आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !

नवी मुंबई – मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक २१ जुलै या दिवशी वाशी येथे आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर ९-ए येथील गुरव ज्ञाती समाज हॉलमध्ये रात्री ७ ते ९ या वेळेत बैठक होणार आहे.

सरकारने नवी शहरे विकसित केली; परंतु मराठी शाळा विकसित केल्या का ?, आर्थिक विकास म्हणजे आपल्या मातृभाषेचा त्याग करणे आहे का ?, नवी मुंबई महानगरपालिकेने मराठी शाळांमध्ये इंग्रजी बालवाड्या चालू करून मराठी भाषा संपवण्याचा विडा उचलला आहे का ?, नवी मुंबईमध्ये मराठी शाळेत शिकण्याचे स्वातंत्र्य आहे का ?, या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि खडसावण्यासाठी जाहीर बैठक घेण्यात येणार आहे.

‘नवी मुंबईतील सर्व मराठी आणि महाराष्ट्र प्रेमी यांनी या बैठकीला उपस्थित रहावे’, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या वेळी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार मार्गदर्शन करणार आहेत. ‘अधिक माहितीसाठी प्रणय यांना ९००४४२०८२३ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा’, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.