मुळात सात्त्विक असलेल्या भारतीय कलांचा आत्मरंजनाकडून विकृतीकडे झालेला प्रवास ! 

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !  

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. भगवद्भक्ती करण्याचे माध्यम असणार्‍या आणि मंदिर संस्कृतीशी संलग्न असलेल्या या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश आता काळाच्या प्रभावामुळे पालटत चालला आहे.

(लेखांक १४)

‘आताचे युग हे तंत्रज्ञानावर भर देणारे आहे. आज डिजिटल क्रांतीमुळे मनोरंजनाची साधने घरोघरी पोचली आहेत. लोकांच्या पालटलेल्या मानसिकतेमुळे कलांचे सादरीकरण मूळ शुद्ध पद्धतीने न होता रज-तमयुक्त होत आहे. आज सोशल मिडिया, तसेच ‘टॅलेंट शोज’ आणि ‘रिॲलिटी शोज’, यांमुळे कलेचे सादरीकरण हे कलाकार अन् प्रेक्षक यांना अंतर्मुखतेऐवजी तीव्र बहिर्मुख स्थितीला नेत आहे. 

मागील लेखात आपण ‘मूळ दैवी परंपरा असलेल्या भारतीय कलांचा लोकाभिमुख होत गेलेला प्रवास, तसेच या स्थितीला कारणीभूत असलेले विविध घटक’ जाणून घेतले. या लेखात आपण ‘कला ही केवळ मनोरंजनापर्यंतच मर्यादित न रहाता तिचा प्रवास विकृतीकडे कसा होत आहे ?’, हे समजून घेणार आहोत.

(भाग २)  

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005068.html   

१. दूरचित्रवाहिन्यांवरील ‘टॅलेंट शोज’ आणि ‘रिॲलिटी शोज’, यांमुळे होणारा विकृत परिणाम !

सध्याच्या युगात ‘कलाप्रदर्शन म्हणजे ‘रिॲलिटी शोज’, ‘टॅलेंट शोज’, असे समीकरण झाले आहे. असे कार्यक्रम दूरचित्रवाहिन्यांवर आयोजित केले जातात. त्यांत अनेक युवक-युवती सहभाग घेतात. ते आपली कला, म्हणजेच गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी प्रस्तुत करतात. या कार्यक्रमांचे परीक्षक स्पर्धेचा निकाल देतात.

१ अ. नवोदित बाल-कलाकारांचा अहं वाढवणारे ‘रिॲलिटी शोज’ ! : या कार्यक्रमामध्ये युवा गटातील कलाकारांच्या समवेत ३ – ४ वर्षांपासूनच्या बाल-कलाकारांचाही सहभाग असतो. या बाल-कलाकारांची कला परिपक्व झालेली नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांत कला सादर केल्यावर होणार्‍या अवास्तव कौतुकाने या बाल-कलाकारांचा अहंकार वाढू शकतो. या कला सादर करतांना बाल-कलाकार त्यांच्या वयाला न शोभणारी गीते निवडतात. ही मुले कॅब्रे, लावणी, द्व्यर्थी गीते इत्यादी गातात किंवा त्यांवर नृत्य करतात. ही गीते सादर करतांना त्या अनुषंगाने ‘भडक पेहराव करणे, चित्र-विचित्र हावभाव करणे’, हेही या बाल-कलाकारांना विकृतीकडेच नेणारे ठरते. कुणी एखादा स्पर्धक सात्त्विक कपडे घालून आला असेल, तर काही वेळा परीक्षकांकडून त्याला पाश्चात्त्य कपडे घालण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे त्या बालमनावर विकृत संस्कार होऊ लागतात.

या कार्यक्रमांच्या ‘टीआर्पी’साठी स्पर्धकांच्या आई-वडिलांना संघर्षाला सामोरे जावे लागते. त्या स्पर्धकाची पुढील फेरीसाठी निवड न झाल्यास सामाजिक माध्यमांवरून त्याला ‘ट्रोल’ (खिल्ली उडवणे.) केले जाते. यांमुळे स्पर्धक-कलाकाराला समाजाची टीका आणि संघर्ष यांना सामोरे जावे लागल्याने तो निराशेतही जातो.

सौ. रेणुका क्राक

१ आ. ‘रिॲलिटी शोज’च्या परीक्षकांची विकृत मानसिकता ! : अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ‘स्पर्धकाच्या कला-कौशल्यापेक्षा ‘स्पर्धा जिंकण्यासाठी तो कलाकार किती पैसे देऊ शकतो ?’, यावर परीक्षकांचा निकाल अवलंबून असतो’, असे मी ऐकले आहे. ‘या कार्यक्रमाला लाभलेले परीक्षकही कलाक्षेत्रातील दिग्गज असतीलच’, असे नाही. बहुतांश परीक्षक हे स्पर्धेच्या वेळी ‘एकमेकांची खिल्ली उडवणे, अश्लील टोमणे मारणे, कलाप्रदर्शन आवडले, तर कौतुक करण्यासाठी जोरात किंचाळणे, अपशब्दांचा वापर करणे’ इत्यादी अयोग्य वर्तन करतांना दिसतात. मार्गदर्शक परीक्षकांचेच वागणे असे असेल, तर त्याचा स्पर्धक-कलाकारावर होणारा परिणामही विकृत स्वरूपाचाच असणार.

अशा ‘रिॲलिटी शोज’द्वारे कला शिकण्याचा उत्साह आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आताची पिढी कला सादरीकरणाच्या चुकीच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.

२. बॉलिवूडमधील अश्लील आणि अतिरंजित चित्रपटांमुळे युवा पिढी दिशाहीन होणे 

कला ही समाजाला घडवते, तसेच दिशा देते. कलेची वर्तमानातील अत्यंत प्रभावी माध्यमे, म्हणजे चित्रपट अन् नाटके होत; परंतु आजचे बहुतांश चित्रपट ‘कुटुंबातील सर्व जण एकत्रित पाहू शकतील’, असे नाहीत. बॉलीवूडमधील चित्रपटांमध्येही ‘अश्लीलता, अनैतिक संबंध, आक्रमकता, ओव्हरड्रामा (अतिरंजित अभिनय), नशा करण्यासाठी प्रवृत्त करणे, विकृत मानसिकतेचा ‘उदो उदो’ करणे’, इत्यादी दाखवण्यामुळे समाजातील विकृतींमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे पुढील पिढी दिशाहीन होत आहे. कलेतून वेगळे काहीतरी करण्याच्या नादात आज समाज एकप्रकारे विकृतीकडेच जात आहे.

२ अ. भयपटांमुळे (Horror Films मुळे) कलेचे अधःपतन होणे  : ‘भयपट’, हा समाजातील पुष्कळ लोकांचा आवडीचा विषय असतो. अशा भयपटांमुळे ‘भीती’, हा स्वभावदोष उत्पन्न होऊ शकतो. सतत भयपट पाहिल्याने अंतर्मनावर भयाचा कुसंस्कार होऊ शकतो. कलेचा खरा उद्देश ‘परमेश्वराचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे, समाजात भक्तीभाव वाढवणे’, हा आहे; मात्र अशा भयपटांमुळे वाईट शक्तींना महत्त्व प्राप्त होते. यातूनच कलेचे अधःपतन होतांना दिसते.

लेखातील काही शब्दांचे अर्थ 

१. टॅलेंट शोज : कलागुण / कौशल्य प्रदर्शनाचा कार्यक्रम

२. रिॲलिटी शोज : वास्तववादी किंवा सत्य घटनांवर आधारित कार्यक्रम

३. टीआर्पी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) : हे एक साधन आहे, ज्याद्वारे ‘विशिष्ट दूरचित्रवाहिनी (टी.व्ही. चॅनल) किंवा कार्यक्रम किती लोक, कधी आणि किती वेळ पहातात ?’, हे मोजले जाते.

४. ट्रोल करणे : सोशल मिडिया किंवा इंटरनेट यांवर एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून त्रास देणे किंवा खिजवणे

५. ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म : हे ग्राहकांच्या विनंतीनुसार आणि वैयक्तिक आवश्यकतांनुसार माहितीजालावर (इंटरनेटवर) दूरचित्रवाणी अन् चित्रपट सामुग्री प्रदान करण्याचे एक साधन आहे.

६. सेन्सॉर बोर्ड : केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळ

७. फ्यूजन : भारतीय आणि पाश्चात्त्य कला यांचे एकत्रीकरण करून केलेले सादरीकरण

३. हिंसा आणि अनैतिकता यांना खतपाणी घालणारे ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरील चित्रपट, मालिका अन् गीते ! 

‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मला ‘सेन्सॉर बोर्ड’ नसल्याने यावरील चित्रपट, मालिका, गीते यांमध्ये ‘हिंसा, अनैतिकता, बलात्कार, नशा’ इत्यादी दृश्ये सर्रास दाखवलेली असतात. यामुळे सांस्कृतिक अधःपतन होत आहे. सध्याच्या काळात हे माध्यम लहान मुलांपासून सर्व वयोगटांतील लोक आवडीने पहातात. त्यामुळे त्याचा परिणाम भावी पिढ्यांवरही होत आहे.

भरतमुनींनी लिहिलेल्या ‘नाट्यशास्त्र’, या ग्रंथात त्यांनी रंगमंचावर नेहमीच चांगल्याचे प्रदर्शन करण्यास सांगितले आहे. ‘जे जे उत्तम आहे, ते प्रेक्षकांना दाखवावे. रंगमंचावर मृत्यू, दारिद्र्य आणि अश्लीलता दाखवू नये’, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्धः।’, म्हणजे ‘द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो’, या उक्तीप्रमाणे नकारात्मक घटक दाखवल्यावर प्रेक्षकांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. वरील विविध माध्यमांतून होणार्‍या कलाप्रस्तुतीमधून आज हेच होतांना दिसत आहे.

४. व्यासपिठावरील बाह्य भडकपणामुळे कलेतून अंतर्मुखता साधणे कठीण होणे 

‘शास्त्रीय गायन’ ही भारतीय बैठकीत बसून सादर करण्याची कला आहे; परंतु आज अशा प्रकारचे गायन हे उभे राहून करण्याचाही ट्रेंड (नवी रीत) आला आहे. पूर्वीच्या ऑर्केस्ट्राप्रमाणे (वाद्यवृंदाप्रमाणे) आता शास्त्रीय गायनाच्या वेळीही व्यासपिठाच्या मागील पडद्यावर (‘बॅकड्रॉप’वर) विविध चित्रे दाखवतात. त्यामुळे गाणे ऐकणार्‍याचे लक्ष विचलित होते. असेच नृत्य आणि वादन यांच्या प्रस्तुतीच्या वेळीही पहाण्यास मिळते. ‘भारतीय कला ही अंतर्मुख होऊन अनुभवायची कला आहे’, हा दृष्टीकोन आता नाहीसा झाला आहे. त्यामुळे बाह्य झगमगाटाला अधिक महत्त्व दिले जात आहे.

५. देवतांवरील आधारित मालिका आणि नाटके यांच्या सादरीकरणातील विपर्यास अन् देवतांचे विडंबन ! 

सध्या कलांच्या सादरीकरणामध्ये वस्तूस्थिती न दाखवता त्याचा विपर्यास करून दाखवण्यात येतो, उदा. गायन, नृत्य आणि नाट्य यांतून राधा अन् श्रीकृष्ण यांचे दैवी भक्तीयुक्त प्रेम हे मानवी प्रेम, प्रणय या प्रकारात दाखवण्यात येते.

देवतांवर आधारित मालिका आणि नाटके यांचा उद्देश ‘समाजामध्ये देवावरील श्रद्धा निर्माण करणे’, हा असूनही कधी कधी त्यांचे सादरणीकरण चुकीच्या पद्धतीने केले जाते. या मालिकांत ‘देवींना अल्प वस्त्रांत दाखवणे, कथानक तोडून-मोडून प्रस्तुत करणे, देवतांचे अतीमानवीकरण करणे’ इत्यादी आढळते. कधी नारदमुनींना थट्टेचा विषय बनवले जाते, तर राष्ट्रपुरुषांना गाण्यावर नाचतांना दाखवले जाते. यांतून कलेचे अधःपतन होत आहे.

६. पाश्चात्त्य कलांच्या ‘फ्यूजन’ मुळे सात्त्विक भारतीय कलांतील सात्त्विकता घटणे 

भारतीय कला मुळातच ईश्वरनिर्मित असल्याने सात्त्विक आहेत. त्यांचे पाश्चात्त्य कला प्रकारांच्या समवेत अशास्त्रीयरित्या ‘फ्यूजन’ केल्याने मूळ कलेतील सात्त्विकता घटते. ‘फ्यूजन’ संगीतामुळे मनाला तात्कालिक सुख मिळते किंवा ते ऐकावेसे वाटते; परंतु आपल्याला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही.

वरील विवेचनातून हे लक्षात येते की, कला हे केवळ करमणुकीचे साधन नसून ते समाजाचे आणि व्यक्तीचे अंतर्मन घडवणारे प्रभावी माध्यम आहे. जेव्हा कला ही ईश्वरस्मरण, आत्मशुद्धी आणि सात्त्विक भावना यांतून साकार होते, तेव्हा ती समाजाला उन्नतीकडे नेते; परंतु प्रसिद्धी, स्पर्धा, विकृती अन् भौतिक आकर्षणे यांच्या आहारी गेल्यावर तीच कला अधःपतनाचे कारण ठरते; म्हणूनच आजच्या काळात कलाकार, रसिक, पालक आणि प्रसारमाध्यमे या सर्वांचेच हे दायित्व आहे की, त्यांनी कलेच्या मूळ सात्त्विक स्वरूपाचे संरक्षण करावे, अन्यथा क्षणिक लोकप्रियतेसाठी विकृतीकडे झालेल्या कलेच्या या प्रवासामुळे भावी पिढी आध्यात्मिक मूल्यांपासून वंचित राहील.’

(क्रमशः)

संग्राहक : सौ. रेणुका क्राक, नाट्य आणि संगीत अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२.२.२०२६)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८

ईमेल : [email protected]

भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1009514.html