साधकांना पित्याप्रमाणे मार्गदर्शन करून प्रीतीचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सौ. सुमा सुदिश पुथलत यांनी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !

सौ. सुमा पुथलत यांना त्यांच्या साधना प्रवासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी अनुभवलेली गुरुदेवांची अथांग प्रीती याविषयीचे वर्णन त्यांच्याच शब्दांत पुढे दिले आहे.

साधकांना विविध विद्यांच्या मायेत अडकू न देता थेट ईश्वरापर्यंत नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना त्यांचे एकच ध्येय सांगितले, ते म्हणजे साधना करून मोक्षाला जाणे. त्यामुळे साधक कुठलीही विद्या अथवा सिद्धी यांत न अडकता झपाट्याने या मायेतून पलिकडे जातो, म्हणजे साधनेत प्रगती करतो आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते.

वैश्विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच

परिस्थितीशी जुळवून घेणे, सर्व प्रसंगी आपली साधनेची तळमळ ठेवून प्रयत्न करणे, परिस्थिती स्वीकारून तीच आम्हाला क्षणोक्षणी सुरक्षित ठेवत आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त होऊन त्यासाठी भगवंताला शरण जाणे, इत्यादी प्रयत्न आतून होत होते. ते प्रयत्न होत असल्यामुळे आम्हाला घडणार्‍या प्रसंगांत स्थिर रहाता आले.