‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बी.एन्.पी.)’च्या निर्णायक विजयाने बांगलादेशाच्या सत्ताकारणात नव्या पर्वाचा प्रारंभ झाल्याचे संकेत मिळत आहेत. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाकडे बांगलादेशाची जनता अपेक्षेने पहात असली, तरी गेल्या २ वर्षांत युनूस यांच्या काळात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, आर्थिक गतीतील मंदी, तसेच कट्टरतावादी इस्लामी शक्तींचे वाढते प्राबल्य ही आव्हाने ठोस आणि तातडीची आहेत. भारताशी संबंधांत आलेली दूरवस्था हीसुद्धा दुर्लक्षून चालणार नाही. नव्या सत्तेसमोर देशांतर्गत संतुलन प्रस्थापित करण्यासह प्रादेशिक समीकरणे नव्याने आखण्याची आवश्यकता उभी ठाकली आहे. या पालटत्या परिस्थितीचा बांगलादेश आणि भारत यांच्यावर होणार्या परिणामांचा घेतलेला वेध…

जुलै २०२४ मध्ये बांगलादेशात झालेली राजकीय उलथापालथ
बांगलादेशाची १३ वी सार्वत्रिक निवडणूक १२ फेब्रुवारी या दिवशी पार पडली. ही निवडणूक केवळ एक नियमित राजकीय प्रक्रिया नव्हती, तर बांगलादेशातील लोकशाहीच्या भविष्याला आकार देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पाही होती. या निवडणुका अशा वेळेस पार पडल्या आहेत, जेव्हा जागतिक स्तरावर जगाची विभागणी ही आर्थिक आणि लष्करी सत्ता समतोलाद्वारे निर्माण होणार्या नव्या विश्वव्यवस्थेकडे जात आहे.

बांगलादेशामध्ये वर्ष २०२४ मध्ये सर्वांत गंभीर राजकीय उलथापालथ झाली होती. सत्ता, संस्था आणि समाज या तिन्ही पातळ्यांवर या देशाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया चालू होती. जुलै २०२४ मध्ये ‘जेन-झी’ (वर्ष १९९७ ते २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी) यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी चळवळीने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे १५ वर्षांचे सरकार उलथवून टाकले. एकेकाळी बांगलादेशी लोकशाहीचे प्रतीक मानल्या जाणार्या हसीना यांच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांत अधिकाधिक हुकूमशाही आणि दडपशाही बनल्याचा आरोप त्यांच्यावर होता. शेख हसीना यांच्या पतनानंतरच्या काही काळानंतर ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेते महंमद युनूस यांनी अमेरिका आणि इंग्लंड यांच्या साहाय्याने देशाचे अंतरिम नेतृत्व स्वीकारले. राजकीय उलथापालथीनंतर शेख हसीना भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. यामुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये निर्माण झालेल्या संवेदनशीलतेचा लाभ हा भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तानने उचललेला दिसतो.
‘बी.एन्.पी.’चे तारिक रहमान यांना मिळालेले बहुमत आणि त्यांची पार्श्वभूमी

बांगलादेशाची संसदीय व्यवस्था एकसदनी असून तिला ‘राष्ट्रीय संसद’ म्हणतात. संसदेत एकूण ३५० सदस्य असतात, त्यापैकी ३०० थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात आणि उर्वरित ५० जागा महिलांसाठी राखीव आहेत. या महिला थेट जनतेद्वारे निवडल्या जात नाहीत, तर संसदेतील त्यांच्या जागांच्या प्रमाणात निवडून आलेल्या पक्षांना वाटल्या जातात. या प्रणालीचा उद्देश ‘संसदेत महिलांचे प्रतिनिधीत्व वाढवणे आणि राजकीय समावेश सुनिश्चित करणे’, हाच आहे, ज्यामुळे अधिक संतुलित लोकशाही व्यवस्था निर्माण होईल, असा त्यामागचा हेतू. बांगलादेशाचा मुख्य विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.) या निवडणुकीत ‘सर्वांत मजबूत शक्ती’ म्हणून उदयास आला आहे. पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे १७ वर्षांच्या निर्वासनानंतर ते बांगलादेशाचे पंतप्रधान होणार आहेत. ‘बी.एन्.पी.’ने ३०० सदस्यांच्या संसदेत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली २०९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तसेच कट्टरपंथी ‘जमात-ए-इस्लामी’ आणि त्याच्या ११ मित्रपक्षांना केवळ ७६ जागाच मिळाल्या आहेत. त्यासह माजी राष्ट्रपती शेख हसीना यांची ‘अवामी लीग’ या निवडणूक प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर राहिली. ‘क्राऊन प्रिन्स’ तारिक रहमान यांनी स्वतःला उदारमतवादी केंद्रित, राष्ट्रवादी आणि लोकशाही पर्याय म्हणून सादर केले असले, तरी अस्थिरतेच्या गर्तेतून देशाला बाहेर काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. ‘बी.एन्.पी.’ची पार्श्वभूमी बघता जवळजवळ २ दशकांनंतर ती सत्तेत परत येत आहेत. तारिक रहमान यांचे राजकीय जीवन वर्ष १९८० च्या दशकात चालू झाले आणि वर्ष २००१ च्या निवडणुकीत ‘बी.एन्.पी.’ला दोन तृतीयांश बहुमत मिळवून देण्यात त्यांची निर्णायक भूमिका होती. भ्रष्टाचार आणि ‘मनी लॉड्रिंग’सारख्या आरोपांमुळे वर्ष २००८ पासून ते लंडनमध्ये अज्ञातवासात होते. वर्ष २०२४-२०२५ मध्ये बांगलादेशातील न्यायालयाने त्यांची ८४ प्रकरणांमधून निर्दोष मुक्तता केली.
– डॉ. तुषार रायसिंग
‘बी.एन्.पी.’ समोर असलेली पुढील आव्हाने
‘बांगलादेशाचे यापुढील परराष्ट्र धोरण बांगलादेश आणि तेथील लोकांचे हित लक्षात घेऊनच ठरवले जाईल’, असे ‘बी.एन्.पी.’चे तारिक रहमान सांगत आहेत; मात्र ३ महत्त्वाची आव्हाने ही त्यांच्या समोर असतील –

अ. बांगलादेशाची अर्थव्यवस्था : पहिला मुद्दा हा बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. वस्त्रोद्योग हा बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून एकूण ‘जीडीपी’च्या (एकूण देशांतर्गत सकल उत्पादन) १० टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सेदारी आणि जवळजवळ ४० लाख लोकांना या क्षेत्रातून रोजगार मिळतो. त्यांपैकी बहुतेक लाभार्थी या महिला आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक व्यापाराचा प्रवाह सुरळीत करण्याचे कार्य करण्यासाठी तारिक रहमान यांना जगातील प्रगतीशील अर्थव्यवस्थांशी नव्याने बोलणी चालू करावी लागतील. यामध्ये भारत ही बांगलादेशची सर्वांत मोठी आवश्यकता आणि बाजारपेठ आहे. मागील २ वर्षांपासून बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम हा व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षा यांवर झाला, तसेच अल्पसंख्यांक हिंदूंविरुद्धच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भारत अन् आंतरराष्ट्रीय समुदायांमध्येही चिंता निर्माण झाली. भारतासह परस्पर आदर आणि समजूत यांवर आधारित राजकीय संबंध निर्माण करण्याचे कार्य तारिक रहमान यांना करावे लागेल.
बांगलादेशातील अस्थिरतेचा परिणाम
वर्ष २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर कायदा आणि सुव्यवस्था पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ही निवडणूक फक्त बांगलादेशासाठीच महत्त्वाची नव्हती, तर भारत आणि दक्षिण आशिया यांच्यातील अनेक भू-राजनैतिक समीकरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती. मागील २ वर्षांपासून बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम हा फक्त तेथील आर्थिक व्यवस्थेवरच झाला नसून सामाजिक सुरक्षा आणि स्थिरता यांवरही झाला आहे. ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या कट्टरपंथी गटाचे बांगलादेशाच्या अंतर्गत राजकारणात वाढणारे महत्त्व यापुढेही हे देशाच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव टाकणारे राहील. बांगलादेशाच्या निर्मितीनंतर पाकिस्तानचे या देशाच्या अंतर्गत राजकारणात वाढणारे महत्त्वही आपण यातून बघू शकतो. लोकशाहीची लवचिकता केवळ निर्णायक विजयांवरच नाही, तर शिस्तबद्ध सीमांवरही अवलंबून असते. पाकिस्तान आणि चीन यांचे बांगलादेशात वाढणारे सामरिक महत्त्व, हे भारताच्या आर्थिक अन् लष्करी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. गेल्या काही मासांत अनेक कारणांमुळे बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले आहेत. या दोन्ही देशांच्या अंतर्गत राजकारणामुळेच नव्हे, तर पालटत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळेही हा तणाव वाढला आहे.
– डॉ. तुषार रायसिंग
आ. इस्लामी राजकारणाची पुनर्रचना : दुसरे म्हणजे या निवडणुकीचा एक महत्त्वाचा पैलू हा इस्लामी राजकारणाची पुनर्रचना आणि त्यातून पुढे आलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’च्या नेतृत्वातील युतीशी संदर्भात आहे, तसेच विद्यार्थी, ग्रामीण भाग आणि धार्मिक मतदार यांसह ‘उदारमतवादी विरुद्ध इस्लामी’ या ध्रुवीकरणाचा परिणाम हा भविष्यातील बांगलादेशाचे परराष्ट्र धोरण, दिशा अन् सामाजिक रचनेवर नक्कीच करील. ‘जमात’ला पाठिंबा देणार्या ११ पक्षांमध्ये ‘नॅशनल सिटीझन्स पार्टी’चा समावेश असून जी शेख हसीनाविरोधी निदर्शनांमधून उदयास आलेली युवा संघटना आहे. ‘जमात’च्या नेतृत्वाखालील युतीने या निवडणुकीत ७६ जागा जिंकल्या आहेत. एक मजबूत कट्टर इस्लामी पक्ष आणि ‘जेन-झी’ प्रेरित युवा ब्रिगेड जी सामाजिक माध्यमे, विद्यापीठ चळवळी आणि नागरी मंच यांद्वारे सक्रीय असलेली ही पिढी पारंपरिक पक्ष आधारित राजकारणावर असमाधानी दिसते, तसेच माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानणारे समर्थक या सर्वांना समवेत घेऊन तारिक रहमान यांना समतोल साधून पुढे जाण्याचे आव्हान नक्कीच असेल.
भारतावर परिणाम

भारताने ‘बी.एन्.पी.’च्या विजयाचे स्वागत केले असून सतर्क आशावाद बाळगून पंतप्रधान मोदी यांनी तारिक रहमान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बांगलादेश हा दक्षिण आशियाच्या धोरणात्मक, आर्थिक आणि भूराजकीय रचनेत महत्त्वाचे स्थान राखतो. ही निवडणूक भारतासाठी विशेषतः संवेदनशील ठरली आहे. बांगलादेशाचे सामरिक महत्त्व हे त्याच्या भौगोलिक स्थानामुळे असून भारताची सर्वांत मोठी ४ सहस्र ९६ कि.मी. लांबीच्या भूसीमा या देशासह आहे. भारताच्या पूर्वोत्तर राज्यांना जोडणार्या ‘चिकन नेक कॉरिडॉर’ला धोका किंवा संधी दोन्हीही यातूनच निर्माण होतात. भारताच्या बंगाल, त्रिपुरा, आसाम, मेघालय या ४ राज्यांच्या सीमा बांगलादेशाशी जोडल्या जातात. एकांगवादी ‘बी.एन्.पी.’ सरकार ‘बांगलादेश फर्स्ट’ (बांगलादेश प्रथम) या धोरणावर भर देईल, ज्यामध्ये आर्थिक संबंध दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचे आहेत. व्यापार, सुरक्षा आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावरच त्यांचा जोर असेल. बांगलादेश हा दक्षिण आशियातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, ज्यामध्ये कापड आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे अन् भारताला स्थिर बांगलादेशाच्या हितासाठी व्यापार वाढतांना पहायचे आहे. बांगलादेशाने एका महत्त्व पूर्ण व्यापारी भागीदाराशी संबंध राखणेही शहाणपणाचेच ठरेल; मात्र शेख हसीना यांच्या प्रत्यापर्णासारख्या सूत्रांवर भारताशी मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होईल, अशी शक्यताही नाकारता येत नाही.
