कोरियन संस्कृतीचे दुष्परिणाम !

साधारणपणे वर्ष २०२० मधील कोरोना महामारीच्या काळात कोरियन संस्कृतीचा प्रभाव खर्‍या अर्थाने वाढू लागला. त्या काळात संचारबंदीमुळे तरुण घरातच होते, ज्यामुळे ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’चा वापर वाढला. याच काळात ‘ओटीटी’वर मग कोरियन चित्रपट हिंदीतून भाषांतर करून दाखवले गेले. सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे त्यांची गाणी, खाद्यसंस्कृती आणि सौंदर्यप्रसाधने भारतीय तरुणांपर्यंत पोचली आणि पहाता पहाता या संस्कृतीने भारतीय तरुणांचे मन आणि जीवनशैली यांवर खोलवर परिणाम आरंभ केला.

भारतातील तरुण पिढीमध्ये सध्या कोरियन चित्रपट आणि संस्कृती यांची ओढ वाढली आहे. या मालिकांचे उत्तम चित्रीकरण, केवळ १६ भागांची खिळवून ठेवणारी छोटी कथा आणि भावनिक नातेसंबंधांवर असलेला भर तरुणांना आवडतो. या मालिकांच्या अतीवेडामुळे तरुणांवर वाईट परिणामही होत आहेत. अनेक तरुण घंटोन्‌घंटे सलग ही मालिका बघतात. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि अभ्यासावरही परिणाम होतो. नातेसंबंध आणि जोडीदार यांच्याविषयी ‘आशा’ ठेवल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंगही होतो. काही जण तिथल्या नटनट्यांप्रमाणे दिसण्यासाठी सौंदर्यप्रसाधने वापरतात, तर काहींना स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होतो. सौंदर्यप्रसाधने खर्चिक असतात, त्यामुळे नको तो खर्च वाढत जातो.

बाजारात ‘कोरियन नूडल्स’, ‘कॉर्न डॉग्ज’ अशा पदार्थांना मागणी आहे. ‘बीटीएस्’ आणि ‘ब्लॅकपिंक’ यांसारख्या पॉप संगीत ‘बँड’मुळे त्यांची गाणी लोकप्रिय झाली आहेत. याखेरीज ‘ग्लास स्कीन’ (काचेसारखी त्वचा) मिळवण्यासाठी कोरियन सौंदर्यप्रसाधने आणि कपडे यांमध्ये ओव्हरसाईज् टी-शर्ट अन् फिकट रंगांचे कपडे निवडण्याकडे तरुणांचा कल आहे. भारतीय पैसा हा या सर्व मार्गाने कोरियात जात आहे आणि भारतियांना त्याचे सुवेरसुतक सुद्धा नाही.

भारतीय संस्कृती सर्वच संस्कृतींचा आदर करते; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. हा नकारात्मक प्रभाव न्यून करण्यासाठी सर्वप्रथम कोरियन मालिकांचे प्रदर्शन थांबवले पाहिजे. पालक आणि शिक्षक यांनी मुलांच्या भ्रमणभाष बघण्याची वेळ मर्यादित केली पाहिजे. यासाठीही विविध ॲप्स आहेत. जेवतांना आणि झोपतांना भ्रमणभाष बघू नये असे नियम केले पाहिजेत. तरुणांनी मैदानी खेळ, व्यायाम आणि इतर छंद यांकडे आपले लक्ष दिले पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांना अशा मालिकांमधील काल्पनिक जग आणि प्रत्यक्ष आयुष्य यांतील भेद समजावून सांगायला हवा. भारत सरकार जसे चिनी संस्कृती आणि बनावट वस्तू यांवर बंदी घालते, तसेच कोरियन संस्कृतीचा वाढता पगडा दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासह आवश्यक ते सर्व उपाय करणे निकडीचे आहे.

– श्री. आल्हाद माळगावकर, पनवेल