
मुंबई, २० जुलै (वार्ता.) – महाराष्ट्राची कुलदेवता आणि जागृत देवस्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवस्थानच्या भूमीची खासगी व्यक्तीला विक्री करण्यात आली आहे. ही भूमी हडपण्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै या दिवशी समितीची स्थापना करण्यात आली. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अन् पुणे येथील सहआयुक्त यांचाही समितीमध्ये समावेश आहे. पुढील १ महिन्यांत समितीतील अन्वेषण अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.
नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाच्या चर्चेच्या अंतर्गत विधानसभेत श्री तुळजाभवानी देवस्थानाच्या भूमी घोटाळ्याचा विषय चर्चेला आला होता. या वेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार समितीची स्थापना करण्यात आली.
काय आहे प्रकरण ?
निजामाच्या काळात ४ सहस्र १२० भूमी श्री तुळजाभवानी मंदिरासाठी देण्यात आली होती. या भूमीला ‘कुळ कायदा’ लागू होत नाही. असे असतांनाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने सहस्रो एकर भूमी लाटण्यात आली आहे. ‘जगदंबा’ न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर भूमी खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आली. अव्वल कारकुनाने अधिकाराचा गैरवापर करून २६१ एकर भूमी खासगी व्यक्तींच्या नावे केली. अपसिंगा आणि उपळा येथील १५८ एकर भूमीत अनधिकृतपणे फेरफार नोंदी करण्यात आल्या.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पाठपुरावा !मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी याविषयीचे सविस्तर निवेदन महसूलमत्र्यांना दिले होते. त्यावर तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले होते. |
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !