‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘सनातन धर्मध्वजा’वर कोरलेले गोमातेचे चित्र प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर गायीविषयीच्या ज्या विलक्षण अनुभूती मला आल्या, त्या मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. एखादी अनुभूती जेव्हा आपल्याला स्पर्श करते, तेव्हा तिच्यामागे केवळ भावना नसून काहीतरी शास्त्रही असते, असे मला वाटते. ते शास्त्र समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक असते.
आतापर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोमाता ही केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी आरोग्य आणि निसर्गसंतुलन करणारी, जर्सी गायीच्या दुधाच्या दुष्परिणामांमुळे जगभरात देशी गायींविषयी संशोधनाला प्रारंभ होणे, गायीच्या दुधाविषयी असलेला अपसमज आणि त्याचे खंडण, गायीचे दूध अधिक पौष्टिक अन् औषधी असण्यामागील कारण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग १८)
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.
भाग १७ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1003676.html

१. गायीचे गोमूत्र आणि शेण सुपीकअन् जैविकदृष्ट्या शेतीसाठी समृद्ध
गायीचा पचनमार्ग इतर प्राण्यांच्या तुलनेत अत्यंत विकसित आणि मोठा असतो. गाय, इतर गुरांप्रमाणे गवत आणि विविध वनस्पती खाते अन् रवंथ करते. तिच्या मोठ्या आणि लहान आतड्यांची रचना अशी आहे की, ज्यामुळे अन्नाचे प्रभावी पचन होते आणि त्यातून शेणाची निर्मिती होते. गायीच्या पोटात असलेले उपयुक्त सूक्ष्मजीव अन्नपचनात महत्त्वाची भूमिका बजावतात. गाय जेव्हा औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती खाते, तेव्हा त्या अन्नाचे रूपांतर अत्यंत सुपीक शेणामध्ये होते. अभ्यासानुसार जर्सी गायीच्या शेणामध्ये सुमारे १० ‘ऑ’, म्हशीच्या शेणामध्ये १० ‘टी’, तर देशी गायीच्या शेणामध्ये १० ‘व्ही’ ते १० ‘एक्स’ इतक्या प्रमाणात उपयुक्त सूक्ष्मजिवाणू आढळतात. या फरकाचे मुख्य कारण, म्हणजे गायीची विशेष जठररचना आणि ‘सूर्यकेतू नाडी’चा प्रभाव. त्यामुळे गायीचे शेण अधिक सुपीक आणि जैविकदृष्ट्या शेतीसाठी समृद्ध ठरते.
२. शेतभूमीच्या अनुषंगाने गायी-गुरांचे महत्त्व
वर्ष १८०० पूर्वी शेतीमध्ये रासायनिक खते नव्हती. त्या काळात शेणखत हाच शेतीचा एकमेव आधार होता. गायी, म्हशी आणि इतर गुरांपासून मिळणार्या शेणखतातूनच शेती टिकून होती. लोकसंख्या वाढत असतांनाही अन्नधान्याची कमतरता कधी भासली नाही. जर गाय आणि गुरे नसती, तर सतत पिके घेतल्यामुळे भूमीतील पोषक घटक संपली असती अन् शेती नष्ट झाली असती. भूमी सुपीक रहाण्यामागे गाय आणि गुरे यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.
माणूस शाकाहारी असो किंवा मांसाहारी, तरीही शेवटी त्याचे संपूर्ण अन्नचक्र गवतावरच अवलंबून आहे. अन्नसाखळीचा प्रारंभ आणि शेवट दोन्हीही गवत अन् चारा यांवरच येतो. ही संपूर्ण साखळी शेतीवर अवलंबून आहे आणि शेती गायी-गुरांखेरीज शक्यच झाली नसती. जर गाय आणि इतर पशू नसते, तर शेतीच अस्तित्वात आली नसती. शेती नसती, तर अन्नधान्याची भीषण टंचाई निर्माण झाली असती, संघर्ष वाढले असते आणि मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात आले असते. म्हणूनच गायी-गुरांचे मानवाच्या जीवनात अपार महत्त्व आहे आणि ते आपल्या अस्तित्वाचा मूलभूत आधारस्तंभ आहेत.
