युद्ध थांबवण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत ! – Iran

चर्चेची वेळ आता निघून गेली ! – ट्रम्प यांचे उत्तर

डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही व डॉनल्ड ट्रम्प

तेहरान (इराण) / वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – इराणचे ठार झालेले सर्वाेच्च नेते खामेनी यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी ‘ए.एन्.आय.’ (एशियन न्यूज इंटरनॅशनल) वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही युद्ध थांबवण्यासाठी सिद्ध आहोत. आम्ही चर्चेसाठीही सिद्ध आहोत; मात्र चर्चा सन्मानपूर्वक झाली पाहिजे; इराणविरुद्ध आदेश देण्यासाठी नव्हे. आम्ही आत्मसंरक्षण करत आहोत. आम्ही आमचा अधिकार मागत आहोत.’ इलाही यांच्या या आवाहनावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प उत्तर देतांना म्हणाले की, इराणशी चर्चेची वेळ आता निघून गेली आहे. इस्रायलने आमच्याकडे आक्रमणासाठी साहाय्य मागितले नव्हते. आम्हीच त्यांच्या साहाय्याला आलो आहोत; कारण इराण आक्रमण करणार असल्याची माहिती आमच्याकडे होती.

ठळक घडामोडी

  • अमेरिकेने इराणच्या १७ युद्धनौका आणि १ पाणबुडी बुडवली
  • इराणकडून बहरीनमध्ये ७३ क्षेपणास्त्रे आणि ९१ ड्रोन, संयुक्त अरब अमिरातवर १८६ क्षेपणास्त्रे आणि ८१२ ड्रोन यांद्वारे आक्रमण
  • ५ दिवसांत अमेरिकेकडून २ सहस्र ठिकाणी आक्रमणे
  • दुबईतील अमेरिकेच्या दूतावासावर आक्रमण
  • अमेरिकेचे ६५० सैनिक ठार झाल्याचा इराणचा दावा, तर इराणमध्ये १ सहस्र १०० जणांचा मृत्यू
  • फ्रान्सने संयुक्त अरब अमिरात येथील तळावर तैनात केली राफेल लढाऊ विमाने
  • कतारकडून इराणी सैन्याच्या १० गुप्तहेरांना अटक
  • अमेरिकेकडून सौदी अरेबिया, इस्रायल, जॉर्डन, बहरीन, इराक, ओमानसह १४ देशांत सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना देश सोडण्याचा आदेश

मोजताब खामेनी नवीन धार्मिक प्रमुख

मोजताब खामेनी

अमेरिका आणि इस्रायल यांच्या आक्रमणात इराणचे शिया मुसलमानांचे सर्वाेच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनी यांना ठार झाल्यानंतर आता इराणने खामेनी यांचे कनिष्ठ पुत्र मोजताब खामेनी यांची अधिकृतरित्या प्रमुख धर्मगुरु म्हणून नियुक्ती केल्याचे वृत्त प्रसारित झाले. तथापि इराणच्या मुंबईतील उच्चायुक्तालयाने ‘एक्स’वर पोस्ट करत ‘अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही’, असे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीच्या वेळीही इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून आक्रमण करण्यात आले. ही बैठक तेहरानमध्ये अनुमाने १३० कि.मी. दक्षिणेला कोम शहरामधील ‘मजलिस-ए-खोबरेगॉन’ या इमारतीत आयोजित करण्यात आली होती. या इमारतीवर आक्रमण करून ती उद्ध्वस्त करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत ८८ धार्मिक नेते उपस्थित होते. यातील किती जण ठार झाले ? किंवा किती हानी झाली ?, हे समजू शकलेले नाही.

इराण युद्ध थांबवण्याठीच आखाती देशांवर करत आहे आक्रमणे ! – इराणमधील भारताचे माजी राजदूत के.पी. फाबियान

के.पी. फाबियान

इराणमधील भारताचे माजी राजदूत के.पी. फाबियान यांनी सांगितले की, इराणची अरब देशांवरील आक्रमणे अमेरिका आणि इस्रायल यांना युद्ध थांबवण्यास भाग पाडण्यासाठी आहेत. जर या देशांवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळेल. होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद करणे, हा इराणचा निर्णायक आघात (मास्टरस्ट्रोक) आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढणार आहेत. इराणने त्याचा क्षेपणास्त्र साठा जपून ठेवला असून तो दीर्घ युद्धासाठी सज्ज आहे.

अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांच्या साठ्यात होत आहे घट !

अमेरिकेचा संरक्षण विभाग ‘पेंटागॉन’च्या माहितीनुसार जर इराणवरील अमेरिकी आक्रमणे पुढील १० दिवस चालू राहिले, तर महत्त्वाच्या क्षेपणास्त्रांचा साठा लक्षणीयरित्या अल्प होऊ शकतो. वरिष्ठ अमेरिकी अधिकार्‍याचा संदर्भ दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेकडे ‘टॉमहॉक’ क्षेपणास्त्रे आणि ‘एस्एम्-३ इंटरसेप्टर’सह प्रमुख क्षेपणास्त्र प्रणाली यांची आधीपासूनच टंचाई आहे. साठ्यात सातत्याने घट होत आहे. अशात पुढील २४ घंट्यांत आक्रमणांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रशियाविरुद्धच्या ४ वर्षांच्या संघर्षात युक्रेनच्या हवाई संरक्षण दलांनी मोठ्या प्रमाणात अमेरिकेचा साठा वापरल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मागील संघर्षात अमेरिकेने अनुमाने २५ टक्के साठा वापरला होता. युद्धनौकांवर तैनात अनेक क्षेपणास्त्रे आधीच संपली आहेत. इराण प्रत्येक महिन्याला १०० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन करत आहे, तर अमेरिका केवळ ६-७  क्षेपणास्त्रे बनवत  आहे.

कच्च्या तेलांच्या किमतीत सातत्याने होत आहे वाढ !

युद्धाच्या ४ दिवसांतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १४ टक्क्यांनी वाढल्या आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने तेथून होणारी तेल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रती बॅरल १५ डॉलर्सची तात्काळ वाढ झाल्यास देशाची वित्तीय तूट नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनी मात्र भारताकडे इंधनाचे आणखी स्रोत असल्याचा दावा केला आहे.

भारताकडे ४५ दिवसांचा तेलसाठा

भारताकडे तातडीच्या पुरवठ्यासाठी अनुमाने २५ दिवसांचा तेलसाठा अधिकृतरित्या उपलब्ध आहे. व्यावसायिक आणि धोरणात्मक एकत्रित तेलसाठा धरला, तर अनुमाने ४० ते ४५ दिवस पुरेल, इतका तेलसाठा आहे. याच्या आधारे काही आठवड्यांपर्यंत पुरवठा सुसंगत राहू शकतो. दीर्घकालीन आणि गंभीर पुरवठा अडथळ्यासाठी अधिक साठा आवश्यक आहे.

रशियाकडून भारताला तेल पुरवण्याचे संकेत

तेल उत्पादक आखाती देशांतील युद्धस्थितीमुळे भारताला होणारा तेलपुरवठा ठप्प होण्याच्या स्थितीत असतांना रशियाने तो भारताला तेलपुरवठा करण्यास सिद्ध असल्याचे संकेत दिले आहेत, असे एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेने रशियावर निर्बंध घातल्यानंतरही भारत रशियाकडून तेलखरेदी करत असतांना अमेरिकेचा दबाव आणि निर्बंध यांमुळे या खरेदीत घट झाली आहे. आता पुन्हा त्यात वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इराकमधील कुर्द मिलिशिया संघटनेचे साहाय्य घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.ने इराकमधील कुर्द मिलिशिया या आतंकवादी संघटनेला शस्त्रसाहाय्य देण्यावर काम चालू केल्याची माहिती सी.एन्.एन्. (केबल न्यूज नेटवर्क) वृत्तवाहिनीने दिली आहे. ट्रम्प प्रशासन इराकमधील कुर्द नेत्यांशी सैनिकी साहाय्याविषयी चर्चा करत असल्याचेही सांगितले जाते.

इराणी कुर्द सशस्त्र गटांचे सहस्रो लढवय्ये इराक-इराण सीमेवरील कुर्दिस्तान भागात सक्रीय आहेत. अमेरिकेच्या इराणवरील आक्रमणानंतर इराणने ‘डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इराणी कुर्दिस्तान’वर आक्रमण चालू केले आहे. या संघटनेचे अध्यक्ष मुस्तफा हिजरी यांच्याशी ट्रम्प यांनी चर्चा केली आहे. दुसरीकडे इराकमधील शिया मिलिशिया गट इराणला साहाय्य करत आहे.

स्पेनने अमेरिकेला अपेक्षित पाठिंबा न दिल्याने ट्रम्प यांच्याकडून स्पेनला व्यापार बंद करण्याची धमकी

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ

आम्ही स्पेनसमवेत सर्व व्यापार थांबवणार आहोत. आम्हाला स्पेनशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. इराणवरील अमेरिका आणि इस्रायल यांच्या आक्रमणांना स्पेनकडून अपेक्षित पाठिंबा न मिळणे, तसेच ‘नाटो’मध्ये वाटा वाढवण्यास नकार देणे, या पार्श्वभूमीवर ही भूमिका समोर आली. स्पेन हा युरोपीय संघाचा सदस्य देश असल्याने व्यापार कसा बंद केला जाईल ?, याविषयी ट्रम्प यांच्या विधानात स्पष्टता नाही. युरोपीय संघ २७ सदस्य देशांच्या वतीने व्यापार करारांवर चर्चा करतो.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी इराणवरील आक्रमणांवर टीका केली आणि म्हटले की, स्पेन युद्धाच्या विरोधात असून अशा कृतींमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.


भारतातून परतणारी इराणी युद्धनौका अमेरिकेने श्रीलंकेजवळ बुडवली : ८० सैनिकांचा मृत्यू 

कोलंबो (श्रीलंका) – भारतातून परतणार्‍या ‘आयआर्आयएस् देना’ या इराणी युद्धनौकेवर अमेरिकेने श्रीलंकेजवळ आक्रमण करून ती बुडवली. यात नौकेवरील ८० सैनिकांचा मृत्यू झाला, तर ३२ जणांना श्रीलंकेच्या नौदलाकडून वाचवण्यात आले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी सांगितले की, अमेरिकेच्या पाणबुडीने हिंद महासागरात इराणी युद्धनौकेला टॉर्पेडो क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य करून बुडवले. या नौकेवर एकूण १८० लोक होते. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. गेल्या महिन्यात भारतातील विशाखापट्टणम् येथे झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू’मधून (युद्धनौकांची प्रात्यक्षिके) इराणी युद्धनौका परतत होती.