‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

नाशिक – सिंहस्थ कुंभपर्वाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा नाशिककरांसह सर्वांपर्यंत पोचावी, यासाठी ‘सिंहस्थ साहाय्यक समिती’ने प्रकाशित केलेली ‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, असे विधान राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. कुंभपर्व प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी ‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ या अंतर्गत ‘सिंहस्थ कुंभ पर्व : सोहळा जनजागरणाचा, भावजागराणाचा, जनसहभागाचा !’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस्. स्वामी, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, सिंहस्थ साहाय्यक समितीचे गिरीश सातपुते आदींची या वेळी उपस्थिती होती.

सिंहस्थ कुंभपर्वाच्या अनुषंगाने आकाशवाणी नाशिक केंद्रावरून ७२ भागांची ‘सोहळा कुंभपर्वाचा’ ही रेडिओ मालिका २० जुलैपासून प्रसारित होणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

कुंभपर्व प्राधिकरणाच्या कार्यालयातील सभागृह नूतनीकरणाचे उद्घाटन मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या निर्मितीसाठी सहकार्य करणार्‍या अभियंत्यांचा सत्कार या वेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आला.