‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. भगवद्भक्ती करण्याचे माध्यम असणार्या आणि मंदिर संस्कृतीशी संलग्न असलेल्या या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश आता काळाच्या प्रभावामुळे पालटत चालला आहे.
(लेखांक १४)
पूर्वीच्या कलाकारांचे कलेच्या माध्यमातून साधनेकडे अधिक लक्ष होते. त्यामुळे त्यांचे स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवण्याचे प्रमाण अल्प होते; परंतु आता काळानुसार कलेतून अंतर्मुखता साधण्याऐवजी कलेचे सादरीकरण करतांना बर्याच कलाकारांचा स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवण्याकडे अधिक कल दिसून येतो. ‘या मानसिकतेमुळेच वेगळे काहीतरी करण्याच्या नादात कलाकार कलेला विकृतीकडे घेऊन जातात’, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. आजकालची युवा पिढी त्यांचेच अनुकरण करतांना दिसते.
१२ फेब्रुवारीच्या लेखात आपण ‘रिॲलिटी शोज’, तसेच ‘टॅलेंट शोज’, चित्रपट इत्यादींच्या माध्यमातून कलेच्या विकृतीकडे झालेला प्रवास’ जाणून घेतला. आजच्या लेखात आपण ‘फ्यूजन’च्या माध्यमातून कलांचे होणारे असात्त्विक सादरीकरण’, ‘इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सध्याचे कलाकार करत असलेली वेशभूषा, केशभूषा’, तसेच ‘मंत्र अन् स्तोत्र यांतून होणारे देवतांचे विडंबन’ समजून घेणार आहोत.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1007006.html

१. भारतीय कलांमध्ये ‘फ्यूजन’चा अंतर्भाव केल्याने कलांचे होणारे असात्त्विक सादरीकरण !
‘मूळ शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य यांमध्ये पाश्चात्त्य संगीताचे मिश्रण करणे’, याला ‘फ्यूजन’ म्हणतात. आज अनेक कलाकार काहीतरी वेगळे करण्याच्या नादात भारतीय शास्त्रीय कलेमध्ये हे मिश्रण करतांना दिसतात. त्यामुळे ते संगीत कानांना काही वेळ तत्कालीन सुख देते किंवा बर्याच वेळा ते ऐकावेही वाटत नाही. भारतीय कलांमध्ये मुळातच सात्त्विकता आहे. त्यामध्ये अशा प्रकारच्या संगीताचे मिश्रण केल्यावर कलेतील सात्त्विक स्पंदने नष्ट होऊन रज-तमप्रधान स्पंदने कार्यरत होतात. त्यामुळे कलाकार, प्रेक्षक, तसेच श्रोते यांच्यावरही रज-तमाचा परिणाम होतो. आजच्या युवा पिढीला योग्य दिशा नसल्याने ते कलांच्या असात्त्विक सादरीकरणाचा उदो उदो करतांना दिसतात. त्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. शास्त्रीय संगीत गातांना त्यात ‘गिटार वाजवणे’, ‘ड्रम्सच्या बीट्स देणे’ किंवा ‘गायकाचा आवाज मेटॅलिक करणे’, असे होतांना दिसत आहे. यामुळे भारतीय कलेचे मूळ शुद्ध स्वरूप ‘फ्यूजन’च्या आहारी जाऊन विकृतीकडे जात आहे.

आ. भारतीय वाद्यांच्या मूळ आवाजाला विद्युत् उपकरणांद्वारे रूपांतरित केले जाते. शास्त्रीय संगीतामध्ये ‘जैझ’, ‘इलेक्ट्रिक गिटार’ आणि ‘ड्रम’च्या बीट्सवर फ्यूजन करून विविध गीते गायली जातात. लोकांना स्वतःच्या काैशल्याचा अतिरेक दाखवण्यासाठी ‘हिप-हॉप’च्या बीट्सवर तबला, सतार इत्यादी वाद्यांचा उपयोग केला जातो. हल्ली बर्याच ठिकाणी तबला आणि ड्रम यांची जुगलबंदी सादर केली जाते. तबल्याच्या मूळ नादातील गोडवा ड्रमच्या तीक्ष्ण आवाजामुळे हरवून जातो.
इ. शास्त्रीय नृत्यामध्ये हल्ली इ.डी.एम्.चा (Electronic Dance Music चा) वापर बर्याच प्रमाणात होतांना दिसतो. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स रिदमच्या साहाय्याने कधी कधी मूळ शास्त्रीय गीतांची चालही पालटली जाते. शास्त्रीय गायनामध्ये, तसेच शुद्ध नृत्तातील प्रकारांत उदा. तराना अथवा तिल्लाना यांमध्येही असे फ्यूजन करून शास्त्रीय संगीताचे पाश्चात्त्यीकरण केले जाते. अशा प्रकारच्या गीतांवर नृत्य करतांना कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शास्त्रीय नृत्यात विविध ‘स्टंट’ (इतरांचे लक्ष वेधून घेईल, अशी कृती) करतात. त्यात नृत्य करतांना कलाकार मध्येच उलट-सुलट कोलांट्या उड्या मारतात. विविध प्रकारे शरिराला वाकवून ते स्वतःच्या शरिराच्या लवचिकतेचे प्रदर्शन करतात.
सामाजिक माध्यामांवरील एका प्रसिद्ध डान्स गु्रपने ‘कथ्थक’ या भारतीय शास्त्रीय नृत्यावर पाश्चात्त्य आणि बॉलीवूडची गीते लावून नृत्य केले. काही जण बॉलीवूडच्या गीतांमध्ये ‘कथ्थक’ नृत्यातील बोल जोडून प्रस्तुतीकरण करतात. त्यांच्या अशा प्रकारच्या असात्त्विक फ्यूजन नृत्याला समाजातील लोकांनी पुष्कळ चांगली दाद दिली.
ई. हल्ली कलाकार शास्त्रीय पाया असलेल्या सात्त्विक भारतीय कला अशाच प्रकारे विकृत स्वरूपात अन्य देशांतही प्रस्तुत करतात. त्यामुळे दुर्दैवाने आपल्या भारतीय शास्त्रीय कलांमधील आध्यात्मिक ऊर्जा आणि कलेतील मूळ शास्त्रीय शैलीचे दिव्यत्व विदेशांपर्यंत पोचवण्यात आपण न्यून पडत आहोत.
लेखातील काही शब्दांचे अर्थ१. ड्रमच्या बीट्स देणे : ‘ड्रम’ हे पाश्चात्य वाद्य वाजवणे |
२. देवतांचे मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांच्या ‘फ्यूजन’मुळे कलेतून होत असलेले देवतांचे विडंबन !
‘यू ट्यूब’, ‘इन्स्टाग्राम’, यांसारख्या सामाजिक माध्यमांवर देवी-देवतांचे संस्कृत श्लोक, उदा. ‘शिवपंचाक्षर स्तोत्र’, ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्र’, ‘शिव तांडव स्तोत्र’ इत्यादी, तसेच विविध देवतांचे मंत्र हे ‘रॉक व्हर्जन’, ‘हिप हॉप व्हर्जन’, ‘रॅप व्हर्जन’ यांमध्ये फ्यूजन करून गायले जातात. हे गातांना कलाकाराच्या चेहर्यावर वेडेवाकडे हावभाव असतात. तो त्याचे डोके अनावश्यक जोरजोरात हलवत असतो. त्याची वेशभूषा सात्त्विक नसते. पुढे हेच गीत पुष्कळ प्रसिद्ध होते आणि नृत्य-कलाकार त्या गीतावर शास्त्रीय नृत्य करतात. काही वेळा हे बघायलाही किळसवाणे वाटते. त्यामुळे मंत्र, श्लोक आणि स्तोत्र यांतून जो दैवी लाभ मिळणे अपेक्षित आहे, तो ऐकणार्याला मिळत नाही, उलट अशा प्रकारच्या फ्यूजनमुळे ऐकणारा आणि पहाणारा यांच्याकडून नकारात्मक स्पंदनेच ग्रहण होतात.
३. शास्त्रीय कलेच्या सादरीकरणाच्या वेळी वापरले जाणारे असात्त्विक पोशाख, अलंकार आणि केशरचना !

पूर्वीच्या काळी भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफिली अथवा कार्यक्रम यांमध्ये कलाकार आणि गुरुजन हे भारतीय पारंपरिक पोषाख, उदा. साडी, धोतर, झब्बा-पायजमा इत्यादी परिधान करत असत. स्त्रियाही ‘कपाळावर कुंकू लावणे, हातांत बांगड्या घालणे, खांद्यावरून अथवा डोक्यावरून पदर घेणे’, या धर्माचरणाच्या कृती करत असत. त्यामुळे मूळ सात्त्विक कलेतून अधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित व्हायची. भारतीय पोशाखांमध्ये भडकपणा नसल्यामुळे कलाकाराच्या बाह्यांगाकडे लक्ष न जाता त्याच्या कलेतून प्रेक्षकांना सहजतेने अंतरंगात जाता येत होते; परंतु ‘आताच्या काळात कलाकार बाह्यांगाला अधिक महत्त्व देतात’, असे लक्षात आले. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
३ अ. पोशाख : कलाकार गातांना कलेच्या सादरीकरणाला न शोभणारे पोशाख परिधान करतात. काही वेळा महिला अतिशय तोकडे कपडे परिधान करतात. यामुळे या कलाकारांच्या बाह्य गोष्टींकडे प्रेक्षकांचे लक्ष अधिक आकर्षित होते.
३ आ. अलंकार : काही कलाकार कलेच्या सादरीकरणाच्या वेळी अधिक प्रमाणात आणि कधी चित्रविचित्र अलंकार धारण करतात. त्यामुळे त्यांच्या कलेकडे लक्ष जाण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या अलंकाराकडेच लक्ष अधिक वेधले जाते.
३ इ. केशरचना : कलाकार गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांमध्ये केशभूषेलाही अधिक महत्त्व द्यायला लागले आहेत. पुरुष कलाकारांचे खांद्यांपर्यंत वाढलेले केस, डोळ्यांवर सारखे येणारे केस, केसांमुळे चेहरा झाकला जाणे इत्यादी प्रकारच्या केशरचनांमुळे प्रेक्षकांचे कलेपेक्षा त्या कलाकारांच्या या केशरचनांकडेच अधिक लक्ष वेधले जाते.
४. झटपट प्रसिद्धीसाठी कलेच्या सादरीकरणातील विकृती वाढणे
अ. नृत्यामध्येही भडक कपडे, भडक रंगभूषा आणि असात्त्विक केशरचना यांमुळे मूळ कलेकडे लक्ष जाण्यापेक्षा कलाकाराचा स्वतःकडेच लक्ष वेधून घेण्याचा भाग अधिक होतांना दिसतो. ‘रिॲलिटी शोज’, ‘सोशल मिडियावरील शोज’ पहाता असे लक्षात येते की, काही वेळा आजचे परीक्षक पुढील पिढीला अशा प्रकारची दिशा देतांना दिसतात.
आ. एका युवा कलाकाराने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले, ‘‘लोकांना आकर्षण वाटावे, स्वतःचा वेगळेपणा दिसावा’, यासाठी मी स्वतः विविध प्रकाराचे कपडे ‘डिजाईन’ करून घेतो.’’ कलाकारांच्या अशा नवनवीन ‘स्टाईल्स’ पाहून त्यांचा आदर्श घेऊन भारतीय युवा पिढीने त्यांचे आचरण करण्यास आरंभ केल्याचे लक्षात येत आहे.
इ. यामध्ये महत्त्वाचा भाग, म्हणजे सध्या कलेतील काही गुरुजन अशा प्रकारे वागत असल्याने त्यांचा शिष्यवर्गही त्यांचे अनुकरण करतांना दिसतो. विद्यार्थीवर्गाचे गुरूंकडून कला अंतर्मुखतेने शिकणे होत नाही, उलट ते बाह्यांगाने गुरुजनांचे अनुकरणच अधिक करतात. आज झटपट प्रसिद्धीसाठी कला सादरीकरणामध्ये कोणत्याही स्तराची विकृती करण्याकडे समाजाचा कल दिसून येत आहे.
वरील सर्व उदाहरणांतून आजची कलाकार पिढी कलेकडे ‘ईश्वराची आराधना किंवा आत्मरंजन’ म्हणून पहाण्याच्या दृष्टीकोनापासून पुष्कळ दूर जात असल्याचेच आपल्या लक्षात येत आहे. पुढील पिढीला कलेतील खर्या आनंदाची आणि सात्त्विकतेची अनुभूती घेता येण्यासाठी कलाकाराने
स्वतः साधना करणे अत्यावश्यक आहे. कलाकार जेव्हा स्वतः सात्त्विक होईल, त्या वेळी त्याचे विचार शुद्ध होऊन तो कलेतील आध्यात्मिक आनंद अनुभवू शकेल. हेच मार्गदर्शन आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.’
(क्रमशः)
संग्राहक : कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय १९ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा आणि सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.२.२०२६)
भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1012180.html
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !