वारकरी संप्रदाय

सध्या चालू असलेल्या ‘आषाढी वारी’च्या निमित्ताने…

‘वारी’ याचा अर्थ ‘येरझार’ हा जरी असला, तरी भक्तीसंप्रदायात त्यास एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, तो म्हणजे आपल्या आराध्य दैवतांच्या दर्शनास विशिष्ट मासात विशिष्ट दिवशी नित्य नियमाने जाणे. ज्ञानेश्वरीत ‘वारी’ हा शब्द ‘येरझार’ या अर्थी आलेला आहे. अशा विशिष्ट दैवतांचे भक्तगण जेव्हा एकत्र येऊन प्रस्थान ठेवतात, त्यास दिंडी म्हणतात. या दिंड्या अनेक ठिकाणाहून निघतात आणि त्या आराध्यदैवताच्या परमभक्ताच्या ठिकाणी (गावी) एकत्र येऊन या त्यांच्या पालखीसह आराध्यदैवताच्या ठिकाणी जातात.

या भारतवर्षांत अशा पद्धतीने अनेक देवीदेवतांच्या वार्‍या करणारे आहेत. बद्रिकेदार, वैष्णोदेवी, अमरनाथ, गाणगापूर, अक्कलकोट, काशीविश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, उज्जैन, रामेश्वर, तिरुपती, शबरीमलेयै, शेगाव आणि शिर्डी इत्यादी. जगन्नाथपुरी, द्वारका, सोरटी सोमनाथ, गया, अजमेर, पावापुरी, चंपापुरी इत्यादी असंख्य पवित्र स्थाने आहेत आणि त्या ठिकाणी नित्यनियमाने जाणारे भक्त आहेत. ‘वारी करणारा तो वारकरी’, अशी वारकर्‍यांची व्याख्या करता येईल.      

 १. भक्तवत्सल श्री विठ्ठलाचा पंढरपुरात अक्षय वास

भक्तश्रेष्ठ पुंडलिकाच्या घरी भगवान श्रीकृष्ण स्वतः विठ्ठलरूपात पंढरपुरात त्याच्या घरी प्रगटले आणि ते मातापित्याच्या सेवेत मग्न असल्याने त्याने दिलेल्या विटेवर युगानयुगे उभे राहिले. असे सांगतात की, भगवान विठ्ठल कायम तेथेच रहावेत; म्हणून भक्त पुंडलिकाने ‘स्नान करून येईपर्यंत थांबा’, असे सांगून नदीत आत्मसमर्पण केले आणि तो परत आलाच नाही. परिणामी विठ्ठल भगवान युगानुयुगे त्या विटेवरच उभे आहेत. भक्तवत्सल श्री विठ्ठल भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या इच्छेप्रमाणे पंढरपुरात अक्षय वास करून आहेत आणि कायमच रहाणार आहेत. २८ युगांनंतरही ते उभे आहेतच. यासंबंधी काही शिलालेख आणि ताम्रपट उपलब्ध आहेत.

भक्त पुंडलिक हाच वारकरी संप्रदाय प्रवर्तक आहे आणि वारकरी संप्रदाय तसेच मानतो. त्या वेळच्या होयसळ यादव घराण्यातील विष्णुवर्धन राजास भगवान विष्णु प्रगट झाल्याचे वृत्त कळताच त्याने पंढरपूर (त्या वेळचे पांडुरंगपूर) येथे विठ्ठल मंदिर उभारले आणि हे विठ्ठलरूप वैष्णवांना अत्यंत प्रिय नव्हे, तर त्यांचे जीव कि प्राण झाले. भक्त पुंडलिकाने आषाढ शुद्ध एकादशी ही तिथी निश्चित केली. त्यामुळे एकादशी हा दिवस या संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो. हा त्यांचा व्रत दिवस होय.

२. पंढरपूरचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायाविषयीची माहिती

आद्यशंकराचार्य यांच्या ‘पांडुरंगाष्टका’तही

‘महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।
समागम्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।।’

अर्थ : भीमरथी (भीमा, चंद्रभागा)च्या तीरावर असणार्‍या त्या (पंढरपूर नामक) महान योगपीठावर पुंडलिकाला वर देण्यासाठी तिष्ठत असणार्‍या, आनंदाचा कंद अशा त्या परब्रह्माचे चिन्ह असणार्‍या पांडुरंगाचे मी भजन आणि पूजन करतो.

असा श्लोक असून त्यात पुंडलिकास वर देण्यासाठी पांडुरंग पंढरीस आल्याचे सांगितले आहे.

श्री ज्ञानेश्वरमाऊलींच्या पूर्वीही अनेक जण विठ्ठलभक्त होते. पांडुरंग मंदिरात पूजा होत असे. एकादशीव्रत प्रचलित होते. अनेक गावांहून भक्त पंढरपुरास नित्यनेमाने येत असत, म्हणजेच वारी करत असत. जे आषाढी शुक्ल एकादशीस पंढरपुरास आणि कार्तिक कृष्ण एकादशीस आळंदीस नियमितपणे जातात, त्यांना ‘वारकरी’ म्हणतात. हे वारकरी गळ्यात नेहमी तुळशीची माळ घालतात. त्यामुळे या संप्रदायास ‘माळकरी संप्रदाय’ असेही म्हणतात. भगवंतास सर्वस्व अर्पण करणारा तो भक्त. अशी भक्ती याच पंथात सांगितली आहे; म्हणून त्यास ‘भागवत संप्रदाय’, असेही संबोधन आहे.

वारकरी संप्रदाय ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ हे प्रमुख ग्रंथ मानतो. त्यात ‘ज्ञानेश्वरी’ सर्वश्रेष्ठ; कारण याच ग्रंथातील वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञान अन्य २ ग्रंथांत, म्हणजे ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ यांत विस्ताराने आहे. या संप्रदायाचे संपूर्ण तत्त्वज्ञान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘अमृतानुभव’ आणि ‘हरिपाठ’, तसेच ‘चांगदेव पासष्टी’ यांत आहे.

३. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

अ. परमात्मा (परब्रह्म) : हे सनातन आणि स्वयंप्रकाशी, स्वयंसिद्ध आणि सत्, चित् अन् आनंदरूप आहे. ते स्वयं तेजोमयी ज्ञानस्वरूप आहे. ते ना सगुण आहे, ना निर्गुण आहे. हे शिव आणि शक्ती यांचे एकत्रीकरण असून दोन्हीमध्ये अद्वैत आहे. ज्ञानेश्वरीत ‘ॐ नमोजी आद्या’ ही प्रारंभी ओवी, तसेच त्यांचे ‘अमृतानुभव’ मधील

ऐशीं हीं निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ।। – अमृतानुभव, प्रकरण १, ओवी १

अर्थ : अशा उपाधिविरहित, जगताला निर्माण करणार्‍या प्रकृती आणि पुरुषाला मी वंदन केले.

तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।
सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।। – संत ज्ञानेश्वर

अर्थ : हे भगवंता, तुला सगुण म्हणू कि निर्गण म्हणू ? कारण तू सगुण आणि निर्गुण असे दोन्ही असणारा एकच गोविंद आहेस. यांतून परब्रह्मतत्त्व सांगितले आहे.

आ. जगत् (विश्व) : यासंबंधी ते परमेश्वराची लीला आणि स्फूर्ती आहे, असे समजतात.

यालागीं वस्तुप्रभा । वस्तूची पावे शोभा ।
जातसे लाभा । वस्तुसिचि ।। – अमृतानुभव, प्रकरण ७, ओवी २९१

अर्थ : म्हणून नामरूपात्मक जगत्मिषाने एक ब्रह्मवस्तूच प्रकाशली आहे, तत्त्वतः जगत् काही नसून स्वयंप्रकाशाने एक ब्रह्मवस्तूच सुशोभित झाली आहे; म्हणून जगत्स्फुरण्यात ब्रह्मवस्तूला ब्रह्मवस्तूचाच लाभ होतो.

इ. जीव : तिसरा घटक जीव ज्या परमात्म्याचा अंश आहे; पण कर्मामुळेच त्याला जीवदशा प्राप्त झाली आहे.

ई. माया : चौथा घटक जिच्यामुळे जीव बद्ध होतो. ही दोन प्रकारची, म्हणजे विद्यामाया आणि अविद्या माया असून अविद्यामाया परमार्थप्राप्तीस बाधक आहे, तर विद्यामाया परमार्थप्राप्तीस साधक (साहाय्यक) आहे. ही माया नदी केवळ महाभयंकर असून अनन्यभावे सर्वसमर्पण करून भगवंतास (परब्रह्मास) शरण जाणारेच ती पार करू शकतो. ‘ज्ञानेश्वरी’तील ७ वा अध्याय यावरच आहे.

उ. मोक्ष : हा पाचवा घटक. मोक्ष हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. जीवा-शिवाचे ऐक्य साधणे, परब्रह्मात एकरूप होणे, म्हणजेच मोक्ष. वारकरी संप्रदायात नवविधाभक्ती प्रकारात नामस्मरण, नामसंकीर्तन हे मोक्षप्राप्तीचे अमोघ साधन मानले जाते आणि त्यासाठी सत्संगतीलाही फार महत्त्व आहे. ‘हरिपाठा’तसुद्धा हेच नाममहात्म्य वर्णन केले आहे.

‘जय जय रामकृष्ण हरि ।’

– श्री. वसंत गोडबोले

(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, एप्रिल २०१७, सौ. मालतीबाई नवाथे ट्रस्ट यांच्या अनुमतीने)