पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – वरळीच्या ‘एन्.एस्.सी.आय. डोम’ येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मधील (पाश्चात्त्य संगीताच्या कार्यक्रमा)मधील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थाच्या सेवनाने झाल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्याच्या शरिरात ‘एम्.डी.एम्.ए.’ हा अमली पदार्थ आढळल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गोरेगावच्या ‘नेस्को सेंटर’मधील कार्यक्रमानंतर वरळी डोममधील कार्यक्रमातही अमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे समोर आले आहे. गर्दीच्या तुलनेत वातानुकूलित यंत्रणा, तसेच इतर आवश्यक असलेल्या उपाययोजना आयोजकांनी केल्या नव्हत्या, असे दिसून आल्याने आयोजकांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत

ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. ६ जून या दिवशी हा कार्यक्रम होता. ६ सहस्रांहून अधिक तरुण या कार्यक्रमाला आले होते. वकिलीचे शिक्षण घेतलेला रूशील गांगुर्डे (वय २८ वर्षे) हा आपल्या मित्रांसह त्यात सहभागी झाला होता. रात्री त्याला अस्वस्थ वाटल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे भरती करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. अहवाल येण्यापूर्वी गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलिसांना वाटत होते.


अमली पदार्थाची साखळी शोधणार ! – पोलीस अधिकारी

अमली पदार्थाचे सेवन झाल्याचा अहवाल आल्याने आता पुन्हा रूशील गांगुर्डे याचे मित्र, आयोजक यांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीची पडताळणी केली जाणार आहे आणि अमली पदार्थाची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे पोलीस अधिकार्‍याने सांगितल्याचे संकेतस्थळावरील वृत्तांत प्रसिद्ध झाले आहे.

संपादकीय भूमिका

अमली पदार्थांविषयी महाराष्ट्र सरकारने ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अवलंबल्याचे सांगितले जाते. असे असतांना जिथे अमली पदार्थांची चलती असते, अशा पाश्चात्त्य संगीताच्या कार्यक्रमांवर सरकार केवळ महसुलासाठी बंदी आणत नाही, असे का होते ? अमली पदार्थांच्या विळख्यात येणारी पिढी नष्ट होत असेल, तर महसूल कुणासाठी वाढवायचा ?