भगवान शिव आणि श्री गणेश यांचा अवमान करणारे विज्ञापन आस्थापनाने मागे घेतले

  • छत्तीसगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या संघर्षाला यश

  • लेखी स्वरूपात मागितली क्षमा

‘दैनिक भास्कर’ आणि ‘हरिभूमि’ यांमध्ये भगवान शिव आणि श्री गणेश यांचा व्यावसायिक विज्ञापनांमध्ये करण्यात आलेला अयोग्य वापर !

रायपूर (छत्तीसगड) – महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त छत्तीसगडमधील प्रमुख वृत्तपत्रे ‘दैनिक भास्कर’ आणि ‘हरिभूमि’ यांमध्ये भगवान शिव आणि श्री गणेश यांचा व्यावसायिक विज्ञापनांमध्ये अयोग्य वापर करण्यात आला होता. हे विज्ञापन देणारे ‘श्री गणेश ग्लोबल गुलाल प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाविरुद्ध हिंदु जनजागृती समितीने केलेल्या तीव्र विरोधाला मोठे यश मिळाले आहे. समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या अपमानास्पद विज्ञापनाविरुद्ध पोलीस कारवाईची मागणी केल्यानंतर आस्थापनाने लेखी स्वरूपात विनाअट क्षमायाचना केली आहे.

विज्ञापनात काय अयोग्य होते ?

या विज्ञापनात श्री गणेशाच्या हातात ‘गुलाल’ आणि ‘ठंडाई’ यांची पाकिटे दाखवण्यात आली होती. यात देवतांना ‘मॉडेल’प्रमाणे (आस्थापनाने बनवलेल्या साहित्याचा प्रसार करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीप्रमाणे) सादर करण्यात आले होते. यासह विज्ञापनात भगवान शिव आणि शिवलिंग यांच्याभोवती ‘कॅप्टन अमेरिका’सारख्या परदेशी काल्पनिक पात्रांचे, तसेच इतर उत्पादनांचे चित्रण करण्यात आले होते.

आस्थापनाने मान्य केली चूक

विरोधानंतर आस्थापनाचे संचालक उमंग गोयल यांनी श्री गणेशाच्या हातात स्वतःचे उत्पादन दर्शवणे ही त्यांची मोठी चूक आणि अनवधानाने झालेली त्रुटी असल्याचे मान्य केले.

‘श्री गणेश ग्लोबल गुलाल प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने दिलेले क्षमायाचनेचे पत्र –

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

आस्थापनाने तिच्या पत्रात स्पष्ट केले की, ही दुर्दैवी घटना अनवधानाने घडली असून त्याबद्दल ते सर्व हिंदू सनातनी समाजाची मनःपूर्वक क्षमा मागतात. तसेच भविष्यात अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही, अशी हमी दिली आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)