गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ

साळावली धरण

पणजी, २० जुलै (वार्ता.) – गेले काही दिवस राज्यभरात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. राज्यात पिण्यासाठी, तसेच कृषी बागायती यांच्यासाठी वापरले जाणार्‍या ७ पैकी ६ धरणांतील पाण्याचा साठा निम्म्याहून अधिक झालेला आहे.

राज्यातील सर्वांत मोठ्या साळावली धरणामध्ये २० जुलै या दिवशी पाण्याचा साठा ६९ टक्के होता. या धरणात ४ दिवसांपूर्वी पाण्याचा साठा ४८ टक्के होता. उत्तर गोव्यातील अंजुणे धरणात ४ दिवसांपूर्वी २६ टक्के असलेला जलसाठा २० जुलै या दिवशी ३७ टक्के होता. बार्देश आणि डिचोली तालुक्यांतील काही भागांना पाणीपुरवठा करणार्‍या आमठाणे धरणात ६८ टक्के पाण्याचा साठा आहे, तर काणकोण तालुक्यातील चापोली आणि गावणे धरणांमध्ये २० जुलै या दिवशी अनुक्रमे ५५ आणि ७९ टक्के पाण्याचा साठा आहे. महाराष्ट्रातील तिलारी धरणातील पाण्याचा साठा ६४ टक्के झाला आहे. या धरणातून गोव्यात पिण्यासाठी, तसेच बागायतीसाठी पाणी पुरवले जाते. पावसाचे अजून अडीच मास शेष असल्याने जलस्रोत खात्यातील अधिकार्‍यांना राज्यातील सर्व धरणे पावसाळा संपेपर्यंत तुंडुब भरणार किंवा अधिकतम क्षमतेजवळ पाणीसाठा पोेचणार, अशी आशा वाटत आहे.

गोव्यात आतापर्यंत सरासरी १ सहस्र मि.मी. पावसाची नोंद

गोव्यात आतापर्यंत १०११.९ मि.मी. म्हणजेच ३९.८३ इंच पाऊस पडला आहे. राज्यातील घाटालगतच्या सत्तरी आणि सांगे भागांत चांगला पाऊस पडत आहे, तर इतर ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. मागील २४ घंट्यांमध्ये केवळ वाळपई येथे ६०.४५ मि.मी. आणि सांगे येथे ५४.८६ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. राज्यात इतर ठिकाणी एक इंचाहून अल्प पाऊस पडल्याची नोंद आहे. राज्यभरात लवकरच पाऊस १ सहस्र मि.मी.चा टप्पा गाठणार असला, तरी काणकोण आणि सांगे येथे आतापर्यंत १ सहस्र २९० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. धारबांदोडा तालुक्यात १ सहस्र २६४ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. राज्यात सर्वांत अल्प (६७० मि.मी.) पाऊस पणजी येथे पडला आहे.