राष्ट्रवादी लेखकांना साम्यवाद्यांकडून झालेला विरोध !

सातारा येथे चालू असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…

राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !

प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादाला कुठेही स्थान नसल्याचे आढळून येत आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘राष्ट्रविघातक विचारांना विरोध करण्यासाठी साहित्य संमेलनात चर्चासत्र नसणे आश्चर्यजनक, समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले पारतंत्र्याच्या दुःखाचे वर्णन आणि साम्यवादी अन् मुसलमान यांच्या विचारांच्या विरोधात लढण्यासाठी सावरकर यांचा राष्ट्रवाद उपयुक्त’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/993138.html

९. धर्म विचारून गोळ्या घालणार्‍या जिहाद्यांच्या विरोधात विद्रोही साहित्यिकांकडून लेखन का नाही ?

भाषाप्रभु पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे साहित्य संमेलनातील भाषण समाजवाद्यांनी उधळून लावले. त्या वेळी भारत देश स्वतंत्र होता आणि आजही देश स्वतंत्र आहे. या स्वतंत्र देशात हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. यावर स्वतःला ‘साहित्यिक’ म्हणून घेणार्‍या विद्रोही साहित्यिकांनी त्यांच्या लेखणीरूपी तोफांमधून अन्यायी आणि अत्याचारी वृत्तीला ‘दे माय धरणी ठाय’ करण्यासाठी प्रखर शब्दांच्या गोळ्यांचा वर्षाव केला नाही. यातच त्यांचे साहित्य निर्माल्यवत झाले असल्याचे प्रत्यक्ष अनुभवास येते. ज्या सािहत्यिकांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची क्षमताच नाही, त्यांच्या साहित्य संमेलनात आतंकवाद्यांनी घडवून आणलेल्या रक्तपातावर चर्चासत्र घेऊन निरपराध सर्वसामान्य पर्यटकांच्या हत्येला न्याय मिळावा; म्हणून प्रयत्न ते कोणत्या तोंडाने करणार ?

१०. मूल्यांची जपणूक करणारे भावे आणि मूल्यांना पायदळी तुडवणारे साम्यवादी !

श्री. दुर्गेश परुळकर

मूल्यांची जपणूक करणारे पु.भा. भावे यांची भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ही दैवते, तर मूल्यांना पायदळी तुडवणार्‍या साम्यवाद्यांची दानव, असत्य, अन्याय, कटकारस्थाने ही दैवते ! त्यामुळे मानवी मूल्यांचा विचार न करता साहित्यिक मूल्यांचा विचार करणारे साम्यवादी आणि विद्रोही साहित्यिक सावरकर अन् भावे यांच्यावर केवळ अपार टीका करून थांबले नाहीत, तर त्यांनी अख्खे आयुष्य त्यांच्या विरोधात लढा पुकारला. असे करतांना त्यांनी साहित्यिक मूल्यांचा कोणताही विचार केला नाही; म्हणून ते साहित्यद्रोही आहेत.

पु.भा. भावे यांच्या ‘माझे टीकालेख’ या पुस्तकाला प्रा. दिनकर खंडेराव देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेत ते लिहितात…‘भावे नवे-जुने हा निकष मानत नव्हते. चांगले आणि वाईट एवढेच ते जाणत होते. पुण्यातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात भावे यांनी उदात्तता, उच्च चरित्र, श्रेष्ठ सत्त्व आणि महान गुणोपेत साहित्य हेच श्रेष्ठ साहित्य असल्याचे मत आग्रहाने मांडले. विधीवत् निवडून येऊनसुद्धा पुण्यातील समाजवादी कंपूने ते संमेलन उधळून लावण्याचा अत्यंत हीन आणि अश्लाघ्य प्रयत्न केला. त्याचा परखड समाचार भावे यांनी ‘पुण्याचे ते ज्वालाग्रही संमेलन’ या लेखात घेतला.

