‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गायीचे शेण आणि गोमूत्र यांचे शेती, आयुर्वेद अन् आध्यात्मिक दृष्टीने महत्त्व, तसेच गायीच्या सान्निध्यामुळे अनेक गंभीर आजार बरे होणे’, यांविषयी वाचले.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले हे वर्ष १९९८ पर्यंत समाजातील लोकांसाठी सभा घेत असत. त्यांच्या अनेक सभांमध्ये आम्ही जेव्हा उपस्थित रहात असू, तेव्हा त्यामध्ये ते साधनेविषयी विविध विषयांवर मार्गदर्शन करत असत. त्या विषयांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा विषय, म्हणजे ‘साक्षीभाव’ !
मला असे वाटते की, ‘साक्षीभाव’ हा विशेषतः उद्योजकांसाठी अत्यंत आवश्यक असा आध्यात्मिक गुण आहे. आजच्या लेखात उद्योगात विविध विभागांतील दायित्व निभावतांना कसे दृष्टीकोन ठेवायचे, साक्षीभाव आणि अहं कमी यांमुळे उद्योगात पुढे कसे जायचे अन् येणार्या विविध अडचणींवर साधनेमुळे मात कशी करता येते, यांविषयीचे विवेचन येथे दिले आहे.
(भाग १९)
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.
भाग १८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005683.html

१. ‘साक्षीभाव’ : उद्योजकांसाठी अत्यंत आवश्यक असा आध्यात्मिक गुण !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सांगतात, ‘सर्वसमावेशकता, सर्वज्ञता, सामर्थ्य आणि संपूर्णता हे परमेश्वराचे गुण आपल्या अंगी यावेत, यासाठी साधना करणे आवश्यक आहे.’ ‘साक्षीभाव’ हा त्या साधनेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जो केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठीच नव्हे, तर उत्तम नेतृत्व आणि यशस्वी उद्योग उभारण्यासाठीही तितकाच आवश्यक आहे. हा गुण केवळ वैयक्तिक साधनेसाठीच नव्हे, तर उद्योगातील प्रत्येक दायित्व योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतो.
२. उद्योजकाने साक्षीभावाने थोडे अलिप्त राहून कर्मचार्यांचा आत्मविश्वास वाढवणे महत्त्वाचे !
साक्षीभाव निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्वतःचा अहंकार न्यून करावा लागतो. अहंकार न्यून झाल्याविना साक्षीभाव जागृत होत नाही. जेव्हा अहंकार न्यून होतो, तेव्हाच आपण साक्षीभावाने गोष्टींकडे पाहू शकतो आणि तेथूनच खरे निर्णयक्षम नेतृत्व जन्माला येते. बर्याचदा असे दिसून येते की, नेतृत्व विकसित करतांना आपण वेगवेगळ्या लोकांना प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण दिल्यानंतर ते आपण शिकवल्याप्रमाणे काम करत आहेत का, हे आपण पहात किंवा अभ्यासत असतो; मात्र ते पहातांना मधे मधे सतत ‘हे असे कर, तसे कर’ असे त्यांना टोकत किंवा सांगत रहातो, असे करणे आपण टाळायला हवे.
वरील सूत्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक सोपे उदाहरण घेऊया. लहान मुलांना जेव्हा आपण सायकल शिकवतो, तेव्हा प्रथम आपण मागून सीट धरून ठेवतो. मुलगा सायकल चालवत असतो. एका क्षणी आपण ती सीट सोडून देतो, तेव्हा मुलाला आश्चर्य वाटते की, कुणी आपल्याला पाठीमागून धरलेले नाही आणि तो स्वतः स्वतंत्रपणे सायकल चालवू लागतो. जसे हे उदाहरण व्यवहारात लागू होते, तसेच उद्योगातही लागू होते. उद्योजक म्हणून आपण प्रत्येक विभागाला त्याचे काम व्यवस्थित समजावून सांगायला हवे; पण त्यानंतर साक्षीभावाने त्या कामापासून थोडे अलिप्त रहाण्याचा प्रयत्न करायला हवा. यामुळे संबंधित व्यक्तीचे दायित्व वाढते आणि तिचा आत्मविश्वास वाढतो.

३. उद्योगातील विविध विभागांमधील कामे आणि तेथे लक्षात ठेवायचे अमूल्य दृष्टीकोन
३ अ. ‘पर्चेस’ (खरेदी) विभाग
३ अ १. कोणतीही लाच न स्वीकारता ‘मी आणि आस्थापन एकच आहोत’, हा विचार ठेवून काम करणे : आताच्या या कलियुगात काही आस्थापनांमध्ये ‘लाच देणे-घेणे’ अशी चुकीची पद्धत दिसून येते; पण आपण जेव्हा आस्थापनाला खर्या अर्थाने आपले मानतो, तेव्हा ‘आम्ही कोणतीही लाच स्वीकारणार नाही’, असे विक्रेत्याला ठामपणे सांगता येणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा साधना आपल्याला शिकवते, ‘माझे वेतन हाच माझा योग्य मोबदला आहे.’
