हे युद्ध आता एका निर्णायक टप्प्यावर आले असून अमेरिका हळूहळू दुर्बल होत आहे. इराण गेल्या २० वर्षांपासून या संघर्षाची सिद्धता करत असल्याने अमेरिकेसमोर अत्यंत कठीण आव्हाने असणार आहेत. जून २०२५ मध्ये अमेरिका आणि इराणमध्ये झालेला १२ दिवसांचा संघर्ष हा इराणसाठी एका तालमीसारखा होता. त्या १२ दिवसांच्या युद्धात इराणने इस्रायल आणि अमेरिका या दोघांच्याही आक्रमण करण्याच्या क्षमतेचा बारकाईने अभ्यास केला. ८ महिन्यांपासून इराण या नवीन आक्रमणासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे, असे जियांग यांनी नमूद केले.
जिहादी संघटनांचे साहाय्य
लेबनॉनमधील इराणसमर्थक आतंकवादी गट हिजबुल्ला, येमेनमधील हुती बंडखोर आणि गाझामधील हमास अन् पॅलेस्टिनी या जिहादी संघटनांना अमेरिकेची रणनीती आणि मानसिकता पूर्णपणे समजली असल्याचा दावा जियांग यांनी केला आहे. अमेरिकी साम्राज्याला कसे दुर्बल करायचे आणि शेवटी ते कसे नष्ट करायचे, याची एक अचूक रणनीती आता त्यांच्याकडे सिद्ध असल्याचे जियांग यांनी म्हटले आहे.
जियांग यांनी एक मोठी चेतावणी देतांना सांगितले की, इराणी सैन्य केवळ अमेरिकेशी नव्हे, तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेविरुद्ध युद्ध पुकारत आहे. त्यांच्या या रणनीतीमुळे जागतिक बाजारपेठ आणि पुरवठा साखळीवर भीषण परिणाम होऊ शकतात, ज्याचा फटका पर्यायाने अमेरिकेलाच बसेल.
श्रीलंकेने दिले इराणी युद्धनौकेला आश्रय
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या सरकारने हिंद महासागरात अमेरिकेच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी इराणी युद्धनौकेला त्याच्या बंदरावर आश्रय दिला आहे. २ दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणच्या युद्धनौकेला श्रीलंकेजवळील समुद्रात लक्ष्य करून बुडवले होते. यात ८७ सैनिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहे. या नौकेने श्रीलंकेकडे आश्रय मागितला होता; मात्र त्या वेळी श्रीलंकेने नकार दिला होता. आता श्रीलंकेने स्वतःची चूक सुधारल्याचे म्हटले जात आहे.

Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक