लैंगिक आरोग्य आणि स्त्री

स्त्रीरोग आणि आयुर्वेद (लेखांक २४)

स्त्रीचे लैंगिक आरोग्य (सेक्शुअल हेल्थ) हा तिच्या एकूण शारीरिक, मानसिक आणि प्रजनन आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. दुर्दैवाने आपल्या समाजात या विषयावर मोकळेपणाने चर्चा केली जात नाही. त्यामुळे अनेक स्त्रिया योनी कोरडेपणा, संभोगाच्या वेळी वेदना, लैंगिक इच्छेमध्ये घट, वारंवार होणारे संसर्ग किंवा मानसिक अस्वस्थता यांसारख्या समस्या सहन करत रहातात. आयुर्वेदामध्ये लैंगिक आरोग्याला केवळ शारीरिक संबंधांपुरते मर्यादित न ठेवता शरीर, मन, इंद्रिये आणि आत्मा यांच्या संतुलनाशी संबंधित आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू मानले आहे. निरोगी लैंगिक जीवन हे स्त्रीचा मानसिक आनंद, वैवाहिक समाधान आणि प्रजनन आरोग्य यांसाठी आवश्यक मानले गेले आहे.

लेखांक २३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1061122.html

१. स्त्रीचे लैंगिक आरोग्य म्हणजे काय ? 

जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार लैंगिक आरोग्य, म्हणजे लैंगिकतेशी संबंधित शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था. आयुर्वेदानुसार निरोगी लैंगिक आरोग्यासाठी ‘संतुलित दोष, निरोगी आर्तव (मासिक पाळी), स्वस्थ गर्भाशय आणि योनी, चांगली मानसिक अवस्था आणि संतुलित दांपत्य संबंध’ या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

२. स्त्रियांमध्ये आढळणार्‍या सामान्य लैंगिक समस्या

अ. लैंगिक इच्छेमध्ये घट (Low Libido) : लैंगिक संबंधांमध्ये रस न्यून होणे, मानसिक ताण, ‘हार्मोनल’ (संप्रेरक) पालट, प्रसूतीनंतर किंवा ‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढलेली समस्या

आ. संभोगाच्या वेळी वेदना (Dyspareunia) : योनी कोरडेपणा, संसर्ग, भीती किंवा मानसिक ताण, ‘पेल्विक’ स्नायूंचा ताण

इ. योनी कोरडेपणा : विशेषतः ‘मेनोपॉज’नंतर आढळतो.

ई. वारंवार होणारे संसर्ग : योनीमार्ग संक्रमण, ‘यूटीआय’ (मूत्रसंक्रमण), खाज, जळजळ

३. आयुर्वेदानुसार कारणमीमांसा

वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे

अ. वातदोष वाढ : योनी कोरडेपणा, वेदना, लैंगिक इच्छेमध्ये घट

आ. पित्तदोष वाढ : जळजळ, संसर्ग, चिडचिड

इ. कफदोष असंतुलन : स्राव वाढ, जडपणा, ‘हार्मोनल’ अडथळे

ई. मानसिक कारणे : आयुर्वेदात मन आणि शरीर यांचा घनिष्ठ संबंध मानला आहे. चिंता, नैराश्य, तणाव आणि वैवाहिक मतभेद यांमुळे लैंगिक आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो.

४. आयुर्वेदानुसार चिकित्सेत करायचा विचार 

उपचार चालू करण्यापूर्वी ‘स्त्रीची प्रकृती, वय, मासिक पाळीचा इतिहास, प्रसूतीचा इतिहास, मानसिक आरोग्य, ‘हार्मोनल’ स्थिती, वैवाहिक आणि भावनिक परिस्थिती’ यांचे मूल्यांकन आवश्यक असते.

५. उपचाराचा उद्देश

वात-पित्त-कफ संतुलन, मानसिक स्थैर्य आणि प्रजनन आरोग्य सुधारणा

६. आयुर्वेदानुसार उपचारपद्धत 

अ. औषधी उपचार (वैद्यकीय सल्ल्यानुसार)

१. शतावरी : स्त्रियांचे प्रमुख रसायन, ‘हार्मोनल’ संतुलन अन् योनी आरोग्य सुधारते.

२. अश्वगंधा : मानसिक ताण न्यून, शक्तीवर्धक, लैंगिक आरोग्यास साहाय्यकारी

३. यष्टिमधु : पित्तशमन आणि कोरडेपणा न्यून करण्यास साहाय्य

४. गुडुची : रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

आ. पंचकर्म उपचार 

१. बस्ती : अपान वात संतुलित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त.

२. उत्तर बस्ती : विशिष्ट स्त्रीरोगांमध्ये तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली.

३. अभ्यंग : ताण न्यून करून मानसिक आणि शारीरिक आराम देते.

७. घरगुती आयुर्वेदाचे उपाय

पुरेशी झोप घ्यावी, नियमित योग आणि प्राणायाम, जोडीदाराशी मोकळा संवाद ठेवावा, तणाव न्यून करण्यासाठी ध्यान करावे आणि शरिराला पुरेसे पाणी मिळेल, याची काळजी घ्यावी.

८. आहार मार्गदर्शन 

अ. काय घ्यावे ? : दूध, तूप, बदाम, खजूर, पौष्टिक आहार, ताजी फळे अन् भाज्या

आ. काय टाळावे ? : अतीतिखट पदार्थ, जंक फूड (पिझ्झा, बर्गर), मद्यपान, उशिरापर्यंत जागरण

९. जीवनशैली मार्गदर्शन 

नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, सकारात्मक विचार, मानसिक आरोग्याची काळजी, वैवाहिक नात्यात संवाद आणि समजूतदारपणा हवा.

१०. आयुर्वेदाच्या ग्रंथांतील संदर्भ

आयुर्वेदात ‘चरक संहिता (चिकित्सा स्थान)’ आणि ‘अष्टांगहृदय’ यांमध्ये वाजीकरण, रसायन चिकित्सा अन् स्त्री प्रजनन आरोग्य यांविषयी सविस्तर वर्णन आढळते. यामध्ये शरीर आणि मन निरोगी ठेवून संतुलित दांपत्य जीवनाला महत्त्व दिले आहे.

११. निष्कर्ष

स्त्रीचे लैंगिक आरोग्य हे तिच्या संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब असते. लैंगिक समस्या लाज किंवा भीती यांमुळे लपवून ठेवण्यापेक्षा त्यांचे योग्य निदान अन् उपचार करणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेद शरीर, मन आणि भावनिक आरोग्य यांचा समतोल साधून स्त्रीला निरोगी, आत्मविश्वासपूर्ण अन् आनंदी जीवन जगण्यास साहाय्य करतो.

– वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

‘स्त्री रोग आणि आयुर्वेद’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा