Bihar Hijab Ban : दागिन्यांच्या दुकानांत आता हिजाबबंदी !

सराफा दुकानांमधील लुटमारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील दागिन्यांच्या दुकानांत आता हिजाब, नकाब (चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र) आणि बुरखा (संपूर्ण शरीर झाकण्याचे वस्त्र) घालून येणार्‍यांना प्रवेश न देण्याचा निर्णय ‘बिहार ज्वेलर्स असोसिएशन’ने घेतला. गेल्या काही काळापासून बिहारमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सराफा दुकानांमध्ये लुटमार आणि चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. उत्तरप्रदेशातील झाशीमध्येही नुकताच असा निर्णय घेण्यात आला होता. यासह शिरस्त्राण घालून येणार्‍या पुरुषांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या निर्णयाची प्रत दागिन्यांच्या दुकानांच्या बाहेर लावण्यास आरंभ करण्यात आला आहे.

राजदचा आरोप, तर सत्ताधारी भाजपचे प्रत्युत्तर !

या निर्णयावर राष्ट्रीय जनता दलाचे (‘राजद’चे) प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले की, सुरक्षेच्या नावाखाली हिजाब आणि नकाब यांना लक्ष्य करणे केवळ चुकीचेच नाही, तर ही धार्मिक भावना दुखावणारी कृतीही आहे. अशा प्रकारचे निर्णय राज्यघटनेच्या अंतर्गत नागरिकांना मिळालेले धार्मिक स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार हिरावून घेण्याच्या कटाचा भाग आहेत. सुरक्षेच्या नावाखाली हिजाब आणि नकाब यांना लक्ष्य करणे चुकीचे आहे.  ‘ए.आय.एम्.आय.एम्.’ (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन. अखिल भारतीय मुसलमान एकता संघ) पक्षानेही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. भाजपने राजदला उत्तर देतांना म्हटले की, हा भारत आहे, इस्लामी देश नाही. येथे हिजाबचे काय काम आहे ?

‘ऑल इंडिया गोल्ड अँड ज्वेलर्स असोसिएशन’चे बिहार प्रदेशाध्यक्ष अशोक कुमार वर्मा

सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतला आहे ! – अशोक कुमार वर्मा

या वादावर सराफा व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, हे पाऊल कुठलाही समुदाय किंवा वर्ग यांच्या विरोधात नाही. सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ऑल इंडिया गोल्ड अँड ज्वेलर्स असोसिएशन’चे बिहार प्रदेशाध्यक्ष अशोक कुमार वर्मा यांनी सांगितले की, सराफा व्यवसायावर नेहमीच गुन्हेगारांचे लक्ष असते. त्यामुळे आम्ही हा निर्णय पूर्णपणे सुरक्षा लक्षात घेऊन घेतला आहे. प्रतिदिनच दुकानांमध्ये लुटमारीच्या घटना घडत आहेत. चेहरे झाकलेले असल्यामुळे गुन्हेगारांना ओळखणे कठीण जाते. हे थांबवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.