गायीच्या दुधाचे आरोग्य आणि अन्य स्तरावर लक्षात आलेले अनन्यसाधारण महत्त्व अन् त्यावर आधारित ‘पितांबरी’ची उत्पादने !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘सनातन धर्मध्वजा’वर कोरलेले गोमातेचे चित्र प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर गायीविषयीच्या ज्या विलक्षण अनुभूती मला आल्या, त्या मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. एखादी अनुभूती जेव्हा आपल्याला स्पर्श करते, तेव्हा तिच्यामागे केवळ भावना नसून काहीतरी शास्त्रही असते, असे मला वाटते. ते शास्त्र समजून घेणे आपल्यासाठी आवश्यक असते.

२५ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोमाता ही केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी आरोग्य आणि निसर्गसंतुलन करणारी, जर्सी गायीमुळे दुधाच्या गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण होणे, जर्सी गायीच्या दुधाच्या दुष्परिणामांमुळे जगभरात देशी गायींविषयी संशोधनाला प्रारंभ होणे आणि म्हशीपेक्षा गायीचे दूध अधिक योग्य असण्यामागील कारणमीमांसा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.     

(भाग १७)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’, ठाणे.

भाग १६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1001357.html

ताम्हणे (जिल्हा रत्नागिरी) येथील ‘पितांबरी’च्या गोशाळेतील गायीला खाद्य भरवतांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

१. गायीच्या दुधाविषयी असलेला अपसमज आणि त्याचे खंडण

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

अलीकडे ‘वेगन’ (वनस्पती आधारित) हा विचार प्रचलित झाला आहे. त्यामागे असे सांगितले जाते, ‘गायीचे दूध हे फक्त तिच्या वासरांसाठी आहे, मग ते माणसांनी का वापरावे ?’; पण भारतीय संस्कृतीचा विचार केला, तर हिंदु परंपरेनुसार मानवाच्या उद्धारासाठीच समुद्रमंथनातून ‘कामधेनू गायीचा’ जन्म झाला आहे. आपण पहातो की, तिच्यापासूनच पुढे अनेक गोष्टी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ‘गाय ही केवळ वासरांसाठीच नाही, तर मानवाच्या आणि संपूर्ण जगाच्या कल्याणासाठीच अस्तित्वात आली आहे’, असा आपला पारंपरिक विश्वास आहे.

भगवान श्रीकृष्ण द्वापरयुगात गोकुळात वाढला. नंदराजाच्या घरी त्याने गायीचे संगोपन केले, त्यांच्या दुधाचा वापर केला आणि त्या दुधापासून लोणी, तूप यांसारखे पदार्थ सिद्ध केले. इतकेच नाही, तर या दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसायही त्या काळात होत असे. यावरून आपल्या परंपरेत दुधाच्या वापरात कोणतेही वैगुण्य मानले गेलेले नाही.

महत्त्वाचे म्हणजे आधी वासराचे पोट भरल्यानंतरच गायीकडून दूध काढले जाते. वासराला पुरेसे दूध दिल्यावरही गायीकडे अतिरिक्त पान्हा उरतो, तेच दूध आपण वापरतो. त्यामुळे वासराच्या तोंडचा घास हिरावून घेतला जातो, असे मुळीच होत नाही; म्हणूनच दुधाचा वापर केल्यामुळे पाप लागते किंवा काही अनैतिक घडते, हा जो गैरसमज पसरवला जातो, तो दूर केला पाहिजे. गाय, वासरू आणि माणूस यांचे नाते सहजीवन, करुणा अन् नैसर्गिक समतोलावर आधारित आहे.

गोउत्पादनावर आधारित ‘पितांबरी’ने संशोधन करून निर्मिती केलेली विविध उत्पादने !

‘पितांबरी रुचियाना खरवस’चे वेष्टन

या लेखात सांगितलेले गायीचे महत्त्व ओळखून ‘पितांबरी’ने संशोधन करून ‘गो-उत्पादने’ आणली आहेत. गायीपासून मिळणार्‍या विविध उत्पादनांपासून ‘पितांबरी गोमूत्र कॅप्सूल’, ‘पितांबरी गोमय शेणखत’, तसेच ‘गोपीयुष’, ‘पितांबरी रुचियाना खरवस (गाय वेल्यानंतर मिळणार्‍या चिकापासून खरवस)’ हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अमूल्य घटक आहेत. ‘गोपीयुष’मधील ‘नॉन केसिन प्रोटीन’मुळे ‘इम्युनोग्लोब्युलिन्स’ (शरिराची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारी आणि संसर्गाशी लढणारी प्रतिपिंडे) सिद्ध होतात, पांढर्‍या पेशी अन् ‘टी-सेल्स’ (शरिरातील पांढर्‍या रक्तपेशींचा एक प्रकार) सक्षम होतात अन् शरीर आजारांशी लढण्याची शक्ती मिळवते.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

२. गायीच्या दुधाचे अनन्य साधारण महत्त्व

स्त्रिया आणि गाय यांचा गाभण काळ ९ मास असतो. विविध प्राण्यांमध्ये माणसाशी सर्वाधिक साम्य असलेला प्राणी म्हणजे गाय. त्यामुळे आईच्या दुधानंतर गायीच्या दुधाला विशेष महत्त्व आहे. आईचे दूध पुरेसे नसेल, तर गायीचे दूध मुलांच्या योग्य विकासासाठी उपयुक्त ठरते आणि त्यात भरपूर पोषणमूल्य असते; म्हणूनच गायीचे दूध ‘अमृतासमान’ असल्याचे मोठमोठ्या आयुर्वेदाच्या ग्रंथातसुद्धा म्हटले आहे. गायीपासून आपल्याला दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र अशा पंचगव्याच्या गोष्टी मिळतात. गायीची शरीररचना अद्वितीय असून गोविज्ञानाच्या अभ्यासानुसार गायीपासून मिळणारे दूध, शेण आणि गोमूत्र या मूलभूत गोष्टी अत्यंत उपयुक्त आहेत. गाय विविध वनस्पती खाऊन त्यातील पोषक घटक उपयुक्त रूपात शरिरात साठवते.

निरोगी जीवनासाठी गायीचे महत्त्व असल्यानेच महाराष्ट्र शासनाकडून ‘राज्यमाता’ दर्जा !

गायीचे दूध, शेण, गोमूत्र आणि इतर दुग्धजन्य पदार्थ यांचा वापर जीवनात करावा. हे सर्व गोविज्ञान, म्हणजेच स्थुलातून सूक्ष्माकडे नेणारे शास्त्र आहे. आजच्या प्रदूषित वातावरणात हवा, विचार आणि लहरी यांचे निरोगी जीवनासाठी गायीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यामुळे गोमातेला महाराष्ट्र शासनाकडून ‘राज्यमाता’ हा दर्जा देण्यात आला आहे, तो पूर्णपणे योग्यच आहे. जिथे गायीचे अस्तित्व असते, तिथे अस्वस्थतेला थारा रहात नाही आणि आजच्या धावपळीच्या जगातही शांती, सकारात्मकता अन् आरोग्य आपोआप नांदू लागते. स्थुलातून सूक्ष्माकडे पाहिले, तर गाय स्थूल आहे; पण तिच्यापासून मिळणारे लाभ अत्यंत सूक्ष्म, शक्तीशाली आणि जीवनदायी आहेत.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

३. गायीचे दूध अधिक पौष्टिक आणि औषधी असण्यामागील कारण

रचनात्मकदृष्ट्या गाय आणि म्हैस यांच्यात साम्य आहे. दोघांनाही ४ पाय, डोके, शिंगे आणि पाठीवर वशिंड असते; मात्र जर्सी गायीला वशिंड नसते अन् बहुतेक वेळा शिंगेही नसतात. वशिंड म्हणजे पाठीवरील उंचवटा, जो देशी गाय आणि म्हशी यांच्यामध्ये आढळतो. असे मानले जाते की, गाय चरत असतांना सूर्यप्रकाश तिच्या संपूर्ण शरिरावर पडतो आणि वशिंडामधून विशिष्ट सूर्यलहरी ग्रहण करण्याची शक्ती तिच्यात असते, जणू काही तो तिचा ‘अँटिना’च (लहरी ग्रहण करणारे उपकरण) आहे. यासाठी ‘सूर्यकेतू नाडी’ गायीमध्ये असते. या सूर्यलहरी सूर्यकेतू नाडीच्या माध्यमातून ती ग्रहण करत असल्यामुळे गायीचे दूध औषधी गुणधर्मयुक्त होते. याच कारणामुळे गायीचे दूध थोडेसे पिवळसर असते. गायीच्या दुधात आणि गोमूत्रात अतिशय सूक्ष्म, ‘नॅनोमीटर’ स्तरावर सुवर्णकण आढळतात, ज्यामुळे गायीचे दूध अधिक पौष्टिक आणि औषधी मानले जाते.

(क्रमश : पुढच्या रविवारी)

भाग १८ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005683.html

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.