साहित्यात खर्‍या अर्थाने राजकारण आणले, ते समाजवादी विचारांच्या लोकांनी. अत्यंत विकृत आनंद घेत त्यांनी हैदोस घातला. ‘सुंदर तरुण स्त्री दिसली की, तिचा उपभोग घ्यावासा वाटतो’, अशी स्वीकृती जबाब देणारे पुणे विद्यापिठाचे त्या वेळचे उपकुलगुरु देवदत्त दाभोळकर हे साहित्य संमेलन उधळून लावणार्‍यांपैकी एक होते. राजकीय विचारांचा आतंकवाद आणणारे समाजवादी हे विसरले की, हे शस्त्र बुमरँगसारखे आहे. भावे यांनी टीकाकारांवर कधी सूड धरला नाही. टीकाकार प्रामाणिक असेल, तर तो वाङ्मयीन फौजदार आहे. वाङ्मय चौर्य कुठे होत आहे ? अश्लीलतेची मर्यादा कुठे भंग पावत आहे ? संस्कृती आणि धर्म यांचे अर्थभंजन कुठे चालू आहे ? हे त्याने पहावे. टीकाकार हा निष्पक्ष, रसिक, लक्ष्यग्रंथातील सौंदर्य आणि मार्मिक स्थळे उलगडून दाखवणारा, तसेच सप्रमाण दोष दर्शन करणारा असावा. तो पक्षपाती, पूर्वग्रहदूषित आणि अरसिक छिद्रानवेषी स्वतःचीच टीमकी वाजवणारा नसावा. ही लक्षणे अथवा हे गुण कम्युनिस्ट आणि विद्रोही साहित्यिकांमध्येही नाहीत. तेज हा भावे साहित्याचा प्राण आहे. धर्म, संस्कृती, सत्प्रवृत्ती आणि सद्गुणविचार हा त्यांच्या साहित्याचा आत्मा आहे. भावे साहित्य पुन:पुन्हा वाचावे, त्या विचाराचे सतत मनन करावे, म्हणजे काही व्यक्तींच्या मनात तरी या दैवी संपत्तीच्या रक्षणासाठी निखारे फुलतील, तो वन्ही पेटवला जाईल.’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’, असे आवाहन करण्यामागील कार्यकारणभाव !

स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्या वेळी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात जे विचार मांडले त्यांचे स्मरण होते…‘राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण, हीच आपल्या साहित्याची आद्य चिंता आहे. राष्ट्रीय जीवनाचे संरक्षण, हेच आपल्या साहित्याचे साध्य असले पाहिजे. राष्ट्राच्या प्राणावर बेतल्यावर खरी आवश्यकता असते, ती शस्त्रबळाची, साहित्याची नाही. जपानमध्ये प्रत्येक प्राथमिक शाळेत मुलामुलींना सैनिकी शिक्षण अनिवार्य करण्यात आले. तिथे अलंकार शास्त्राचे शिक्षण दिले जात नाही. ऑस्ट्रियाची मरणाची किंकाळी आपण ऐकली. शेवटच्या प्राणत्याग पत्रात त्याच्या शेवटच्या अध्यक्षाने शेवटचे वाक्य उच्चारले ‘आम्ही जर्मन असिलतेला (तलवारीची धार किंवा पाते यांना) शरण गेलो, कवितेला नाही.’

याचा अर्थ राष्ट्रावर जेव्हा कठीण काळ येतो आणि राष्ट्राचे स्वातंत्र्य जेव्हा धोक्यात येते, तसेच आपल्याला आपले सण, उत्सव उत्साहाने अन् मोकळ्या वातावरणात साजरे करता येत नाहीत. अशा वेळी साहित्य उपयोगी पडत नाही, तर त्यासाठी आवश्यक असते ते शस्त्र. म्हणूनच सावरकर यांनी ‘लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या’, असे आवाहन सर्व साहित्यिकांना त्यांच्या भाषणातून तेही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तेव्हा केले.

– श्री. दुर्गेश परुळकर

११. सीमेवरून परत जा !