अधिक सवलत मिळवायची असेल, तर ती अधिकृत व्यवहारातूनच मिळाली पाहिजे आणि पुन्हा अशा प्रकारची विचारणा झाल्यास विक्रेता (व्हेंडर) पालटण्याचा निर्णय घ्यायला हवा. येथे ‘मी आणि आस्थापन (कंपनी) वेगवेगळे’, असा विचार न ठेवता ‘आस्थापन आहे म्हणून मी आहे’, असा साक्षीभाव मनात ठेवून काम करणे आवश्यक आहे.
३ आ. ‘अकाऊंट्स’ (लेखा) विभाग
३ आ १. वाचलेला प्रत्येक रुपया आस्थापनाच्या लाभात भर घालतो, हे लक्षात घेऊन व्ययाचा सतत बारकाईने विचार करणे : लेखापालाने (‘अकाऊंटंट’ने) स्थुलातून सूक्ष्मात जाऊन व्यय कसे होतात ? ते का होतात ? आणि ते कसे टाळता येतील, याचा सतत बारकाईने विचार करायला हवा. प्रत्येक व्यय पहातांना ‘मी मालक असतो, तर हा व्यय केला असता का ?’, असा विचार मनात ठेवून निर्णय घ्यावा. असा विचार केल्यास वाचलेला प्रत्येक रुपया आस्थापनाच्या लाभात भर घालतो. त्यामुळे आस्थापनाचा लाभ (प्रॉफिट) वाढतो आणि सर्व सहकार्यांनाही चांगली वेतनवाढ मिळू शकते, तसेच आस्थापनाचे ‘प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट’ (लाभ आणि तोटा खाते) आणि ‘बॅलन्स शीट’ (आर्थिक ताळेबंद) अधिक सक्षम होतात अन् ते पहाणार्यालाही समाधान मिळते.
३ इ. ‘प्रॉडक्शन’ (उत्पादन) विभाग
३ इ १. उत्पादन व्यवस्थापक साक्षीभावाने परिस्थितीकडे पहाणारा आणि योग्य निर्णय घेणारा हवा ! : या विभागात नेतृत्वगुणाची अत्यंत आवश्यकता असते; कारण कारखान्यामध्ये अनेक ‘प्रॉडक्शन युनिट्स’ (उत्पादन विभाग) असतात. ‘सुपरवायझर’ (पर्यवेक्षक), ‘मशीन ऑपरेटर्स’ (यंत्र परिचालक), कुशल आणि अकुशल कामगार, ‘मेंटेनन्स’ (देखभाल) विभाग, ‘लोडिंग-अनलोडिंग’ (माल चढवणे आणि उतरवणे) विभाग, अशा अनेक घटकांमुळे संपूर्ण ‘ऑपरेशन्स’ (कामकाज) गुंतागुंतीची होतात.
म्हणूनच जसे वाहतूक पोलीस अपघात आणि वाहतूक कोंडी होऊ न देता वाहतूक सुरळीत चालू ठेवतो, त्याचप्रमाणे ‘प्रॉडक्शन मॅनेजर’लाही (उत्पादन व्यवस्थापकाला) सर्व कामांमध्ये समतोल ठेवून ती हाताळावी लागतात. साधनेमुळे ज्याचे मन शांत, एकाग्र आणि एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळण्यास सक्षम झालेले असेल, असा ‘मल्टिटास्किंग फॅक्टरी मॅनेजर’ आवश्यक असतो अन् हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा तो प्रत्येक गोष्टीत अडकून न पडता साक्षीभावाने परिस्थितीकडे पहातो आणि योग्य निर्णय घेतो.
|
वाचकांना सूचना या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा. |
३ ई. ‘सेल्स’ (विक्री) विभाग
३ ई १. विक्रेत्याने यश-अपयश यांत न अडकता शांतपणे पुढे जात रहाणे, हाच खरा साक्षीभाव ! : या विभागात काम करायला अनेक जण सिद्ध नसतात; कारण येथे सर्वाधिक अनिश्चितता असते. स्पर्धकांची गुणवत्तापूर्ण उत्पादने, त्यांचे आक्रमक ‘प्राईसिंग’ (स्पर्धात्मक मूल्य / दर निर्धारण) आणि विविध ‘स्कीम्स’ (योजना) यांमुळे मागणी मिळवणे कठीण जाते. म्हणूनच सततच्या प्रयत्नांसमवेत प्रार्थना करत रहाणे आणि मागणी मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. त्यासह कामात सातत्याने सुधारणा करत रहाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुकानदार आणि वितरक (डिस्ट्रीब्युटर्स) यांच्याशी नियमित संपर्क ठेवत, त्यांची विचारपूस करत अन् प्रयत्न वाढवत राहिल्यास मागण्या हळूहळू वाढतात, तसेच एक दिवस तोच ‘सेल्समन’ (विक्रेता प्रतिनिधी) ‘बेस्ट सेल्समन’ (उत्तम / सर्वाेत्कृष्ट विक्रेता)चा पुरस्कारही मिळवू शकतो. हे सर्व करतांना यश-अपयश यांत न अडकता शांतपणे पुढे जात रहाणे, हाच खरा साक्षीभाव आहे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
भाग २० वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1013423.html
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !