लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !

रुग्णाचे देयक अल्प करण्याच्या वादाचे प्रकरण

पुणे – उपचाराच्या वेळी मृत्यू झालेल्या रुग्णाचे कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णालयाला देयक अल्प करण्याची विनंती केली. तेव्हा झालेल्या वादातून लोहियानगर (हडपसर) येथील ‘विलू पुनावाला रुग्णालया’चे मुख्य संचलन अधिकारी आधुनिक वैद्य आर्य लजपतराय यांनी पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात पोलिसांनी संबंधिक आधुनिक वैद्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांचे पिस्तूल आणि परवाना जप्त केला आहे. ही घटना १६ जुलै या दिवशी रुग्णालयात घडली. या प्रकरणी प्रतीक कांबळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी चालू असून आधुनिक वैद्य आर्य यांच्या वर्तनाविषयीचे अन्वेषण चालू आहे. अन्वेषणानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.