पाकिस्तानच्या सिंध, बलुच आणि पश्तून या भागांतील उठावाची स्थिती

पाकिस्तान आज केवळ आर्थिक किंवा राजकीय संकटातच नाही, तर तो आतून तुटण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या ४ प्रांतांमध्ये विभागलेला आहे. वर्ष २०२६ च्या प्रारंभीला विशेषतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ही स्थिती आणखी वाईट दिसते. प्रत्येक प्रांतात लोक वेगवेगळ्या कारणांमुळे पाकिस्तानपासून वेगळे होण्याविषयी बोलू लागले आहेत.

‘बी.एल्.ए.’च्या आक्रमणात पाक सैनिकांच्या गाड्यांची झालेली हानी

१. बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या अंतिम लढाईत

बलुचिस्तानमधील परिस्थिती सर्वांत स्फोटक आणि निर्णायक बनली आहे. ‘पाकिस्तानने त्यांच्या भूभागावर बळजोरीने कब्जा केला आहे’, असे बलुचिस्तानची जनता बर्‍याच काळापासून म्हणत आली आहे. वायू, खनिजे आणि ग्वादर बंदर यांचा संपूर्ण देशाला लाभ होतो; परंतु त्या बदल्यात बलुच लोकांना केवळ गरिबी, बेरोजगारी अन् दडपशाही मिळाली आहे. २० सहस्रांहून अधिक लोक वर्षानुवर्षे बेपत्ता आहेत. आजतागायत त्यांचा कोणताही मागमूस नाही. बलुच लोकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी सैन्याने त्यांची निर्घृणपणे हत्या केली. बलुच आता या संघर्षाला मुक्तीचे अंतिम युद्ध मानतात.

२. ‘बलुचिस्तान लिबेरशन’कडून ठिकठिकाणी होणारी आक्रमणे

या रागातून ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (‘बी.एल्.ए.’)सारख्या शक्तींचा उदय झाला आहे. ३१ जानेवारी २०२६ या दिवशी ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ अंतर्गत अनेक शहरांमध्ये (क्वेटा, ग्वादर, मच, पंजगुर, नुशकी, मस्तुंग, खारण) एकाच वेळी मोठी आक्रमणे केली. पोलीस ठाणी, लष्करी आस्थापने, सरकारी कार्यालये आणि ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये ८० हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि अनेक सुरक्षा कर्मचारी मारले गेले, तसेच काहींना ओलीस ठेवण्यात आले. या काळात अनेक नागरिकही मारले गेले. आता परिस्थिती अशी आहे की, बलुच स्त्रियाही आत्मघातकी आक्रमणांमध्ये सहभागी होत आहेत. यावरून त्यांचा राग किती प्रमाणात आहे, हे दिसून येते.

३. भारताचा सहभाग असल्याचा पाकिस्तान सरकारचा आरोप

या आक्रमणांमागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान सरकार करते; परंतु प्रत्यक्षातील वस्तूस्थिती अशी आहे की, बलुच लोक त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायामुळे उद्विग्न झाले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली, तर पाकिस्तानपासून वेगळा होणारा पहिला प्रदेश बलुचिस्तान असू शकतो.

४. सिंधमधील बंडखोरीचे कारण : संस्कृती, भाषा आणि लोकसंख्या

सिंधमधील बंडखोरीचे स्वरूप वेगळे असले, तरी तितकेच गंभीर आहे. तेथील बंडखोरीचे कारण संस्कृती, भाषा आणि लोकसंख्या यांच्याशी जोडलेले आहे. अनेक सिंधी लोकांना वाटते की, ते त्यांच्याच प्रांतात अल्पसंख्यांक होत आहेत. कराचीसारख्या शहरांमध्ये बाहेरील लोकसंख्येचा दबाव वाढला आहे आणि सिंधी ओळख मागे पडत आहे. त्याच वेळी सिंधू नदीचे बहुतांश पाणी पंजाबमध्ये जात असल्याने सिंधमध्ये अप्रसन्नता आहे. ‘सिंधुदेश’ची मागणी आता केवळ एक घोषणा राहिलेली नाही, तर तिने एका संघटित चळवळीचे रूप धारण केले आहे. ‘जय सिंध मुत्ताहिदा महाज (जे.एस्.एम्.)’ ‘जय सिंध फ्रिडम मुव्हमेंट (जे.एस्.एफ्.एम्.)’, ‘जय सिंध कौमी महाज (जे.एस्.क्यू.एम्.)’, ‘सिंधुदेश लिबरेशन आर्मी’ अन् ‘सिंधुदेश रिव्हॉल्यूशनरी आर्मी’ हे विविध गट या चळवळीचे नेतृत्व करत आहेत.

५. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात ‘सिंधुदेश’ निर्मितीची जोरदार मागणी

त्यामुळे ‘सिंधुदेश’च्या मागणीला वेग येत आहे. जानेवारी २०२६ मध्ये जी.एम्. सय्यद यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त मोठ्या सभा घेण्यात आल्या, ज्यामध्ये ‘सिंधला स्वातंत्र्य हवे आहे’ आणि ‘सर्व बेपत्ता व्यक्तींना सोडवा’, अशा घोषणा उघडपणे देण्यात आल्या. ‘जय सिंध मुत्ताहिदा महाज’ने पाकिस्तानला ‘आतंकवादी राष्ट्र’ म्हणून संबोधत संयुक्त राष्ट्राकडे सिंधुदेशाला मान्यता देण्याची मागणी केली. कराचीमध्ये सिंध संस्कृती दिनानिमित्त हिंसक चकमक झाली. पंजाबसह सिंधूचे पाणी वाटून घेणे, कराचीतील मुहाजिर आणि पंजाबी लोकसंख्या यांचा वाढता प्रभाव अन् सिंधी अस्मितेची झीज यांमुळे असंतोष अधिकच वाढला आहे. सध्या ही चळवळ छोट्या आक्रमणांपुरती आणि प्रतिकात्मक निदर्शनांपुरती मर्यादित आहे; परंतु परिस्थिती बिघडल्यानंतर सिंध पाकिस्तानपासून वेगळे होऊन ‘सिंधुदेश’कडे जाऊ शकते.

बंडखोर शक्तींनी एकत्रित पावले उचलल्यास पाकचे ४ तुकडे होण्याची शक्यता दूर नाही !

पंजाब हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा प्रांत आहे. लष्कर, सरकार आणि अर्थव्यवस्था यांवर त्याचे वर्चस्व आहे; परंतु यामुळे इतर प्रांतांनी त्याला स्वतःचा शत्रू मानण्यास प्रारंभ केला आहे. सध्या पंजाबमध्ये कोणतीही मोठी फुटीरतावादी चळवळ नाही; परंतु जर बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा वेगळे झाले, तर पंजाब एकाकी अन् कमकुवत होईल. मग दक्षिण पंजाबसारखे अंतर्गत मतभेदही उद्भवू शकतात आणि हा प्रांतही अस्थिरतेपासून मुक्त रहाणार नाही.

आजची परिस्थिती अशी आहे की, ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’, ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’, ‘जय सिंध मुत्ताहिदा महाज’, ‘जय सिंध फ्रिडम मुव्हमेंट’ आणि इतर संघटना समांतरपणे सक्रीय आहेत अन् काही विषयांमध्ये त्या एकमेकांशी जोडलेल्याही आहेत. वर्ष २०२५-२६ मध्ये आक्रमणांची तीव्रता, आर्थिक दुर्दशा, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि बाह्य पाठिंबा यांमुळे पाकिस्तानचा अंतर्गत पाया कमकुवत झाला आहे. जर या बंडखोर शक्तींनी समन्वित पद्धतीने पावले उचलली, तर पाकिस्तानचे ४ भाग होणे अशक्य नाही. आधी बलुचिस्तान, नंतर सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि शेवटी एक कमकुवत असा अलिप्त पंजाब राहील.

– मोहीत चव्हाण

६. खैबर पख्तूनख्वा : पश्तूनांचा संताप

खैबर पख्तूनख्वामधील आग पश्तून राष्ट्रवादामुळे पेटवली जात आहे. लष्कराच्या कठोरतेविषयी आणि बळजोरीने बेपत्ता केल्याविषयी लोक बर्‍याच काळापासून तक्रार करत आहेत. ‘पश्तून तहफुज चळवळी’ने मानवाधिकारांचे उल्लंघन, बळजोरीने बेपत्ता होणे आणि लष्करी चौक्या यांच्या विरोधात बराच काळ आवाज उठवला आहे; परंतु सरकारने त्यावर बंदी घातली आहे. वर्ष २०२४ ची बंदी असूनही ‘पश्तून तहफुज चळवळी’ची वाढती आंतरराष्ट्रीय उपस्थिती आणि जानेवारी २०२६ मध्ये ‘दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या बाहेर झालेल्या निदर्शनांचे उदाहरण आहे.

७. परिस्थिती बिघडल्यास खैबर पख्तूनख्वा ‘पश्तूनिस्तान’ची मागणी करण्याची शक्यता

दुसरीकडे ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही सर्वांत हिंसक संघटना बनली आहे. अफगाणिस्तानमधून कार्यरत असलेल्या या संघटनेने वर्ष २०२६ मध्ये एक नवीन संघटनात्मक रचना सिद्ध केली आहे आणि ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या समन्वयाने बलुचिस्तानमधील पोलीस अन् सैन्य यांवर सतत आक्रमणे करत आहे. वर्ष २०२५ मध्ये ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने ७०० हून अधिक आक्रमणे केली आणि वर्ष २०२६ मध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिस्थिती बिघडल्यास खैबर पख्तूनख्वा एक तर वेगळ्या ‘पश्तूनिस्तान’ची मागणी करील किंवा अफगाणिस्तानात सामील होण्याविषयी चर्चा करील.

लेखक : मोहीत चव्हाण

(साभार : ‘न्यूज १८’ हिंदीचे संकेतस्थळ)