श्री. संदीप आणि सौ. स्वाती शिंदे यांचा विवाह सोहळा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या दोघांनी विवाहाच्या दिवशी अनुभवलेली भावस्थिती येथे दिली आहे. या लेखाचा काही भाग आपण २२ नोव्हेंबर या दिवशी पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/856830.html
२. सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. गुरुकृपा आणि साधकांचे साहाय्य यांमुळे विवाहाची पूर्वसिद्धता अल्प कालावधीत होणे
१. ‘अनेक साधकांनी स्वतःहून पुष्कळ प्रेमाने सांगितले, ‘‘विवाहासाठी काही वस्तूंची आवश्यकता लागली किंवा कोणत्याही स्वरूपाचे साहाय्य हवे असेल, तर सांगा.’’ अनेक साधकांनी साधना म्हणून आम्हाला साहाय्य केले. त्यात कुठेही भावनिकता नव्हती. त्यामुळे ‘सर्वकाही आध्यात्मिक स्तरावर चालू होते’, असे मला जाणवले. माझ्या मनावर कोणत्याही गोष्टीचा ताण नव्हता. ‘देवाच्या कृपेने सर्व छानच होणार’, अशी माझी श्रद्धा होती.
२. ‘विवाह निश्चित झाल्यावर सिद्धतेसाठी अल्प कालावधी राहिला होता, तरीही ‘श्री गुरूंनी सर्व सिद्धता केली आहे’, याची अनुभूती पदोपदी घेता आली.
३. एरव्ही विवाह म्हणजे पूर्वसिद्धतेसाठी पुष्कळ कालावधी द्यावा लागतो; पण आमच्या विवाहाच्या वेळी केवळ एका आठवड्यात विधींसाठीची पूर्वसिद्धता, वर आणि वधू यांची वैयक्तिक पूर्वसिद्धता, छायाचित्रीकरण अशी सर्व गोष्टींची पूर्वसिद्धता सर्वकाही अल्प वेळेत आणि वेळेवर झाली.
४. विवाहासाठी आवश्यक साड्या आणि अन्य वस्तू यांची खरेदी अत्यंत अल्प वेळेत अन् योग्य गुणवत्तेची झाली. विवाहाची खरेदी इतक्या अल्प वेळेत केवळ गुरुकृपेने झाली.
२ आ. आध्यात्मिक मैत्रिणींनी प्रेमाने साहाय्य करणे : माझ्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषामुळे मधे मधेे माझे डोळे भरून यायचे. हे माझ्या समवेत असलेल्या आध्यात्मिक मैत्रिणींच्या लक्षात यायचे आणि त्या मला हसवण्याचा प्रयत्न करायच्या. त्यांनी मला कुटुंबियांची आठवण येऊ दिली नाही. मी माझ्या सखींच्या प्रेमातील गोडवा अनुभवत होते.
२ इ. विवाहाच्या वेळी ताण न येता गुरुस्मरणाने भावजागृती होणे : मला लहानसहान गोष्टींचाही ताण येतो; मात्र विवाहाचा मोठा क्षण आणि कुटुंबियांपैकी मुख्य कुणी उपस्थित नसतांना माझ्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण नव्हता. ही गुरूंचीच कृपा होती. याउलट आदल्या रात्री ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासाठी किती केले !’, हे सर्व आठवून माझी भावजागृती होत होती. विवाहाच्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात आमच्याबद्दल परात्पर गुरूंनी केलेले लिखाण वाचून आणखी कृतज्ञताभाव वाढला.
२ ई. काही वर्षांपूर्वी साधिकेने ठरवल्याप्रमाणे श्री गुरूंनी आध्यात्मिक विवाहसोहळा अनुभवण्यास देणे : मी लहानपणापासून प्रचलित पद्धतीने होणारे विवाह सोहळे पाहिले होते. तेव्हा माझ्या मनात विचार यायचे की, ‘विवाहाला इतके लोक येतात. त्या ठिकाणी एकमेकांची उणीदुणी काढणे, वाद होणे, मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होणे, सर्वांचे मानपान सांभाळावे लागणे, तसेच विधींपेक्षा दिखावा आणि मौजमजा हेच पहावे लागते. इतके करूनही त्यातून हवा तसा आनंद मिळत नाही. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे ‘असा विवाह नकोच’, असे मला वाटायचे आणि देवाला त्या वेळी मी म्हणायचे, ‘माझा विवाह अशा प्रकारचा नको. तो यापेक्षा वेगळा, साधेपणाने; मात्र चांगला व्हायला हवा.’ हे विचार मी कुणाकडे कधी व्यक्त केले नव्हते; मात्र श्री गुरूंनी माझा विवाह काही वर्षांपूर्वी मी ठरवल्याप्रमाणे नव्हे, तर त्याहीपेक्षा अनेक पटींनी सुंदर आणि आध्यात्मिक स्तरावर केला, त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ उ. विवाहाचे विधी आणि उपस्थित संतांचे चैतन्य यांमुळे थकवा न येणे : एरव्ही माझी थोडीशी दगदग झाल्यावर मला थकायला होते. विवाहाच्या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतत काही ना काही चालू होते, तरीही मला थकवा आला नाही. विवाहातील विधी आणि उपस्थित संत यांच्या चैतन्यामुळे मला बळ मिळाले अन् कोणताही त्रास झाला नाही.
२ ऊ. कूळ विधीपूर्वक पालटल्यामुळे सासरी सहजपणे वावरता येणे : विवाहानंतर सासरी रहायला गेल्यावर माझ्या समवेत माहेरचे कुणी नव्हते, तरीही मला अजिबात वेगळे वाटले नाही. मी माझ्या सासरची मंडळी आणि घर पाहिले नव्हते, तरीही ‘सासरचे सर्व जण आणि वास्तू माझ्या परिचयातील आहेत’, असे मला वाटत होते. मला कोणत्याही प्रकारचा ताण आला नाही. तिथे मी सहजपणे वावरत होते. ‘ज्या वेळी विधीपूर्वक माझा विवाह झाला आणि माझे कूळ पालटले, तेव्हाच या सर्व गोष्टी सूक्ष्मातून माझ्या परिचयाच्या झाल्या होत्या’, असे मला वाटले. त्यामुळे मी त्यांना स्थुलातून भेटतांना किंवा तेथे गेल्यावर मला वेगळेपण जाणवले नाही.’
(क्रमशः)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/857348.html