(म्हणे) ‘केंद्र सरकार मुसलमानांशी दुय्यम दर्जाच्या नागरिकांसारखे वागत आहे !’ – Pinarayi Vijayan

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचा आरोप

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केंद्रातील भाजप सरकार मुसलमानांशी दुय्यम दर्जाच्या नागरिकांसारखे वागत आहे, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी केंद्र सरकारवर केला. नागरिकत्वविषयक कायदा, नवा वक्फ कायदा यांसारख्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मुसलमान समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘केरळ मुस्लिम जमात’च्या वतीने आयोजित ‘केरळ यात्रा’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ही यात्रा १ जानेवारी या दिवशी कासरगोड येथून प्रारंभ होऊन संपूर्ण राज्यातून प्रवास करत थिरूवनंतपूरम् येथे समाप्त झाली.

(म्हणे) ‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या उपासना स्थळांवर आक्रमणे होत आहेत !’

मुख्यमंत्री विजयन् म्हणाले की, आज देशात धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संविधानिक मूल्ये धोक्यात आली आहेत. देशभरात मुसलमान आणि ख्रिस्ती अशा अल्पसंख्यांक समाजांवर, तसेच त्यांच्या उपासना स्थळांवर आक्रमणे होत आहेत. (मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या नाही, तर हिंदूंंच्या मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. करणारे धर्मांध मुसलमान अधिक आहेत, हे देशभरातील घटनांवरून समोर आलेले असतांना मुख्यमंत्री विजयन् जाणीवपूर्वक खोटे बोलून हिंदूंना आरोपी, तर अन्य धर्मियांना निरपराध ठरवत आहेत ! – संपादक) अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्षता अधिक भक्कम केल्याखेरीज या आव्हानाला तोंड देता येणार नाही. केरळमध्ये पूर्वी अनेक धार्मिक दंगली झाल्या होत्या; मात्र आमच्या आघाडी सरकारच्या कठोर भूमिकेमुळे आता अशा घटना थांबल्या आहेत. धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणार्‍या शक्तींविषयी लोकांना सतर्क करण्याची आवश्यकता आहे.