जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

हावडा (बंगाल) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा शंखनाद !

हिंदु राष्ट्र अधिवेशनात संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे

हावडा (बंगाल) – हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या ग्रंथातून हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्याच्या संकल्पनेवर मार्गदर्शन केले होते. त्यानुसार सध्या परिवर्तन होत असल्याचे दिसते. बंगालमधील सत्तांतरानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे दायित्व वाढले आहे. त्यामुळे आपल्याला जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवले  पाहिजे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी येथील हिंदु राष्ट्र अधिवेशनात व्यक्त केले. ‘आदिशंकराचार्य मंदिर सामाजिक विकास ट्रस्ट’चे संस्थापक विश्वस्त, तसेच बंगालमधील ‘आदित्य वाहिनी’चे अध्यक्ष श्री. देबाशीष गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली हावडा येथील शरत सदनामध्ये ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ झाले. या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. शंभू गवारे

या वेळी तारकेश्वर शिव मंदिराचे महंत श्रीमद् दंडी स्वामी सुरेश्वर आश्रम महाराज, ऋषदा प्रेम मंदिराचे महासचिव स्वामी निर्गुणानंद ब्रह्मगिरी, श्रीमद् हिरण्यमय गोस्वामी, दंडी स्वामी रामानंद तीर्थ, महामिलन मठाचे अध्यक्ष डॉ. शोभन भट्टाचार्य, स्वामी सर्वानंद अवधूत, बंधू गौरव ब्रह्मचारी, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे बंगाल समन्वयक श्री. अनिर्बन नियोगी, अंजनी पुत्र सेनेचे संस्थापक सचिव श्री. सुरेंद्र वर्मा आदी संत आणि मान्यवर उपस्थित होते. ‘वन्दे मातरम’च्या संपूर्ण गायनाने अधिवेशनाची सांगता झाली.