३. गायीच्या वंशवृद्धीसाठी नंदीची भूमिका
गायीच्या वंशवृद्धीसाठी नंदीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एक नंदी आयुष्यात अनेक वेळा कधी कधी १० ते २० वेळा संप्रजनन करू शकतो आणि त्यातून पुढील पिढी निर्माण होते. म्हणूनच देशी नंदी हा त्याच देशी जातीतील असावा लागतो, जसे की गीर, कांक्रेज, साहिवाल अशा जातींच्या गायीसाठी त्याच जातीचा नंदी असणे आवश्यक असते, तसेच पुढील पिढी निरोगी आणि शुद्ध रहाण्यासाठी नातेसंबंधातील संकर टाळला जातो, म्हणजे आई-मुलगी किंवा वडील-मुलगी अशा नात्यातील संकर होऊ नये; म्हणून पुढील पिढीसाठी वेगळा नंदी आणला जातो. आवश्यकता असल्यास नंदी दुसर्या गोशाळेत देऊन तिथून नवीन नंदी आणला जातो. या पद्धतीमुळे गायींची अनुवंशिक गुणवत्ता टिकते, दूध उत्पादन चांगले होते आणि संपूर्ण वंशाची नोंद व्यवस्थित ठेवली जाते. हेच गायींच्या संगोपनाचे शास्त्र आहे. या शास्त्रीय संगोपनामुळे गायींची संख्या वाढतेच; पण त्यांच्या दुधात औषधी गुण निर्माण होतात, जसे की, सूक्ष्म सुवर्णकण. त्याचप्रमाणे गायीच्या शेणामध्ये ‘१० व्ही’ ते ‘१० एक्स’ इतके उपयुक्त सूक्ष्मजीव आढळतात, ज्यामुळे भूमी अधिक सुपीक बनते.
पंचगव्य आणि गायीचे साजूक तूप यांचे महत्त्व

गायीच्या दुधापासून दही, दह्यापासून ताक आणि लोणी, लोण्यापासून तूप सिद्ध होते. दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र या ५ घटकांना एकत्रितपणे ‘पंचगव्य’ असे म्हटले जाते. पंचगव्याचा उपयोग विविध आजारांच्या निवारणासाठी सांगितलेला असून त्यापासूनही अनेक औषधी सिद्ध केल्या जातात. यावर आधारित संशोधनही झालेले आहे. गायीच्या साजूक तुपाचे महत्त्व तर विशेष आहे. साजूक तूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पूर्वीच्या काळात युद्धामध्ये जखमा लवकर भरून याव्यात, यासाठी साजूक तुपाचा वापर केला जात असे. आजही अनेक किल्ल्यांवर साजूक तूप साठवण्यासाठी वापरलेल्या टाक्या पहायला मिळतात. युद्धकाळात जखम झाल्यावर त्यावर तूप लावल्यामुळे आपल्या सैनिकांच्या जखमा लवकर भरून येत. अशा प्रकारे ‘गायीने सहस्रो देशभक्तांना जीवनदान दिले’, असे म्हणता येईल.
– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
४. गोमूत्राचे शेती, आयुर्वेद आणि आध्यात्मिक यांच्या दृष्टीने महत्त्व
४ अ. गोमूत्राचे संतांनी आध्यात्मिकदृष्ट्या सांगितलेले महत्त्व : यासमवेतच गोमूत्रालाही विशेष महत्त्व आहे; तेही अनेक दृष्टीने अद्वितीय आणि उपयोगी मानले जाते. गोमूत्राची चव तिखट असली, तरी त्याचे गुण अत्यंत प्रभावी मानले जातात. पनवेल येथील सनातनच्या आश्रमात भेट झालेले एक हनुमानभक्त संत आणि पू. वस्ताद महाराज यांनी सांगितले होते, ‘गोमूत्रामध्ये नकारात्मक शक्तींना नष्ट करण्याची क्षमता असते, जणू शस्त्रास्त्रांसारखीच ती काम करते. आपण अनेकदा ‘दृष्ट लागलेली’, ‘शापित’ किंवा लाभ न देणारी जागा, असे म्हणतो. ‘अशा ठिकाणी पूर्वी कोण राहिले होते ? त्यांची वृत्ती कशी होती ? ते धार्मिक होते कि सतत कलह करणारे ?’, हे आपल्याला ठाऊक नसते; मात्र अशा नकारात्मक ऊर्जेने प्रभावित झालेल्या भूमी, इमारती, कारखाने किंवा जागा शुद्ध करण्याची क्षमता गोमूत्रामध्ये असल्याचे मानले जाते.’
४ आ. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून : शारीरिक आरोग्यासाठीही गोमूत्राचे महत्त्व आयुर्वेदाने मान्य केले आहे. आयुर्वेदातील अनेक ग्रंथांमध्ये गोमूत्र हे औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याचे सांगितले आहे. ते रक्तातील ‘कॉलेस्टेरॉल’ न्यून करण्यास साहाय्य करते, शरिरातील नकारात्मक ऊर्जा न्यून करते, तसेच हृदय, मूत्रमार्ग आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास सहाय्यक ठरते. त्यामुळे गोमूत्राचे लाभ केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर शारीरिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत.
ऋषिमुनींनी गोमूत्राचा सखोल अभ्यास केला असून त्याचा औषध म्हणूनही उपयोग चालू झाला. गोमूत्रासह त्रिफळा चूर्ण, अर्जुन, गुळवेल यांसारख्या औषधी वनस्पतींची विविध संयुगे सिद्ध करून अनेक औषधे निर्माण करण्यात आली आहेत. या औषधांवर पुन्हा संशोधन केल्यास निरोगी जीवनासाठी गोमूत्राचा मोठा उपयोग होऊ शकतो, हे स्पष्ट होते.
४ इ. शेतीच्या अनुषंगाने गोमूत्र आणि शेण यांचे महत्त्व : याखेरीज गोमूत्र आणि गोमय (गायीचे शेण) एकत्र करून सिद्ध केलेल्या मिश्रणामुळे वनस्पतींची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शुद्ध केलेले गोमूत्र झाडांना दिल्यास किंवा फवारणी केल्यास कीड अन् रोग यांचा संसर्ग न्यून होतो. पूर्वी शेतीमध्ये जसे गोमयाचा वापर होत असे, तसाच झाडांच्या आरोग्यासाठी गोमूत्राचाही उपयोग केला जात होता, तसेच शेण आणि गोमूत्र यांनी भूमी सारवल्यास अनेक उपयुक्त परिणाम दिसून येतात.
वाचकांना सूचनाया लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा. |
५. गायीच्या सान्निध्यामुळे अनेक गंभीर आजार बरे होणे
गायीच्या शेणापासून भिंती लिंपल्या किंवा त्यापासून भिंतीचा रंग सिद्ध केल्यास भ्रमणभाष आणि इतर उपकरणांमधून येणार्या ‘अल्फा’, ‘बीटा’, ‘गॅमा’ अशा घातक किरणांचा, तसेच हवेतील इतर ‘रेडिएशन्स’चा (किरणोत्सर्गाचा) प्रभाव न्यून होतो, असे काही संशोधनातून समोर आले आहे. अशा प्रकारे गायीचे अनेक उपयोग आहेत. तिचे अस्तित्वही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘पूर्वी दिलीप राजा यांना राजयक्ष्मा (क्षय) झाला असता ते थेट गोठ्यात जाऊन राहिले होते’, असा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. गायीच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्यांना आरोग्यलाभ झाला, असे सांगितले जाते.
आजही ‘काऊ कडलिंग थेरपी’चा (गायीला मिठी मारण्याच्या माध्यमातून उपचार) उपयोग केला जातो. कर्करोग, अस्थमा किंवा इतर गंभीर आजार यांनी त्रस्त रुग्ण जर गोठ्याच्या आसपास किंवा गायीच्या सान्निध्यात काही काळ राहिले, तर गायीच्या श्वासोच्छ्वासातून बाहेर पडणारे सूक्ष्म उपयुक्त जंतू शरिरावर सकारात्मक परिणाम करतात. हे जंतू मानवी शरिरासाठी लाभदायक असून त्यामुळे काही आजारांची तीव्रता न्यून होऊ शकते किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास साहाय्य होते. गायीचे जे आभामंडल (ऑरा) असते, ते साधारण ५० ते १०० फूट परिसरात सकारात्मक लहरी पसरवत असते. त्यामुळे गायीच्या सान्निध्यात गेल्यावर मन शांत होते, चिंता न्यून होते आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. ‘गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणे किंवा शेपटी डोक्यावर घेऊन आशीर्वाद घेणे’, ही केवळ श्रद्धा नसून मानसिक समाधान देणारी अनुभूती आहे; म्हणूनच गाय जिथे असते, तेथील अनुमाने १०० फूट परिसर शुद्ध होतो, असे मानले जाते. याच कारणामुळे प्रत्येक शेतकर्याने गायीचे पालनपोषण करावे आणि शहरात रहाणार्या लोकांनी किमान आठवड्यातून एकदा तरी गायीचे दर्शन घ्यावे, तिच्याभोवती प्रदक्षिणा घालाव्यात.
गोमातेला कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
भाग १९ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1010661.html
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !