कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री महालक्ष्मी मंदिराजवळील ‘हलाल चिकन सेंटर’ बंद !

ग्रामस्थांच्या संघटितपणाचा परिणाम

कोतवडे, ९ जानेवारी (वार्ता.) : येथील ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीच्या स्वयंभू आणि जागृत देवस्थानाजवळ चालू करण्यात आलेले ‘हलाल चिकन सेंटर’ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. ६ जानेवारी या दिवशी ग्रामस्थांनी सरपंच संतोष बारगोडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. गावातील काही ग्रामस्थांनी वैयक्तिकपणेही ग्रामपंचायतीला दुकान बंद करण्याविषयी पत्रे पाठवली होती. सरपंच संतोष बारगोडे यांनी याविषयी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानुसार कार्यवाही झाल्यामुळे मंदिराजवळील ‘हलाल चिकन सेंटर’ बंद करण्यात आले आहे.

याविषयी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले असून श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

श्री महालक्ष्मीमाता हे संपूर्ण गावाचे श्रद्धेचे केंद्र आहे. ग्रामदेवीचे स्थान आणि मंदिराचे पावित्र्य हे कोणत्याही प्रकारचा वाद अन् राजकारण यांपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. ‘ग्रामस्थांच्या श्रद्धेचा विचार करून ग्रामपंचायतीने या चिकन सेंटरला अनुमती देऊ नये, तसेच मंदिराच्या जवळ ‘हलाल चिकन सेंटर’ असू नये’, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केले होते. या निवेदनाविषयी गावातील काही युवकांनी काही वाड्यांमध्ये जाऊन माहिती दिली होती. अनेक ग्रामस्थांनी या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या.

मंदिराजवळ मद्य, मांस आदी का नसावे ? 

काय खावे किंवा खाऊ नये, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. असे असले, तरी मंदिराच्या ठिकाणी मांस किंवा मद्य विक्री निषिद्ध मानली जाते. याचे कारण मंदिरामध्ये भाविक पवित्र भावनेने येतात. संबंधित देवतेचे तत्त्व अधिक कार्यरत असल्यामुळे मंदिर आणि त्याच्या परिसरात सात्त्विकता अधिक असते. मद्य किंवा मांस हे तमोगुणी असल्यामुळे त्याचा मंदिराच्या सात्त्विकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मंदिर असो किंवा देवघर असो, तेथे शुचिर्भूत होऊन जावे, असे धर्मशास्त्र सांगते. 

हे ही वाचा → कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथे ग्रामदेवी श्री महालक्ष्मी मंदिराजवळील ‘हलाल चिकन सेंटर’च्या विरोधात कोतवडेवासिय एकवटले !

संपादकीय भूमिका

धर्महानी रोखण्यासाठी संघटित झालेल्या ग्रामस्थांचे अभिनंदन ! प्रत्येक मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होणे आवश्यक !