कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’ या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. भगवद्भक्ती करण्याचे माध्यम असणार्या आणि मंदिर संस्कृतीशी संलग्न असलेल्या या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश आता काळाच्या प्रभावामुळे पालटत चालला आहे.
(लेखांक १४)
‘मागील लेखात आपण मूळ शास्त्रीय कलांचे शुद्ध स्वरूप हरपून त्यात ‘फ्युजन, रिमिक्स (मूळ गाण्यात पालट करून नवीन गाणे तयार करणे) आणि काही वेळा विडंबन’ होऊन आज कला हळूहळू विकृतीकडे कशा प्रकारे जात आहे’, हे समजून घेतले. भारतीय कला या ईश्वरनिर्मित असल्याने त्या कलांमधून मूलतः व्यक्तीला सात्त्विकता मिळते. म्हणजे या दैवी कलांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात असते; परंतु आजच्या विकृतीयुक्त कलांच्या सादरीकरणामुळे कलेतील मूळ सात्त्विकता लोप पावत आहे. सध्याच्या रज-तम प्रधान कलेचा मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसा परिणाम होतो ? याचे विवेचन आपण आजच्या लेखात पहाणार आहोत.
(भाग ४)
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1009514.html
१. रज-तम प्रधान कलांचे शारीरिक स्तरावर होणारे दुष्परिणाम
१ अ. ‘विपरीत हालचाली आणि ‘स्टंट्स’ यांमुळे कलाकाराच्या शरिरावर होऊ शकणारा दुष्परिणाम : अनेक ‘रिॲलिटी शोज’ आणि ‘टॅलेंट शोज’ यांमध्ये पहातो की, ‘कलाकार त्याच्या कलेचे सादरीकरण करतांना विविध ‘स्टंट्स’ (कसरती) करतो, उदा. उंचावरून उड्या मारणे, आगीशी खेळ करणे, कला प्रदर्शनात धारदार वस्तूंचा वापर करणे’ इत्यादी. या ‘स्टंट्स’मुळे कलाकार स्वतःच्या जिवालाच धोक्यात घालत असतो. अशा ‘स्टंट्स’मुळे त्याच्या शरिरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
१ आ. प्रेक्षक कलेतून अंतर्मुख न होता त्यांनी कलेला आक्रमकतेने किंचाळून दाद देणे : सध्या कलाकार सादर करत असलेली कला पहातांना प्रेक्षक कलेतून अंतर्मुख न होता कलेला दाद देण्यासाठी ओरडून किंवा किंचाळून प्रतिसाद देतात. त्यामुळे प्रेक्षागृहामध्ये किंवा दूरचित्र वाणीवरील कार्यक्रमांत प्रेक्षक, तसेच काही वेळा परीक्षक यांची हुल्लडबाजी चालू असलेली दिसते. यातून ‘खर्या कलेच्या आस्वादापासून मनुष्य दूर चालला आहे’, हे दिसून येते. ‘कलेला आतून अनुभवण्यापेक्षा बाह्यांगाने किंचाळून तिला दाद देणे’, हे व्यक्तीला अतिशय बहिर्मुख स्थितीला घेऊन जात असल्याचे लक्षण आहे.
लेखातील काही शब्दांचे अर्थ१. रिॲलिटी शोज : वास्तववादी किंवा सत्य घटनांवर आधारित कार्यक्रम २. टॅलेंट शोज : कलागुण / कौशल्य प्रदर्शनाचा कार्यक्रम ३. फ्यूजन : भारतीय आणि पाश्चात्त्य कला यांचे एकत्रीकरण करून केलेले सादरीकरण |
१ इ. कलाकारांची व्यसनाधीनता वाढणे : कलाकृतीच्या प्रस्तुतीमध्ये वेगवेगळ्या कलांच्या आवेशपूर्ण सादरीकरणासाठी काही कलाकार नशेच्या पदार्थांचा उपयोग करतांना दिसतात, उदा. मद्यपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे इत्यादी. ‘बाह्य नशा केल्याने कलाकार स्वतःला विसरून कलाकृती अधिक चांगल्या प्रकारे प्रस्तुत करू शकतो’, असेही समाजात सध्या समजले जात आहे. त्यामुळे बर्याचदा मद्यपान करून गायन, वादन आणि नृत्य केलेले पहाण्यास मिळत आहे. यामुळे कलेतील मूळ सात्त्विकतेचा आस्वाद घेण्याऐवजी व्यसनाधीनता वाढतांना दिसत आहे.
१ ई. अनैतिक कृत्ये करण्यात वाढ होणे : कलाकृती सादर करतांना महिलांनी ‘तोकडे कपडे परिधान करणे, कामुक हावभावांसहित गीत किंवा नृत्य प्रस्तुत करणे, महिला तसेच पुरुष यांनी नशेच्या पदार्थांचे सेवन करणे’, या सर्व गोष्टींमुळे ‘समाजात अनैतिक कृत्ये करण्यात वाढ झाली आहे’, असे लक्षात येते. याचे एक उदाहरण म्हणजे पारंपरिक गरबा खेळण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींमधील अनैतिक कृत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पडद्यावरील कलाकारांचा पडद्यामागेही असाच भाग पहायला मिळतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज या प्रकारे आचरण करण्याला ‘स्टेटस’ (प्रतिष्ठा) समजून हळूहळू समाजातून याला मान्यता मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणे, हे वैध ठरून तरुण पिढी यासाठी प्रवृत्त होत आहे.
विश्रान्तिर्यस्य सम्भोगे सा कला न कला मता ।
लीयते परमानन्दे ययात्मा सा परा कला ।।
अर्थ : जिचा उद्देश केवळ भोग किंवा मनोरंजन आहे, ती कला नव्हे; जी आत्म्याला परमानंदात विलीन करते, तीच खरी कला होय.
(संदर्भ : कथक नृत्य शिक्षा – प्रथम भाग)’
२. रज-तम प्रधान कलेचे मानसिक स्तरावर होणारे दुष्परिणाम

२ अ. अहंकार दुखावला गेल्यावर मानसिक तणावामुळे कलाकार व्यसनांच्या आहारी जाणे : बर्याचदा कलाकार त्याच्या कलेतील कौशल्यामुळे प्रसिद्धीच्या मोठ्या झोतात येतो. त्यामुळे त्या कलाकाराच्या अहंकाराचे पैलू जागृत होण्याची शक्यता वाढते आणि स्वतःचा अहंकार टिकवण्यासाठी त्याच्या मनात सतत प्रशंसेची अपेक्षा निर्माण होते. सहकलाकार अथवा समाजातील लोक यांच्याकडून अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्यास त्या कलाकाराची चिडचिड होऊन त्याला अस्वस्थता येते. अशा प्रकारे त्याच्या मनात मत्सर आणि द्वेष अशा मानसिक विकारांची बीजे रोवली जातात. यामुळे कलाकाराचे अंतर्मन अशांत रहायला लागून त्याच्या मनावर ताण येऊ लागतो, तसेच त्याचे नकारात्मक विचार वाढीला लागतात. यांपासून दूर जाण्यासाठी तो अमली पदार्थांचा आधार घेतो. एकदा शरिराला अशा व्यसनाची सवय लागली की, ती व्यक्ती पूर्णपणे त्या व्यसनाच्या अधीन होते. व्यसनामुळे त्याला तात्पुरती शांतता मिळाल्यासारखी वाटते; परंतु त्याच्या अंतर्मनातील स्वभावदोष, अहंकार आणि अन्य विकार मात्र तसेच रहातात. परिणामी या सगळ्याचा त्याच्या कलेच्या सादरीकरणावर विपरीत परिणाम होतोच आणि व्यसनामुळे त्याच्या शरिरावरही घातक परिणाम होतो.
२ आ. कलाकाराला नैराश्याला सामोरे जावे लागणे : आज सगळीकडे स्पर्धेचे युग आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या स्पर्धांना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत कला क्षेत्रातील कलाकारांचीही स्वतःला टिकवून ठेवण्याची धडपड पहायला मिळते. सततची प्रसिद्धी आणि यश यांमुळे एका उंचीवर पोचलेल्या कलाकाराला अकस्मात् अपयशाला सामोरे जावे लागले, तर तो हे अपयश पचवू शकत नाही. काही वेळेला अनेक कलाकार अनेक बाह्य गोष्टींमध्ये अडकल्याने तीव्र निराशेत गेलेले दिसून येतात. ही निराशा त्यांचा आत्मविश्वास न्यून करून त्यांना व्यसनाधीनतेकडे नेणारी ठरते. कलाकाराला कलेतून आनंदप्राप्ती होण्याऐवजी तो नैराश्यग्रस्त झालेला दिसतो. काही वेळा या निराशेतून कलाकार आत्महत्येसाठीही प्रवृत्त होतांना दिसतो.
२ इ. आत्महत्येला प्रोत्साहित करणारे संगीत : संगीत कलेतील एक विकृती म्हणजे काही निराशायुक्त गीतांची निर्मिती ! अशा प्रकारची गीते ऐकून चांगली व्यक्तीही निराशेत जाऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ शकते. याचे एक उदाहरण म्हणजे मूळचे हंगेरियन भाषेत असलेले आत्महत्येला प्रवृत्त करणारे एक गीत ! ‘हे गीत लिहिणार्याने तीव्र निराशेत ते लिहून आत्महत्या केली होती’, असे सांगितले जाते. याला ‘हंगेरीयन सुसाईड गीत’ असेही संबोधले जाते. ते गीत ऐकण्याचा परिणाम एवढा भयंकर होता की, हे गीत ऐकून अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे अनेक देशांमध्ये या गीतावर बंदी आली होती. अशा प्रकारची विकृत कलेची निर्मिती होणे, हे समाज विघातकच ठरते.