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पु.भा. भावे यांच्याप्रमाणेच राष्ट्र-धर्म संस्कृती यांच्याविषयी अभिमान अन् आदरभाव बाळगणारे नाटककार, कवी आणि अभिनेते बाळ कोल्हटकर यांचेही या निमित्ताने स्मरण होत आहे. वर्ष १९६२ मध्ये भारतावर चीनने आक्रमण केले होते. त्या वेळी देशातील साम्यवाद्यांची निष्ठा स्वदेशावर नव्हती, तर चीनवर होती. या पार्श्वभूमीवर बाळ कोल्हटकर यांनी ‘सीमेवरून परत जा’ हे ३ अंकी नाटक लिहून त्याचा पहिला प्रयोग ३० सप्टेंबर १९६३ या दिवशी पुण्याच्या ‘महाराष्ट्र मंडळ’ या नाट्यगृहात त्या वेळचे देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या नाटकाच्या प्रस्तावनेत बाळ कोल्हटकर लिहितात… ‘आपल्या भूमीचा अभिमान त्या भूमीवर जन्म घेणार्‍याला असलाच पाहिजे, असे समजणारा आणि स्वतःही तसा असणारा असा मी होतो, आहे आणि राहीन.’ या नाटकासाठी त्यांनी एक पद लिहिले आहे. या पदाच्या प्रत्येक कडव्यामागे त्यांची वैचारिक धारणा काय, तेही ते स्पष्ट करतात ती अशी…

बाळ कोल्हटकर

‘या मातीच्या अभिमानातून भारतीय जन्माला ।
माऊली त्रिवार वंदन तुला ॥ ध्रुवपद ॥

भारतमाते तव चरणा ते ।
आणवाहुनी शब्द बोलतो ।
तुझाच जय जय कार सदोदित ।
देह तुला वाहिला ।
माऊली त्रिवार वंदन तुला ॥ १ ॥ (या कडव्यात व्यक्त केलेली भावना ही त्यांची वृत्ती !)

तुझ्या हितास्तव झगडू भांडू ।
तुझ्यासाठी रक्तही सांडू ।
माते तुझ्या अभिमानातून ।
भारतीय जन्माला ।
माऊली त्रिवार वंदन तुला ॥ २ ॥ (या कडव्यातून त्यांनी त्यांची राष्ट्रनिष्ठा व्यक्त केली आहे.)

ज्या भूमीचे सुपुत्र आम्ही ।
त्या भूमीच्या येऊ कामी ।
रणी बेहेत्तर मरण येईल तर ।
तोच स्वार्थ साधला ।
माऊली त्रिवार वंदना तुला ॥ ३ ॥’ (या कडव्यात त्यांनी त्यांची निरपेक्ष भक्ती व्यक्त केली आहे.)

त्यांना मिळालेली शिकवण कोणती, ते सांगतांना ते लिहितात…

‘भारतीय हे नाव लावतो, थोर मराठी जन्मकुळी ।
मारू आणि जिंकू आम्ही जगी बळी तो कानपिळी ।
नीच लुटारू ढोंगी फसवा शत्रु आमुच्या गाठीशी ।
नसे कल्पना अल्पही त्याला प्रसंग काळ्या मातीशी ।
प्रसन्न माती, पवित्र माती, बहुरत्न ही वसुंधरा ।
बोला हर हर महादेव अन शिवबाचे त्या नाम स्मरा ।

‘या शिकवणुकीतून त्यांच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण झाला. त्यातूनच ‘सीमेवरून परत जा’, या नाटकाचा जन्म झाला’, असे त्यांनी या प्रस्तावनेत म्हटले आहे. या नाटकात एका पात्राच्या तोंडी जे वाक्य आहे, ते देशातील राष्ट्रभक्त नागरिकांना स्फुरण आणि चैतन्य देणारे आहे.

‘सिकंदर हा भारतावर आक्रमण करण्यासाठी आला आहे. तो जगाचे नेतृत्व करतो. त्याच्या शस्त्र सामर्थ्यासमोर कुणाचाही निभाव लागत नाही. म्हणून त्याच्या स्वागतासाठी सिद्ध व्हा.’ असे आवाहन केले जात असतांना भारतातील एक सामान्य नागरिक या आवाहनाला प्रत्युत्तर देताना म्हणतो, ‘न स्वागतम् ! निरपराधांच्या भूमीवर अकारण अतिक्रमण करणार्‍या कुणाही पुरुषाचा आम्ही भारतीय त्रिवार धिक्कार करतो, शतवार धिक्कार करतो. न स्वागतम् ! न स्वागतम् !! न स्वागतम् !!!

(क्रमशः सोमवारच्या दैनिकात)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२८.१२.२०२५)


भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/994285.html