हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १ मार्चला हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु-राष्ट्र जागृती सभा !

 हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांची प्रमुख उपस्थिती !

पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर

हुपरी (जिल्हा कोल्हापूर), २५ फेब्रुवारी (वार्ता.)- हिंदूबहुल असलेल्या या देशात हिंदूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ जिहाद अशा समस्या वाढत आहेत. देहलीतील स्फोट घडवणार्‍या उच्चशिक्षित जिहाद्यांची क्रूरता पहाता ही स्थिती हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. या सर्वांवर ‘हिंदु राष्ट्र’ हेच उत्तर असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्यासाठी रविवार, १ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ असणारे भाग्यनगर येथील ‘श्रीराम युवा सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी दिली. ते ‘चांदी कारखानदार असोसिएशन’च्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे हातकणंगले तालुका संयोजक

श्री. नितीन काकडे, ‘चांदी कारखानदार असोसिएशन’चे उपाध्यक्ष श्री. दिनकर ससे, अखिल भारत हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे आणि श्री. संजय पाटील, भाजपचे मंडलप्रमुख श्री. सुभाष गोटखिंडे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हासहमंत्री श्री. निळकंठ माने उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. दिनकर ससे म्हणाले, ‘‘सभेच्या प्रसारासाठी व्यापार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत असून सभेसाठी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित रहाणार आहेत.’’

सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘सध्या महिला-युवती यांच्यावर विविध मार्गांनी अत्याचार होत आहेत. त्याला तोंड देण्यासाठी युवतींनी शारीरिक, मानसिक आणि आत्मबळाच्या स्तरावरही सक्षम व्हायला हवे. त्याचे मार्गदर्शन या सभेच्या माध्यमातून केले जाणार आहे.’

सभेच्या प्रचारासाठी वाहनफेरी

शनिवार, २८ फेब्रुवारी या दिवशी हुपरी येथील जवाहर चौपाटी येथून सकाळी ९.३० वाजता वाहनफेरी काढण्यात येणार आहे. वाळवेकरनगर, छत्रपती शिवाजीनगर, महावीरनगर, चिटणीस चौक मार्गे शिवमूर्ती, माळभाग येथे फेरीची सांगता होईल. त्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु धर्मावर होणारे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांच्या विषयी जागरूकता निर्माण करते ! – सुनील घनवट

हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु धर्मावर होणारे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांच्या विषयी जागरूकता निर्माण करते. आजपर्यंत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात २ सहस्र २८२ हून अधिक जाहीर सभा घेतल्या आहेत. या सर्व सभांसाठी एकूण २२ लाख ४९ सहस्र २११ हून अधिक हिंदू उपस्थित राहिले आहेत. तरी हिंदुत्वाचा झंझावात निर्माण करणार्‍या या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

सभेच्या निमित्ताने १०० हून अधिक गावांमध्ये प्रसार !

श्री. आदित्य शास्त्री म्हणाले, ‘‘सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या १०० हून अधिक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले काही दिवस विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्शा, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. या सभेच्या निमित्ताने विविध लोकप्रतिनिधी यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत.’’