या भागात पाकिस्तानचे हितसंबंध संरचनात्मकपेक्षा अधिक धोरणात्मक आहेत. बांगलादेशातील ‘आय.एस्.आय.’ (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा)ची यंत्रणा मागील २ वर्षात झपाट्याने वाढलेली आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ने ७६ सभासद मिळवले असले, तरी ते सरकारमध्ये थेट सामील होणार नाहीत; पण ‘बी.एन्.पी.’वर दबाव नक्कीच येईल. ‘जमात’च्या भारतविरोधी आणि मुख्यतः हिंदूंविरोधी विचारसरणीमुळे अन् पाकिस्तानशी जवळीक असल्याने द्विपक्षीय संबंधात अडचणी निर्माण होतील. पुढच्या टप्प्यात तिस्ता पाणीवाटप, सीमा सुरक्षितता आणि ‘कनेक्टिव्हिटी’ (दळणवळण) प्रकल्प यांमध्ये अडथळे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भारतासाठी या संक्रमणाची धोरणात्मक वास्तववादावर आधारित रणनीती ही संयम आणि लक्ष ठेवण्यावरच असेल. सध्याची परिस्थिती आणि गेल्या दीड वर्षांत भारत-बांगलादेश संबंधांमधील तणाव पहाता हा निकाल भारताला दिलासा देणाराही ठरू शकतो. बांगलादेशामधील एका मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षाचा विजय निर्णायकपणे झाला आहे. बांगलादेशातील इस्लामीकरणाच्या शक्तींनाही या निकालाने काही प्रमाणात निष्प्रभ केले आहे; कारण बांगलादेशातील जवळपास १ कोटी अल्पसंख्यांकांमधील बहुतांश नागरिक हे तारिक रहमान यांच्या मागे उभे राहिले असून त्यांच्या नागरी हक्काचे रक्षण आणि विकास ही नव्या सरकारचे मुख्य धोरण असले पाहिजे. बांगलादेशातील जनादेशाचे शाश्वत, सहभागी आणि उत्तरदायी लोकशाहीमध्ये किती यशस्वीरीत्या रूपांतर होते, हे काळच सांगेल !
– डॉ. तुषार रायसिंग
इ. लोकशाही वाचवणे : तिसरा मुद्दा हा तरुणांसाठी रोजगार आणि आर्थिक संधी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, मानवी हक्क अन् अभिव्यक्तीस्वातंत्र्य, लिंग समानता, तसेच सामाजिक न्याय स्थापित करणे यांसंदर्भात आहे. बांगलादेशाची वर्ष २०२६ ची सार्वत्रिक निवडणूक केवळ देशांतर्गत राजकारणापुरती मर्यादित नाही, तर त्याचे व्यापक असे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिणामही आहेत. भारत, चीन, अमेरिका आणि युरोपीय देश यांची सामरिक गणितेही याच भागात आहेत. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाने जगासमोर स्वतःचे सार्वभौमत्व सिद्ध केले; परंतु आजपर्यंत देशातील लोकशाही वाचवण्यासाठी बांगलादेशाला परीक्षा द्यावी लागत आहे. स्पर्धात्मक आणि धोरणात्मक दबावांखाली न येता सार्वभौमत्वाचा वापर करणे, हे जागतिक राजकारणात इतके सोपे नसते.
भारताच्या दृष्टीकोनातून ढाक्यातील राजकीय निकालांचे बाह्य मूल्यांकन कितीही सावध असले, तरी प्रादेशिक संतुलन आणि भारताच्या स्वतःच्या सुरक्षा धोरणांवर तेथील परिस्थितीचे अपरिहार्यपणे परिणाम पडतात. ढाक्यातील स्थिरता ही भारताच्या पूर्वेकडील सुरक्षा व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. भारत-बांगलादेश संबंध इतिहासात रुजलेले आहेत; परंतु भूगोलामुळेही ते मजबूतही होतात. सामायिक नद्या, एकात्मिक पुरवठा साखळी, सीमा व्यवस्थापन, ऊर्जा आणि बंगालच्या उपसागरातील सागरी सुरक्षेचे राजकारण, जोखीम अन् आर्थिक धोके, तसेच बांगलादेशातून भारतात होणारे आर्थिक स्थलांतर हा अनेक भारतीय राज्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. हा प्रश्न सौहार्दपूर्ण आणि संवेदनशीलपणे सोडवणेही महत्त्वाचे झाले आहे. (१५.२.२०२६)
– डॉ. तुषार रायसिंग, साहाय्यक प्राध्यापक, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !