पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin

कोलकाता दौर्‍यावरून बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांची साम्यवादी पक्षांवर टीका

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

कोलकाता (बंगाल) – पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेतेच आताही मला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची समर्थक ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी साम्यवादी पक्षांवर ‘एक्स’वरून केली. ‘आता मी बंगालमध्ये केवळ पाऊल ठेवल्याने हिंदुत्वसमर्थक, भाजपसमर्थक किंवा संघसमर्थक ठरते, असा या पक्षांचा दावा आहे’, असेही नसरीन म्हणाल्या. नसरीन यांचा जवळपास १९ वर्षांनंतर कोलकाता येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे.

तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या,

१. एका धर्मनिरपेक्ष संस्थेने दिलेल्या निमंत्रणानुसार माझा कोलकाता दौरा आयोजित करण्यात आला आहे. ही संस्था उस्मान गनी मलिक या एका पुरोगामी मुसलमानाच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.

२. बंगाल सरकारची भूमिका केवळ सुरक्षा पुरवण्यापुरती आहे. माझ्या कोलकाता दौर्‍यामागे भाजप किंवा सरकार यांचा हात नाही. कोणत्याही राज्यात माझ्या सुरक्षेचे दायित्व त्या-त्या राज्य सरकारचेच असते.

३. केरळम्मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या काळात मी अनेकदा ‘झेड-प्लस’ सुरक्षेसह दौरे केले होते, तेव्हा याच साम्यवादी नेत्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्या वेळी कोलकात्याच्या या साम्यवादी नेत्यांनी मला डाव्या विचारसरणीची म्हणून शिवीगाळ केली होती का ? त्यांनी माझ्या दौर्‍यांचे स्वागत केले होते का ?

४. इस्लामी कट्टरपंथियांना खूश करण्यासाठी साम्यवादी पक्षांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या सूत्रांवर मौन बाळगले.

बंगालमध्ये वर्ष २००७ मध्ये नसरीन यांच्या ‘द्विखंडिता’ या आत्मचरित्रावरून झालेल्या हिंसक आंदोलनानंतर बंगालमधील तत्कालीन साम्यवादी आघाडी सरकारने त्यांना कोलकाता सोडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या तृणमूल काँग्रेस सरकारनेही त्यांना राज्यात प्रवेश करण्यावर, तसेच त्यांच्या काही साहित्यिक आणि दूरचित्रवाणी प्रसारणावर निर्बंध घातले.