Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्‍यांनी गावाबाहेर काढले !

मूळ धर्मात परत येण्याचा दिला होता पर्याय !

नारायणपूर (छत्तीसगड) – नारायणपूर जिल्ह्यातील भरंडा गावात स्थानिक आदिवासी समाजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २६ कुटुंबांना गाव सोडण्याचा आदेश दिला. या कुटुंबांना मूळ धर्मात परत येण्याचा पर्याय दिला होता. तथापि ही कुटुंबे गावातून बाहेर पडली आहेत. ती गावाच्या सीमेबाहेर एका स्मशानाजवळ आणि झाडांखाली पोलिसांच्या संरक्षणात आश्रय घेऊन रहात आहेत. गावात निर्माण झालेला तणाव पहाता संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

गावात बर्‍याच काळापासून मूळ आदिवासी धर्म पाळणारे ग्रामस्थ आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारलेली कुटुंबे यांच्यात तणाव होता. ९ जून २०२६ या दिवशी दोन्ही गटांत हाणामारी झाली. यात काही महिला घायाळ झाल्या. यानंतर आदिवासी गावकर्‍यांनी आणि गावातील पारंपरिक प्रमुखांनी कठोर पाऊल उचलत या २६ ख्रिस्ती कुटुंबांना तातडीने गाव सोडण्याचा आदेश दिला.

नारायणपूरचे उप पोलीस अधीक्षक आशिष नेताम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनजातीय (आदिवासी) समाजाच्या तक्रारीवरून आणि प्राथमिक अन्वेषणानंतर या वादात सहभागी असलेल्या २ आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.