गायीचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व अन् लाभ लक्षात घेऊन ‘पितांबरी’ची गोशाळा उभारण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण उद्योजकाने साधना करण्याचे महत्त्व, तसेच त्याला सामोरे जाव्या लागणार्‍या व्यावहारिक आणि अन्य स्तरांतील अडचणींना साधनेमुळे कशी मात करता येईल, यांविषयी वाचले. आज पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग १३)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

भाग १२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/991406.html

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात फडकवलेला सनातन धर्मध्वज

१. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी धर्मध्वजातील गायीचे चित्र पाहून जुने प्रसंग आठवून तिचे लक्षात आलेले अनन्यसाधारण महत्त्व

फोंडा (गोवा) येथे मे २०२५ मध्ये पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित असतांना तेथील धर्मध्वज उभारणीचा प्रसंग माझ्या विशेष लक्षात राहिला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते त्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले होते. त्या ध्वजावर गायीचे चित्र होते. अनेकदा ध्वजावर ‘ॐ’ किंवा सूर्याचे प्रतीक पहायला मिळते; मात्र गायीचे चित्र पाहून मला क्षणभर आश्चर्य वाटले.

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

सनातन धर्म संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाल्याचे सांगितले जाते. देव आणि असुर यांनी अमरत्वाच्या अमृतासाठी समुद्रमंथन केले. त्यातून केवळ अमृतच नव्हे, तर १४ मौल्यवान रत्ने प्राप्त झाली. देवी लक्ष्मी, ऐरावत हत्ती आणि कामधेनू गाय हे त्यात प्रमुख होते. जसे देवांमध्ये श्रीविष्णु, सरोवरांमध्ये समुद्र, नद्यांमध्ये गंगा, पर्वतांमध्ये हिमालय आणि तीर्थक्षेत्रांमध्ये केदारनाथ श्रेष्ठ मानले जातात, तसेच गायींच्या प्रजातीत कामधेनूला सर्वश्रेष्ठ मानले जाते. समृद्धी, पवित्रता आणि अध्यात्म यांचे ती प्रतीक आहे. सर्व गायींची माता म्हणून कामधेनूमध्ये मातृत्वाचे सर्व गुण संरक्षण आणि संगोपन अंतर्भूत आहेत. म्हणूनच तिला ‘विश्वमाता’ मानले गेले. आजच्या काळात गायीला महाराष्ट्रात ‘राजमाते’चा दर्जाही देण्यात आला आहे.

सृष्टीच्या आरंभीपासून गायीमुळे मानवाला गोमय खत, दूध, दही, गोमूत्र यांसारखे अमूल्य नैसर्गिक घटक प्राप्त होत आहेत. सत्ययुगात परमेश्वराने गायीची निर्मिती केली, यामागील उद्देश सजीव सृष्टीचे पोषण, संवर्धन आणि संरक्षण, हाच होता. याच पार्श्वभूमीवर मला माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आठवला.

२. ‘पितांबरी’च्या व्यवसायवृद्धीत आलेली आर्थिक अडचण

वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘पितांबरी’ आस्थापनाची १०० कोटी रुपयांची उलाढाल (टर्नओव्हर) पूर्ण झाली. हे लक्ष्य गाठतांना आमचा संपूर्ण भर विक्रीवर होता; मात्र लाभाच्या दृष्टीने आवश्यक तेवढे लक्ष दिले गेले नव्हते. परिणामी निधीचे व्यवस्थापन (फंड्स मॅनेजमेंट) कठीण झाले. अनेक व्यवस्थापक (मॅनेजर्स) पुरेसे प्रशिक्षित नव्हते. दुय्यम विक्री (सेकंडरी सेल), म्हणजे दुकानदारांकडून येणार्‍या मागण्या (ऑर्डर्स) आणि ग्राहकांपर्यंत पोचणारा माल यांमध्ये समन्वय राहिला नव्हता. वितरकांकडे (‘डिस्ट्रिब्युटर्स’कडे) मोठ्या प्रमाणावर साठा पडून होता. विज्ञापनांच्या अभावामुळे तो माल दुकानदारांकडून विकला जात नव्हता. याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर झाला, विक्री थंडावली आणि पैशांचा प्रवाह अडखळला.

दुकानातून माल विकला गेल्याविना दुकानदार वितरकांना आणि वितरक आम्हाला पैसे देत नव्हते. त्यामुळे आर्थिक साखळी कुंठित झाली. बँकांचे कर्ज वाढले, देणी थकली, मनुष्यबळ अधिक होते, वेतन द्यावे लागत होते; पण अपेक्षित लाभ मिळत नव्हता. एकूणच परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.

३. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी गायीची सेवा करण्याचा दिलेला सल्ला

याच काळात मी नियमितपणे पनवेल येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दर्शनाला जात असे. एकदा त्यांनी विचारले, ‘तू इतका चिंतेत का आहेस ?’ मी त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला एकच साधा; पण अर्थपूर्ण सल्ला दिला, ‘तू गायीची सेवा कर.’

गायीमुळे होणारे शास्त्रीय आणि आध्यात्मिक लाभ !

परात्पर गुरु पांडे महाराज

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी गायीच्या महत्त्वाचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक दोन्ही पैलू स्पष्ट केले, ‘गाय जिथे चरायला जाते, जिथे वावरते, तिथे तिच्या श्वासोच्छ्वासातून आणि सान्निध्यातून सूक्ष्म जिवाणू पसरतात, जे मानवी शरिरासाठी लाभदायक मानले जातात. दमा किंवा इतर श्वसनविकार यांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो’, असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. तिच्या पचनसंस्थेत असलेले जिवाणू शेण कुजल्यावर उत्कृष्ट खत निर्माण करतात. हे शेणखत भूमीस पोषक आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. गाय जिथे चरते, तेथील भूमी हळूहळू शुद्ध होत जाते. ती औषधी वनस्पती आणि विविध प्रकारचे गवत खात असल्याने त्यातून निर्माण होणारे सूक्ष्म जिवाणू भूमीत मिसळतात. परिणामी शेतीची उत्पादकता वाढते आणि पिकांची भरभराट होते, तसेच ज्या ठिकाणी गोमूत्र शिंपडले जाते, तेथील नकारात्मक प्रभाव न्यून होतात. याखेरीज गायीपासून दूध, दही, लोणी आणि तूप यांसारखे पोषणमूल्यांनी समृद्ध पदार्थ मिळतात. अशा प्रकारे गाय आपल्याला आध्यात्मिक, आरोग्यविषयक आणि आर्थिक या तिन्ही पातळ्यांवर लाभ देते. म्हणूनच गायीच्या सान्निध्यात रहाण्यामागे केवळ श्रद्धा नाही, तर अनुभवसिद्ध कारणेही आहेत. म्हणूनच गायीची सेवा करणे, ही केवळ धार्मिक कृती नसून जीवन समृद्ध करणारी साधना आहे. हे समजून मी गायींची सेवा चालू केली. त्यानंतर जे अनुभव आले, ते विलक्षण आणि मनोबल वाढवणारे होते.

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील धर्मध्वजावर गायीचे चित्र पहाताच मला परात्पर गुरु पांडे महाराज यांचे हे शब्द पुन्हा एकदा ठळकपणे आठवले. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही कुणाकडे ना कुणाकडे माझी कायमच विचारपूस करतात, सूक्ष्मातून काळजी घेत समस्येवर योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे कायमच मनोबल मिळते.

४. अनिष्ट शक्तींच्या त्रासावर आणि प्रभावावर गोमूत्राचा उपाय

एकदा पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेलो असतांना अनिष्ट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट लागणे यासंबंधी मार्गदर्शन चालू होते. हा विषय अनेकदा अंधश्रद्धेच्या चौकटीत बसवला जातो; मात्र अनुभव आणि निरीक्षण यांवर आधारित हे वास्तव आहे. सनातन संस्थेने या विषयावर सखोल संशोधन केलेले आहे. समाजात साधना न करणार्‍या लोकांना अशा अनिष्ट शक्तींमुळे त्रास दिला जातो आणि त्याचा अपलाभ घेऊन काही लोक पैसे उकळतात, हेही लक्षात आले. सनातन संस्थेमध्ये यावर आध्यात्मिक स्तरावरील विविध उपायांपैकी एक म्हणून गोमूत्राचा प्रभावी वापर केला जातो. वास्तूशांतीच्या वेळी घरात गोमूत्र शिंपडणे, पंचगव्य सेवन करणे किंवा पुरोहितांनी गोमूत्राचा प्रयोग सांगणे, हे उपाय नकारात्मक ऊर्जेवर परिणामकारक ठरतात, असे अनुभवातून दिसून आले आहे. या सर्व नकारात्मक प्रभावांवर देशी गायीचे गोमूत्र अत्यंत प्रभावशाली असल्याचे मानले जाते. आम्ही जेव्हा सनातनच्या आश्रमात गेलो होतो, तेव्हा पू. वस्ताद महाराज तेथे उपस्थित होते. मारुतिराय त्यांच्यावर प्रसन्न होते आणि त्यांनीसुद्धा गोमूत्राचा वरील गोष्टींवर प्रभाव असल्याचे स्पष्टपणे सांगितले, तसेच विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘गोसंमेलना’तूनही गायीचे विविध उपयोग आणि तिचे महत्त्व आमच्या अधिक ठळकपणे लक्षात आले.

५. आनगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे गोशाळा चालू करणे

हे सर्व पाहून आणि ऐकून समजत होते; मात्र प्रत्यक्ष कृती मात्र घडत नव्हती. असे असले, तरी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी गायींची सेवा करण्याविषयी सांगितल्यावर मी गांभीर्याने याचा विचार केला. गायी कुठे मिळतील ? याचा शोध घेत असतांना कळले की, सनातन संस्थेच्या चिपळूण येथील केंद्रात काही गायी उपलब्ध आहेत आणि त्या देण्याचा विचार चालू आहे. त्याच गायी आम्हाला मिळाल्या. त्या ६ गायी आम्ही आमच्या आनगाव (जिल्हा रत्नागिरी) येथील जागेवर आणल्या. खरेतर आनगावच्या शेजारीच विश्व हिंदु परिषदेची गोशाळा होती. त्यामुळे गायी आम्ही यापूर्वीही घेऊ शकलो असतो; मात्र गायीचे खरे महत्त्व कुणी समजावून सांगितलेले नव्हते.

आनगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे गोशाळेतील गायीला स्पर्श करतांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि समवेत ‘पितांबरी’ आस्थापनाचे अन्य कर्मचारी

आयुर्वेदानुसार गायीचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलके असते, एवढीच माहिती आम्हाला होती; परंतु गायीचे अध्यात्मिक महत्त्व, तिचे सूक्ष्म आणि व्यापक उपयोग यांची जाणीव आम्हाला तेव्हा नव्हती. गायीच्या सेवेमुळे केवळ भौतिक नव्हे, तर आध्यात्मिक पातळीवरही सकारात्मक परिवर्तन घडू शकते, हे पुढे अनुभवातून उमगले.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

६. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले गायीचे महत्त्व

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी एकदा मला पुराणकाळातील राजा दिलीप यांचे उदाहरण सांगितले. राजा दिलीप यांनी आयुष्यभर गायींची निष्ठेने सेवा केली होती. त्या काळात त्यांना रक्तक्षयाचा गंभीर आजार झाला होता; मात्र गायींच्या सेवेमुळे त्यांचा रोग बरा झाला. शारीरिकदृष्ट्या ते पुन्हा सक्षम झाले आणि त्यांनी त्यांच्या राज्यकारभाराचे उत्तरदायित्व समर्थपणे सांभाळले. हे ऐकल्यावर मी सहजपणे परात्पर गुरु पांडे महाराज यांना म्हणालो, ‘‘राजा दिलीप कुठे आणि मी कुठे !’’ त्यावर त्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, ‘‘हे उदाहरण केवळ समजावण्यासाठी आहे. राजा असो वा सामान्य माणूस, श्रीमंत असो वा गरीब गायीच्या सान्निध्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि प्रत्येकाला याचा लाभ मिळतो.’’

(क्रमशः पुढच्या रविवारी) (१०.१२.२०२५)

– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि., ठाणे.

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग १४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996687.html