US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण

९ दिवसांतच युद्धबंदी कराराचे तीन तेरा !

तेहरान (इराण) – हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणार्‍या एका व्यापारी नौकेवर इराणने ड्रोन आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने इराणचे सैन्य तळ आणि रडार केंद्रे यांवर हवाई आक्रमण केले. यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यात झालेला युद्धबंदीचा करार अवघ्या ९ दिवसांतच मोडीत निघाल्याचे स्पष्ट झाले.

हिंसेला हिंसेनेच उत्तर दिले जाईल ! – अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमात पोस्ट करत म्हटले की, ‘इराणने केलेले हे आक्रमण युद्धबंदी कराराचे थेट उल्लंघन आहे. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील.’ दुसरीकडे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांनी कठोर शब्दांत सुनावले की, काही मतभेद असतील, तर दूरभाषवर चर्चा करा, हिंसेला हिंसेनेच उत्तर दिले जाईल. (गांधीवादी भारत अमेरिकेकडून हे कधी शिकणार ? – संपादक)

अमेरिकेच्या आक्रमणानंतर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाने म्हटले की, अमेरिकेने पुन्हा एकदा वाटाघाटी चालू असतांनाच इराणवर आक्रमण केले आहे. अमेरिकी  राष्ट्राध्यक्ष युद्धबंदीच्या तत्त्वांचे पालन करत नाहीत.

हॉर्मुझमध्ये कर वसूल करण्यावरून तणाव

अमेरिका आणि इराण यांच्यात १७ जून या दिवशी १४ कलमी युद्धबंदी करार झाला. या करारानुसार ६० दिवसांसाठी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या व्यापारी नौकांकडून कोणताही कर न घेण्याचे इराणने मान्य केले होते; परंतु इराणच्या अधिकार्‍यांनी कर वसूल करण्याची भाषा चालू केली. याच वादातून दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा बिघडले.