Iran Crisis : इराणमध्ये महागाईच्या विरोधातील आंदोलन चिघळले !

१०० हून अधिक शहरांमध्ये हिंसाचार  पोलीस कर्मचार्‍याची हत्या  आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू 

तेहरान विमानतळ, तसेच इंटरनेट सेवा बंद

तेहरान (इराण) : इराणमध्ये महागाईच्या विरोधात १३ दिवसांपासून चालू असलेले आंदोलन चांगलेच चिघळले. नागरिकांनी देशभरातील १०० हून अधिक शहरांमध्ये निदर्शने केली. या वेळी निदर्शकांनी रस्ते अडवले, तसेच ठिकठिकाणी आग लावली. लोकांनी ‘खामेनीचा मृत्यू’ आणि ‘इस्लामिक रिपब्लिकचा अंत’, अशा घोषणा दिल्या. काही ठिकाणी निदर्शक निर्वासित क्राऊन प्रिन्स (राजकुमार) रझा पहलवी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. त्यांनी ‘ही शेवटची लढाई आहे, रझा पहलवी परत येतील’ अशा घोषणा दिल्या.

निदर्शनांत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४५ लोक मारले गेले आहेत, ज्यात ८ मुलांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकार्‍याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून २ सहस्र २७० हून अधिक लोकांना कह्यात घेण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील इंटरनेट आणि दूरभाष सेवा बंद करण्यात आली आहे. तेहरान विमानतळही बंद करण्यात आले असून सैन्याला सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. इंटरनेट सेवा बंद करूनही काही लोक ‘स्टारलिंक’वरून व्हिडिओ प्रसारित करत आहेत. स्टारलिंक ही इलॉन मस्क यांची उपग्रहाद्वारे चालणारी इंटरनेट सेवा आहे.

निर्वासित राजकुमार रझा पहलवी यांनी लोकांना रस्त्यावर उतरण्याचे केले होते आवाहन !

इराणचे निर्वासित राजकुमार रझा पहलवी

निर्वासित राजकुमार रझा पहलवी यांनी ७ जानेवारीला लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केल्यानंतर निदर्शने आणखी तीव्र झाली. रझा पहलवी हे इराणचे शेवटचे शाह महंमद रझा पहलवी यांचे पुत्र आहेत. त्यांच्या वडिलांना वर्ष १९७९ च्या इस्लामी क्रांतीच्या वेळी सत्तेवरून हटवण्यात आले होते. युवराज पहलवी सध्या अमेरिकेत रहात आहेत. (युवराज पहलवी हे अमेरिकी ‘डीप स्टेट’चे बाहुले आहेत का ?, अशी शंका कुणी उपस्थित केली, तर तिला ‘अतार्किक’ म्हणत पूर्णत: नाकारून चालणार नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)

(मूळ ट्विट पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

आंदोलकांना हात लावला, तर इराणवर आक्रमण करू ! – अमेरिकेची धमकी

आंदोलकांना हात लावला, तर इराणवर आक्रमण करू, अशा शब्दांत डॉनल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी दिली आहे.

(मूळ ट्विट पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

क्राऊन प्रिन्स रझा पहलवी यांच्याकडे सत्ता सोपवण्याची मागणी

इराणमध्ये वर्ष १९७९ मध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर अयातुल्ला रुहोल्लाह खोमेनी सत्तेत आले. ते वर्ष १९७९ ते १९८९, असे १० वर्षे सर्वोच्च नेते होते. त्यांच्यानंतर सर्वोच्च नेते बनलेले अयातुल्ला अली खामेनी १९८९ पासून आतापर्यंत ३७ वर्षे सत्तेत आहेत. त्यांच्या कारकीर्दीत इराणची दुर्दशा झाली, असा नागरिकांचा आरोप आहे. याच कारणामुळे ६५ वर्षीय क्राऊन प्रिन्स रझा पहलवी यांच्याकडे सत्ता सोपवण्याची मागणी जोर धरत आहे. आंदोलक रझा यांना एक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी पर्याय मानतात. युवा वर्गाला वाटते की, पहलवी यांच्या परतण्याने इराणला आर्थिक स्थिरता, जागतिक स्वीकारार्हता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य मिळू शकते.

संपादकीय भूमिका

श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ यांनंतर आता इराणमध्ये अशा प्रकारे अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे अथवा करण्यात आली आहे. इराणला पाण्यात पहाणार्‍या आणि त्याच्यावर निर्बंध लादू पहाणार्‍या स्वार्थाने अंध झालेल्या अमेरिकेचा या आंदोलनामागे हात असल्याचे पुढे समोर आले, तर आश्‍चर्य वाटू नये !