कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !

  • भाजप सरकारने माध्यान्ह भोजन पुरवण्याचे कंत्राट दिले आहे ‘इस्कॉन’ला

  • बंगालवर शाकाहारी संस्कृती लादण्यात येत असल्याची विरोधी पक्षांची टीका

कोलकाता (बंगाल) –  ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने बंगालमध्ये वाद निर्माण झला आहे. विरोधी पक्षांनी ‘भाजप बंगालमध्ये शाकाहारी संस्कृती लादण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप केला. कोलकाता महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन सिद्ध करण्याचे कंत्राट ‘इस्कॉन’ला देण्याचा निर्णय राज्यातील नव्या भाजप सरकारने घेतला. त्यामुळेच अंडे देणे बंद होणार आहे. अंड्याऐवजी आता पनीर, राजमा, सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारखे शाकाहारी पर्याय दिले जाणार आहेत.

विरोधकांचे दावे !

विरोधी पक्षनेते ऋतुब्रत बॅनर्जी यांनी अंडे बंदीवर आक्षेप घेत म्हटले की, बंगाली मुले पिढ्यान्‌पिढ्या प्राणीजन्य प्रथिने खाऊन मोठी झाली आहेत, त्यामुळे पोषण योजना स्थानिक खाद्यसंस्कृतीनुसारच असायला हवी. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही सरकार कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून शाकाहार लादत असल्याचा आरोप केला.

सरकारचा दावा

दुसरीकडे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी विधानसभेत या निर्णयाचे समर्थन करतांना म्हटले की, मुलांसाठी दर्जेदार आणि स्वच्छ अन्न सुनिश्चित करणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. कुणावरही धार्मिक श्रद्धा लादली जात नाही. पोषण वैज्ञानिक निकषांवर ठरवले पाहिजे, अन्नात अंडे आहे कि नाही ? यावरून नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक बर्मन यांनी सांगितले.

शाकाहारी अन्न बंगालसाठी नवीन नाही ! – इस्कॉनचे मत

इस्कॉनचे कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी म्हटले की, संस्था आधीच देशातील विविध राज्यांमध्ये १२ लाख विद्यार्थ्यांना भोजन पुरवते. बंगालमध्ये पाळली जाणारी ‘गौडीय वैष्णव’ परंपरा हीसुद्धा याच मातीतील असल्याने शाकाहारी अन्न बंगालसाठी नवीन नाही, तसेच डाळी आणि सोयाबीन यांमधूनही आवश्यक प्रथिने मिळतात.

संपादकीय भूमिका

मुळात शाळेत मांसाहारी पदार्थ का दिले जात होते ? मुले स्वतःच्या घरी मांसाहार करू शकतात, त्यावर कुणीही बंदी घालू शकत नाही. असे असतांना अंडे हटवल्याच्या निर्णयाला जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे, हे लक्षात येते !