Leicester Violence : दंगलीला हिंदू आणि हिंदुत्व उत्तरदायी असल्याचा आरोप

  • भारतविरोधी जॉर्ज सोरोस यांच्या अर्थसाहाय्याने चौकशी समितीकडून हिंदुविरोधी अहवाल प्रकाशित

  • लेस्टर (ब्रिटन) येथे वर्ष २०२२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणांचे प्रकरण

  • ब्रिटनमधील हिंदूंच्या संघटनांकडून अहवालास विरोध

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील लेस्टर येथे वर्ष २०२२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीविषयी ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ (एस्.ओ.ए.एस्.) विद्यापिठाच्या ‘बेटर टुगेदर’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात हिंसाचारासाठी हिंदू आणि हिंदुत्व विचारसरणी यांना उत्तरदायी ठरवण्यात आले आहे; मात्र पोलिसांच्या नोंदी आणि स्थानिक वास्तव वेगळे चित्र दाखवत असल्याचे लेस्टरमधील हिंदु समुदाय आणि ‘हिंदु कम्युनिटी ऑर्गनायझेशन ग्रुप’ यांनी म्हटले आहे. ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचे प्रतिनिधित्व करणार्‍या या समूहाने अहवाल तथ्याधारित नसून हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी सिद्ध केल्याचा आरोप केला आहे.

सोरोस यांच्या संस्थेकडून अर्थसाहाय्य आणि चौकशी समितीविषयी प्रश्नचिन्ह

जॉर्ज सोरोस

या अहवालाला ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’कडून ६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे नमूद आहे. जॉर्ज सोरोस यांच्या या संस्थेकडून आलेल्या निधीमुळे निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत, असा हिंदु संघटनांचा दावा आहे. अन्वेषण समितीत सुरेश ग्रोवर, चेतन भट्ट आणि प्रमुख जुआन मेंडेज यांचा समावेश होता. समितीतील काही सदस्यांनी पूर्वीच हिंदूंना दोषी ठरवले होते, असा आरोप करण्यात आला आहे.

हिंदूंवरील आक्रमणे दुर्लक्षित

सप्टेंबर २०२२ मध्ये सलग ३ रात्री हिंदूंची घरे, वाहने आणि मंदिरे यांवर आक्रमणे झाली होती. मंदिरावरील ध्वज खाली ओढून मंदिराची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. हिंदु युवकांना रस्त्यावर मारहाण झाल्याचेही नमूद आहे; मात्र अहवालात या घटनांना गौण ठरवून हिंदुत्वाला आक्रमक दाखवले असल्याचा आरोप आहे. लंडनहून बसने लोक आणल्याच्या दाव्याला जी.पी.एस्. (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम – उपग्रहांद्वारे पृथ्वीवरील व्यक्तीचे स्थान शोधणे) नोंदींनी खोटे ठरवले होते, तरीही अशा दाव्यांना महत्त्व दिल्याचे सांगितले जाते.

अफवा आणि चुकीच्या माहितीचे सूत्र

क्रिकेट सामन्यानंतरच्या घटनेला धार्मिक रंग देण्यात आल्याचा आरोप आहे, तर पोलिसांनी त्यात धार्मिक उद्देश नसल्याचे स्पष्ट केले होते. १५ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाच्या कथित प्रयत्न घडलाच नसल्याचे समोर आले. मशिदींवर आक्रमणांच्या बातम्याही चुकीच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तरीही या दाव्यांना अहवालात स्थान देण्यात आल्याचा आरोप आहे.

राजकीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ

ब्रिटीश सरकारची अधिकृत चौकशी आणि हेन्री जॅक्सन सोसायटीचा अहवाल यांत हिंदूंवरील आक्रमणांचा उल्लेख असल्याचे नमूद करण्यात आले आहे; मात्र एस्.ओ.ए.एस्. अहवालाने एकतर्फी कथन पुढे रेटल्याचा आरोप आहे. हिंदु समुदायाने हा अहवाल फेटाळून लावत तो हिंदूंना जागतिक स्तरावर अपकीर्त करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातच नव्हे, तर विदेशातही हिंदूंनाच आक्रमक दाखवून मुसलमानांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जातो, हे यातून लक्षात येते !