तिसर्‍या महायुद्धाविषयी सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !

सध्या जगभरातील विविध देशांमध्ये आपापसांत युद्ध चालू झाले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तिसर्‍या महायुद्धाच्या संदर्भात सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान येथे देत आहोत.         

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पुढे होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या संदर्भातील माहिती हवी.

उत्तर → श्री. निषाद देशमुख :

१. तिसर्‍या महायुद्धाचे स्वरूप !

१ अ. तिसरे महायुद्ध तीन टप्प्यांत होणार असणे : ‘तिसर्‍या महायुद्धाची व्याप्ती समजून घेण्यासाठी त्याचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यांच्या वेळी प्रत्यक्ष ग्रहण काही मिनिटांचे असते; पण ग्रहणाचा वेधकाळ (टीप) चालू झाल्यापासून वातावरणातील रज-तमात वाढ झालेली असते. हिंदु धर्मात ग्रहणाचे ‘स्पर्श (आरंभ), मध्य (प्रत्यक्ष ग्रहण) आणि मोक्ष (समाप्ती)’ असे टप्पे आहेत, तर पूर्ण काळाला ‘ग्रहणपर्व (स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा ग्रहणाचा एकूण काळ)’, असे म्हटले गेले आहे. त्याचप्रमाणे तिसरे महायुद्धही ‘आरंभ, प्रत्यक्ष युद्ध आणि समाप्ती’, या तीन टप्प्यांत होणार आहे. हे तिन्ही टप्पे मिळून असलेला पूर्ण कालावधी हा ‘महायुद्धाचा काळ’ असणार आहे.

टीप – वेधकाळ : प्रत्यक्ष ग्रहण होण्यापूर्वीचे अंदाजे ३ प्रहर. १ प्रहर म्हणजे ३ घंटे.

तिसर्‍या महायुद्धाचे प्रतिकात्मक चित्र

१ आ. तिसर्‍या महायुद्धापूर्वी आणि नंतरही त्याचे परिणाम होणार असणे : ‘राजनंदगाव (छत्तीसगड) येथील शासकीय दिग्विजय स्वायत्त पदव्युत्तर महाविद्यालयातील गगन सिंग गुरु आणि माजिद अली यांच्या ‘चंद्रग्रहणाचा प्राण्यांवर होणारा परिणाम : एक पुनरावलोकन (Visualization of Lunar Eclipse effect on Animal : A Review)’, या शोधपत्रात नमूद करण्यात आले आहे, ‘प्राण्यांवर चंद्रग्रहणाचा परिणाम केवळ प्रकाश अल्प झाल्यामुळेच होत नाही. ‘प्रकाश अल्प होणे’, हे एक मुख्य कारण आहे; पण त्यासह इतर घटकांचा प्रभावही असतो, उदा. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती, तापमानातील पालट, जैविक घड्याळातील गोंधळ किंवा काही विश्लेषकांच्या मते पृथ्वीच्या विद्युत्-चुंबकीय क्षेत्रात होणारे परिवर्तन यांमुळे चंद्रग्रहणाचा परिणाम अनेक गोष्टींवर होत असतो.

श्री. निषाद देशमुख

त्यात ‘प्रकाश, गुरुत्व, जैविक घड्याळ आणि पर्यावरणातून मिळणारे संकेत’, यांचा एकत्रित प्रभाव असू शकतो. हा परिणाम दूरगामीही असतो, उदा. चंद्रग्रहणामुळे समुद्री कासव, उभयचर प्राणी (Amphibians) यांचा अंडी घालण्याचा किंवा प्रजननाचा काळ पालटतो. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीवरही परिणाम होतो. त्याचप्रमाणे ग्रहणाच्या काळात काही प्राणी रात्री खाण्याची प्रक्रिया, प्रवास आणि संप्रेषण (संवादाच्या पद्धती) पालटतात. चंद्रग्रहणामुळे त्यांचे नैसर्गिक जैविक घड्याळ (biological clock) विस्कळीत होते.’

(साभार : ‘पेपर्स डॉट एस्.एस्.आर्.एन्.’चे संकेतस्थळ)

ज्याप्रमाणे डोळ्यांना दिसणारे प्रत्यक्ष ग्रहण काही कालावधीचे असते; पण ग्रहणाच्या होणार्‍या परिणामांमुळे अनेक जिवांना त्रास होतो, त्याप्रमाणे स्थुलातून होणारे युद्ध काही मासांचे किंवा काही वर्षांचे असले, तरी युद्धकाळात होणार्‍या परिणामांमुळे समष्टीला स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही स्तरांवरील त्रास युद्धाच्या अनेक वर्षे आधीपासून अन् युद्ध समाप्त झाल्यानंतरही काही काळ भोगावे लागणार आहेत.

१ इ. तिसर्‍या महायुद्धाचे परिणाम साधना न करणार्‍यांवर अधिक, तर आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांवर अल्प प्रमाणात होणार असणे : सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण सर्वच ठिकाणी दिसते, असे नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसते, त्या ठिकाणावर ग्रहणाचा अधिक परिणाम होतो आणि ग्रहण जिथे दिसत नाही, तिथे तुलनेत परिणाम अल्प होतो. ज्याप्रमाणे सूर्यग्रहणाचा परिणाम सूर्यावर अवलंबून असलेले जीव, उदा. मधमाशा, पक्षी आणि कोंबड्या यांच्यावर, तर चंद्रग्रहणाचा परिणाम चंद्रावर अवलंबून असलेले जीव, उदा. घुबड, कावळे, पेंग्विन, लांडगे, हिंस्र वन्य प्राणी अन् कीटक यांच्यावर अधिक प्रमाणात होतो, त्याप्रमाणे तिसर्‍या महायुद्धाचा भौतिक परिणाम साधना न करणार्‍यांवर तीव्र, साधना करणार्‍यांवर तुलनेत मध्यम अन् आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत जिवांवर तुलनेत अल्प प्रमाणात होणार आहे.

२. तीन टप्प्यांत होणार्‍या तिसर्‍या महायुद्धाचे विविध स्तर 

युद्ध एका पातळीवर न होता ते विविध पातळ्यांवर लढले जाते. त्यामुळे त्याचे स्वरूप हे स्तर आणि काळ यांनुसार पालटत जाते. ‘युद्धातील विविध स्तर कसे असतात ? आणि त्यामुळे युद्धावर कशा प्रकारे परिणाम होतात ?’, हे महाभारत युद्धातील पुढील उदाहरणांतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

२ अ. सगुण स्तरावरील युद्ध : महाभारताचे दृश्यमान युद्ध कुरुक्षेत्रात स्थुलातून १८ दिवस चालू होते. हे सगुण स्तरावरील युद्ध होते. या स्तरावरील युद्धात भगवान श्रीकृष्णाचे योगदान १० टक्के होते.

२ आ. सगुण-निर्गुण स्तरावरील युद्ध : याच काळात भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींशी एक अदृश्य युद्ध लढत होते. युद्धाच्या शेवटच्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथातून उतरायला सांगितले आणि नंतर श्रीकृष्ण रथातून उतरल्यावर अर्जुनाचा रथ जळून नष्ट झाला. हे सगुण-निर्गुण स्तरावरील युद्ध होते. या युद्धात भगवान श्रीकृष्ण, हनुमान आणि अन्य दैवी शक्ती यांचे योगदान ३५ टक्के होते.

२ इ. निर्गुण-सगुण स्तरावरील युद्ध : याच वेळी काळाच्या सीमा ओलांडून आणखी एक युद्ध चालू होते. त्यात श्रीकृष्णाने कौरवांना सूक्ष्मातून आधीच नष्ट केले होते; पण स्थुलातून त्यांना नष्ट करणे शेष होते. याची प्रत्यक्ष अनुभूती श्रीमद्भगवद्गीता सांगतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली होती. हे निर्गुण-सगुण स्तरावरील युद्ध होते. या युद्धात भगवान श्रीकृष्ण आणि अन्य दैवी शक्ती यांचे योगदान ५५ टक्के होते.

२ ई. तिसर्‍या महायुद्धाच्या प्रत्येक टप्प्यात एकाच वेळी निर्गुण-सगुण, सगुण-निर्गुण आणि सगुण स्तरावरील युद्ध लढले जाणार असणे : तिसरे महायुद्ध हे तीन टप्प्यांत (आरंभ, प्रत्यक्ष युद्ध आणि समाप्ती) होणार आहे; पण महाभारताच्या युद्धाप्रमाणे तिसर्‍या महायुद्धाच्या प्रत्येक टप्प्यात एकाच वेळी निर्गुण-सगुण, सगुण-निर्गुण आणि सगुण, अशा ३ स्तरांवरील युद्ध लढले जाणार आहे. या युद्धात साधना करणार्‍या समष्टीचे योगदान वेगवेगळ्या प्रमाणात असून त्या प्रमाणात त्यांच्यावर युद्धाचा परिणाम होणार आहे.

२ ई १. ‘परात्पर गुरु’ स्तराच्या समष्टी संतांनी निर्गुण-सगुण स्तरावरील युद्ध करणे : द्वितीय विश्वयुद्धाच्या काळात पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्ती हिटलरला माध्यम करून मानवजातीला मोठ्या प्रमाणात नष्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या वेळी महर्षि अरविंद हे हिटलरला माध्यम करून युद्ध घडवणार्‍या पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींशी लढत होते. त्यामुळे प्रत्यक्षात स्थुलातून प्रचंड बलवान असतांनाही शेवटी हिटलर आणि त्याचे सैन्य यांचा पराभव झाला अन् मानवजातीचे अस्तित्व टिकून राहिले. त्याचप्रमाणे तिसर्‍या महायुद्धाच्या प्रत्येक टप्प्यात अनेक प्रकारचे युद्ध, उदा. आर्थिक युद्ध, जैविक युद्ध, गृहयुद्ध, राष्ट्रांतील युद्ध इत्यादी होईल. या युद्धांमध्ये मानवजातीचे रक्षण करण्यासाठी ‘परात्पर गुरु’ स्तराचे समष्टी संत हे युद्ध घडवणार्‍या पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींशी निर्गुण-सगुण स्तरावरील युद्ध करत आहेत आणि पुढेही करणार आहेत.

२ ई २. ‘गुरु (संत)’ आणि ‘सद्गुरु’ या स्तरांच्या उन्नतांनी सगुण-निर्गुण स्तरावरील युद्ध करणे : विविध प्रकारचे युद्ध होत असतांना मानवाला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, अशा सर्वच स्तरांवर त्रास देण्यासाठी अनिष्ट शक्ती युद्धकाळात आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत वाढ करतात. हा वाढलेला आध्यात्मिक त्रास नष्ट केल्यावर मानवजातीला युद्धासारखा संकटकाळ सोसून कसेबसे जिवंत रहाणे शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत असतांना समर्थ रामदासस्वामींनी विविध ठिकाणी मारुतिरायाची देवळे स्थापन करून आणि समाजाकडून मारुतीची उपासना करून घेण्याच्या माध्यमातून सगुण-निर्गुण स्तरावरील युद्ध लढले होते. त्याचप्रमाणे तिसर्‍या महायुद्धाच्या काळात साधना करणार्‍या जिवांच्या रक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी ‘गुरु (संत)’ आणि ‘सद्गुरु’ या स्तरांचे उन्नत अनिष्ट शक्तींशी सगुण-निर्गुण स्तरावरील युद्ध लढत आहेत अन् पुढेही लढणार आहेत.

(क्रमशः)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक, वेळ आणि एकूण कालावधी : २८.९.२०२५, रात्री ९.०५, २ मिनिटे)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014566.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक