सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही

घटनास्थळी जुगाराचे आयोजन; मात्र तक्रार करूनही कारवाई नाही

प्रतिकात्मक चित्र

(धिर्यो म्हणजे रेडे किंवा बैल यांची झुंज)

मडगाव, १७ जुलै (वार्ता.) – दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी ‘धिर्यो’चे अनधिकृतपणे आयोजन होत असते. सासष्टी तालुक्यात तळावली येथे १६ जुलै या दिवशी ‘धिर्यो’चे आयोजन करण्यात आले होते. ‘धिर्यो’साठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. याविषयी प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे स्थानिकांनी तक्रारी नोंदवूनही त्यांच्याकडून नोंद घेण्यात आली नाही.

याविषयी रोशनी रॉड्रिग्स या प्राणीप्रेमी कार्यकर्त्या माध्यमांना म्हणाल्या, ‘‘मी १६ जुलै या दिवशी तळावली या गावातून जात असतांना अनुमाने ६०० ते ७०० लोक एकत्र जमलेले मी पाहिले आणि रस्त्याच्या बाजूला अनेक दुचाकी आणि चारचाकी उभ्या करून ठेवल्या होत्या. या भागात युवक मोठ्या संख्येने फिरत होते आणि तेथे ६-७ मालवाहू मध्यम स्वरूपाची वाहने (टेंपो) होती. या ठिकाणी एका जागेत भूमीवर प्लास्टिक घालण्यात आले होते आणि त्यावर पैशांचे गठ्ठे ठेवण्यात आले होते. येथे एक प्रकारे जुगार चालू होता. याविषयी मी मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलखुश वेळीप यांच्याकडे भ्रमणभाषवरून तक्रार नोंदवली. या वेळी पोलीस निरीक्षक दिलखुश वेळीप यांनी मला माझे नाव, माझा संपर्क क्रमांक आदी अनेक गोष्टी तक्रारदार या नात्याने विचारल्या; मात्र पोलीस निरीक्षक हा जुगार बंद करण्यासाठी वेळीच घटनास्थळी पोचले नाहीत. एखाद्या तक्रारदाराला तक्रार करतांना अनेक प्रश्‍नांची उत्तरे का द्यावी लागतात ? यामागे जुगारवाले आणि पोलीस यांच्यामध्ये काही साटेलोटे होते का ?, असा प्रश्‍न पडतो. मी याविषयी तक्रार केल्याने माझ्या विरोधात काही जण चुकीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. समाजासाठी कार्य केल्यास असे होत आहे.’’

संपादकीय भूमिका

असे निष्क्रीय पोलीस असून नसल्यासारखेच !