२ ई. स्वभावदोष आणि अहंभाव वाढल्यामुळे कलाकाराच्या व्यक्तीमत्त्वावर होणारे दुष्परिणाम : संगीताचे ज्ञान हे महासागराप्रमाणे अथांग आहे. जेव्हा शिष्याला वाटते की, ‘मला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे’, तेव्हा त्यातून त्याचा अहंकार वाढतो. त्याची नवीन शिकण्याची इच्छा न्यून होते; परिणामी त्याच्या कलेतून अहंकारयुक्त सादरीकरण होऊ लागते. या अहंकारामुळे कलाकाराच्या व्यक्तीमत्त्वावरही त्याचे दुष्परिणाम होतांना दिसतात, उदा. दोन कलांच्या एकत्रित सादरीकरणातून ‘जुगलबंदी’ हा प्रकार सादर होतो. पूर्वी जुगलबंदीमध्ये दोन्ही कलाकार अन्य कलाकाराचा मान ठेवून त्याच्याकडून शिकण्याच्या स्थितीत राहून कला सादर करत असत; परंतु अलीकडे आपण पहातो की, जुगलबंदीमध्ये अन्य कलाकारापेक्षा स्वतःचे श्रेष्ठत्व आणि वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रकार अधिक होतांना दिसत आहे. ज्यामुळे त्या कलेतील निर्भेळ आनंदापेक्षा त्या कलेचे अहंकारयुक्त सादरीकरण होतांना दिसते.
३. रज-तम प्रधान कलेचे मनुष्यावर होणारे आध्यात्मिक स्तरावरील दुष्परिणाम

३ अ. विकृत कलेतून नकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात ग्रहण होणे : सध्याचा कलेतून निर्माण होणार्या विकृतीचा वाढता कल (ट्रेंड) पहाता अशा कलेमधून नकारात्मक स्पंदनांचेच प्रक्षेपण अधिक प्रमाणात होत आहे. या नकारात्मक ऊर्जेचा मनुष्यावर होणारा दृश्य परिणाम म्हणजे अकस्मात् काही कारण नसतांना डोके जड होणे किंवा दुखणे, अनावश्यक चिडचिड होणे, काही न सुचणे इत्यादी. ही लक्षणे वरकरणी शारीरिक आणि मानसिक स्वरूपाची वाटत असली, तरी यामागे त्या कलेतील नकारात्मक ऊर्जा हेच आध्यात्मिक कारण असते.
(अशा प्रकारचे अनुभव समाजातील लोकांना येत असतात; परंतु ‘असे का होत आहे ?’ याचे कारण त्यांना ठाऊक नसल्याने ते याला केवळ ‘शारीरिक आणि मानसिक स्तरावरील परिणाम’, असे समजतात.)
३ आ. नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणार्या कलांच्या माध्यमातून अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असणे : हिंदु धर्मातील अनेक धर्मग्रंथ आणि पुराणे यांमध्ये आपण पहातो की, प्रत्येक युगामध्ये सुर (देवता) आणि असुर (राक्षस, अनिष्ट शक्ती) यांचे युद्ध झाले आहे. आपल्या मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे सुर-असुर यांचे सूक्ष्म जगत आजही अस्तित्वात आहे. देवता सत्त्वगुणप्रधान असतात, तर अनिष्ट शक्ती या तीव्र रज-तम प्रधान असतात. इंग्रजीत एक प्रचलित म्हण आहे, ‘लाईक ॲट्रॅक्ट्स लाईक’ (like attracts like’) म्हणजे ‘समानधर्मी गोष्टी एकमेकांकडे (लवकर) आकृष्ट होतात.’ याप्रमाणे रज-तम प्रधान विकृत कला प्रदर्शनातून अनिष्ट शक्ती कलाकार आणि दर्शक यांच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे अशा कलांच्या सादरीकरणातून कलाकार आणि दर्शक यांना अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याचीही शक्यता असते.
अशा प्रकारच्या आध्यात्मिक त्रासाविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने कलांविषयक अनेक संशोधनपर प्रयोग करण्यात आले आहेत. यातूनच ‘कोणत्या प्रकारच्या कलेला अनिष्ट शक्ती कशा प्रकारे प्रतिसाद देतात ?’, याचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. या प्रयोगांतून ‘विकृतीजन्य कलांच्या माध्यमातून व्यक्ती, झाडे आणि वातावरण यांच्यावर नकारात्मक उर्जेचे प्रक्षेपण अधिक प्रमाणात होते’, हेही निदर्शनास आले आहे.
या लेखमालेतील लेखांच्या माध्यमातून ‘आपली मूळ शुद्ध आणि सात्त्विक स्वरूपातील कला आज कोणत्या दिशेने जात आहे ? आणि त्याचे समाजावर कोणते दुष्परिणाम होत आहेत ?’, हे आपण समजून घेतले. आजच्या पिढीतील कलाकारांनी ‘ईश्वप्राप्तीसाठी कला’ हा कलेचा मूळ उद्देश समजून घ्यावा आणि शुद्ध, सात्त्विक कलांच्या माध्यमातून साधना करून स्वतःच्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे’, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना !
(समाप्त)
– कु. अंजली कानस्कर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सौ. अनघा जोशी, बी.ए. संगीत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.(१७.२.२०२६)
लेखांक १५ वचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1014922.html

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !