गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक
जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु !
जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु !
मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.
जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात.
शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय.
स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.
गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.
मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.
गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडेच असते.
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण फक्त त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच अखेर योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.