स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा

स्मार्ट वीजमीटर

दोडामार्ग – स्मार्ट वीजमीटरच्या सूत्रावर आंदोलन करणार्‍यांवरच गुन्हे नोंद करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. वाढीव वीज देयके, खासगी आस्थापनाचा हस्तक्षेप आणि सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात भूमिका घेणार्‍या नागरिकांना, तसेच या विषयावर वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे, असे आरोप सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी आणि सचिव भूषण सावंत यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक अधिवक्ता नंदन वेंगुर्लेकर, पत्रकार सागर चव्हाण, तसेच स्मार्ट मीटर विषयीच्या चर्चासत्रात भाग घेतल्याने दीपक पटेकर यांना महाराष्ट्र सायबर विभागाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावली आहे. ‘स्मार्ट मीटरमध्ये गुप्त कॅमेरे आहेत’, असा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना २२ जुलै २०२६ या दिवशी नवी मुंबई येथील नोडल सायबर पोलीस ठाण्यात उपस्थित  रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी ‘स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा नाही’, असे लेखी लिहून देण्यास सिद्ध नाहीत. मग ग्राहकांच्या शंका चुकीच्या कशा ठरवल्या जात आहेत ? प्रश्‍न विचारणे हा गुन्हा आहे का ? लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील वीज ग्राहक संघटना आणि सरपंच संघटना आपली भूमिका घोषित करतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.